पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसचे नेते व भोपाळ मध्यवर्तीचे लोकप्रिय आमदार आरिफ मसूद यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. भाजपा नेते व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे कृष्णा घाडगे यांच्याकडून त्यांना जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंगळवारी हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमातील त्यांचा एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये ते आक्रमक होत काँग्रेस नेत्यांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. नेमके हे प्रकरण काय? पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेस नेत्याला का लक्ष्य केले जात आहे? भाजपा नेत्याने काय आरोप केले आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.

भाजपा नेत्याची प्रतिक्रिया काय?

भाजपा नेते कृष्णा घाडगे दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलत असताना म्हणाले, “हा विषय पाकिस्तानचा नाही. त्या पाकिस्तानचे एजंट इथेच उभे राहून आपल्याला ऐकत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी भोपाळमध्ये काही करून दाखवावं. आम्ही आरिफ मसूद आणि आमच्या धर्माला विरोध करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांना सोडणार नाही. त्यांचे काय करायचे ते इथेच करू.” राज्य भाजप कार्यकारिणीचे सदस्य घाडगे यांनी मसूद यांच्याविरुद्ध अपशब्दांचा वापर केला. या व्यक्तव्यानंतर भोपाळमधील राजकारण चांगलेच तापले आणि आरिफ मसूद यांच्या समर्थकांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण पाहयला मिळाले.

काँग्रेस नेत्यांचा संताप

मसूद यांच्या समर्थकांनी भाजपा नेत्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर मसूद यांनी फेसबुक अकाउंटवर प्रतिक्रिया देत वादग्रस्त पोस्ट केली आणि आपल्या विधानाविषयी त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. घाडगे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर लिहिले, “आमची रॅली पाकिस्तानविरोधात होती. मी मसूद यांना पाकिस्तानी एजंट म्हटले आहे आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा एक असा विषय आहे, ज्यावर आता चर्चा रंगली आहे. आरिफ मसूद फॅन क्लबचे लोक माझ्याविरुद्ध तक्रार दाखल करीत आहेत. मी पाकिस्तानविरुद्ध बोललो आहे, ते पाकिस्तानची बाजू घेत आहेत आणि माझ्याविरुद्ध तक्रार दाखल करीत आहेत,” असे ते म्हणाले.

या प्रकरणाच्या एक दिवसापूर्वी सचिन रघुवंशी नावाच्या एका व्यक्तीने मसूद यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. सचिन रघुवंशीवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचे काही फोटोही समोर आले. या फोटोमध्ये तो भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याबरोबर दिसला. त्यावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली आहे. थेट प्रश्न विचारत, ते म्हणाले, ” मध्य प्रदेश पोलीस आरिफ मसूदच्या सुरक्षेची दखल घेतील का आणि त्यांचे संरक्षण वाढवतील का? ते वाढवण्यात यावे. मध्य प्रदेश भाजपा सचिन रघुवंशीविरोधात कायदेशीर कारवाई करतील का? त्यांनी ती करायला हवी.”

आरिफ मसूद यांची प्रतिक्रिया

‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना मसूद म्हणाले की, भाजपाला माझी ताकद कळली आहे. “मी एक मजबूत विरोधी पक्षसदस्य आहे आणि ते योद्ध्यांना घाबरतात,” असे मसूद म्हणाले. “मला मते मिळत राहिल्याने आणि त्यांची संपूर्ण शक्ती वापरल्यानंतरही ते मला हटवू शकत नसल्याने ते संतप्त आहेत. त्यांना हिंदू-मुस्लिम ऐक्य आवडत नाही आणि म्हणूनच ते मला लक्ष्य करीत आहेत,” असे ते पुढे म्हणाले.

कोण आहेत आरिफ मसूद?

आरिफ मसूद यांनी स्टेट लॉ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि सरकारी बेनझीर कॉलेजमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. २००० च्या सुमारास ते विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले. २०१३ मध्ये मसूद यांनी भोपाळ मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, मात्र, भाजपाच्या सुरेंद्र नाथ सिंह यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. पाच वर्षांनंतर त्यांनी ही जागा जिंकली आणि २०२३ मध्येही ही जागा कायम ठेवली. आरिफ मसूद हे केवळ दोन मुस्लीम आमदारांपैकी एक आहेत. आरिफ मसूद यांच्या लोकप्रियतमुळे भोपाळमध्ये काँग्रेस एक मजबूत पक्ष, अशी ओळख मिळाली. आरिफ मसूद हे त्यांच्या मतदारांशी जवळीक साधणारे आणि जवळून त्यांच्या समस्या समजून घेणारे म्हणून ओळखले जातात. भोपाळमधील अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी ते कायम आवाज उठवत असल्याने भोपाळमध्ये ते लोकप्रिय आहेत.

२०१९ मध्ये त्यांनी नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयकाला तीव्र विरोध केला. मध्य प्रदेशातील तत्कालीन काँग्रेस सरकारने हे विधेयक लागू केल्यास त्यांनी राजीनामा देण्याचा इशाराही दिला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये मसूद यांनी एका कार्टूनच्या वादावरून भोपाळमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याविरोधात निदर्शने केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांनंतर भोपाळ महानगरपालिकेने त्यांच्याशी संबंधित खानुगाव येथील आयपीएस कॉलेजमधील १२,००० चौरस फुटांचे बांधकाम पाडले. त्यावेळी त्यांनी भाजपा सरकार राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप केला होता. भाजपा प्रवक्ते नरेंद्र सलुजा म्हणाले की, त्यांनी घाडगे यांचे वक्तव्य ऐकलेले नाही. ते म्हणाले, “त्यांनी हे कोणत्या संदर्भात म्हटले याची आम्ही चौकशी करू. आम्ही त्यांना विचारू की, त्यांनी हे खरंच म्हटले आहे की हा संपादित व्हिडीओ आहे”.