सध्या पश्चिम बंगाल सरकार आर्थिक अडचणीत सापडले आहे. मात्र तरीही राज्यातील दुर्गा पूजा आयोजकांना मिळणारी ग्रँट वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. तसेच आयोजकांना वीज बिलात सवलत देण्यात आल्याने विरोधकांचा राग अनावर झाला आहे. तृणमूल कॉँग्रेसने या प्रकरणात सावध पवित्रा घेतला असून सणासुदीमुळे अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी मदत होईल असे म्हटले आहे.
बॅनर्जी यांनी राज्यातील दुर्गा पूजा आयोजकांसाठी प्रत्येकी ४० हजारहून अधिक ग्रँट मंजूर करण्याची घोषणा केली होती. ती रू. ५० हजार ते रू. ६० हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याशिवाय दुर्गा पूजा मंडळाना वीज दरात ६० टक्के सवलत मिळणार आहे. यंदा मिळालेली वाढ ही मागील ग्रँटच्या तुलनेत १० टक्क्यांहून अधिक आहे. त्याचप्रमाणे १ सप्टेंबर रोजी कोलकात्यात भव्य रॅली काढण्यात येईल. यूनेस्कोने दुर्गा पूजेचा समावेश मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशात केल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. “यंदा १ सप्टेंबरपासून पूजेचा जल्लोष सुरू होईल. देशभरातून लोक पूजेची भव्यता अनुभवायला येत असतात. यावेळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुका राजकीय स्वरूपाच्या नसतील,” अशी माहिती बॅनर्जी यांनी दिली. मुख्य उत्सवाची सुरुवात १ ऑक्टोबरपासून होणार असून ५ ऑक्टोबरपर्यंत चालेल.
कोलकत्यात सामूहिक पूजा अतिशय लोकप्रिय आहेत. यामध्ये सहभागी पूजा समित्यांमध्ये छेटला अगरानी (मंत्री फिरहाद हकीम), सुरूची संघ (मंत्री अरुप बिसवास), नाकताला उद्यान संघ (माजी मंत्री पार्थ चटर्जी), हिंदुस्थान क्लब (मंत्री चंदरीमा भट्टाचार्य), त्रिधारा अकलबोधन (आमदार देबाशीष कुमार) आणि श्रीभूमी स्पोर्टिंग (मंत्री सुजीत बोस) चा समावेश आहे. २०१६ पासून सरकारने दुर्गा पूजा महोत्सवाचे आयोजन रेड रोडवर करण्याचे निश्चित केले असून विसर्जनापूर्वी ७० हून अधिक लोकप्रिय आयोजकांच्या मूर्तींची मिरवणूक काढण्यात येते. ग्रँट वाढवून चटर्जी आणि मोंडल यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीवरून सरकार जनतेचे लक्ष हटवू पाहत असल्याच्या आरोप विरोधकांनी केला आहे.