नागपूर : नागपूरमधील संघाशी संबंधित राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना एका व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न भाजप नेत्यांनी केले. पण त्याला यश येताना दिसत नसल्याने मोदींच्या ऐवजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रित करून पुन्हा ‘भागवत-शहा’ यांना एका व्यासपीठावर असा योग जुळवून आणण्याचा प्रयत्न झाला. पण ऐनवेळी शहा यांचाही दौरा अचानक रद्द झाला.

डॉ. आबाजी थत्ते सेवा व संशोधन संस्थेद्वारे संचालित राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पणासाठी २७ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना एका व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. २०२० मध्ये अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाला हे दोन्ही नेते एकत्रित होते. त्यानंतर प्रथमच मोदी आणि भागवत या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार होते. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि आता कर्नाटक राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता या कार्यक्रमाला राजकीय महत्त्व होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे होते. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतल्याने आणि सरसंघचालकांची वेळ निश्चित झाल्याने पंतप्रधान कार्यक्रमाला येतील, असाच विश्वास आयोजकांसह भाजप नेत्यांनाही होता. फडणवीस यांचाही मोदींची वेळ घेण्यासाठी पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू होता. ‘पंतप्रधान कार्यालयाकडे वेळ मागितली आहे’ असे फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र शेवटच्या क्षणी वेळ मिळेल असे गृहीत धरून कार्यक्रमाच्या तयारीला एक महिन्यापासून सुरुवातही झाली होती. त्यामुळे या कार्यक्रमाची माध्यमांमध्येही चर्चा झाली. परंतु अचानक केंद्रीय गृहमंत्री या कार्यक्रमाला येणार, असे जाहीर झाल्याने पंतप्रधान येणार नाहीत हे स्पष्ट झाले. भाजप नेत्यांचा हिरमोड झाला.

हेही वाचा – खरगेंचा संयम सुटल्यामुळे भाजपची खेळी यशस्वी!

अमित शहा-भागवत यानिमित्ताने एका व्यासपीठावर येणार असल्याने आणि मोदीनंतर शहा हे केंद्रातील दुसरे प्रभावी नेते असल्याने या कार्यक्रमाला महत्त्व होतेच. अधिकृत कार्यक्रमानुसार शहा एक दिवस आधीच नागपूरमध्ये येणार होते. परंतु बुधवारी उशिरा रात्री शहा यांचा दौरा रद्द झाल्याची बातमी आली. सरसंघचाल-मोदी यांना एका व्यासपीठावर आणण्याचे कसोशीने प्रयत्न करूनही भाजप नेत्यांना हा योग जुळवून आणता आला नाही. तो जुळला असता तर नागपूर हे या कार्यक्रमाचे साक्षीदार ठरले असते. कारण शहा यांनी त्यांच्या अलीकडच्या नागपूर दौऱ्यात स्मृतीमंदिराला भेट देऊन संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ नंतर अनेक वेळा नागपूर दौरा केला. पण त्यांनी संघ मुख्यालयाला किंवा स्मृती मंदिराला भेट दिली नव्हती. २०१३ मध्ये त्यांनी नागपूरमध्ये संघ मुख्यालयाला भेट दिली होती. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यावर मोदी यांनी १० मे २०१४ ला दिल्लीत सरसंघचालकांची भेट घेतली होती. त्यानंतर राममंदिर भूमिपूजनाचा कार्यक्राचा अपवाद सोडला तर मोदी-भागवत एका व्यासपीठावर दिसले नाहीत.

हेही वाचा – वोक्कलिग मतदारांना आकर्षित करण्यासाठी योगी आदित्यनाथ प्रचार मैदानात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्करोगावर उपचार करणारे अत्याधुनिक रुग्णालय

देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेली कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्य भारतातील कर्करोग रुग्णांसाठी वरदान ठरणारी आहे. एकूण २५ एकर परिसरात साडेसात लाख चौरस फूट जागेवर रुग्णालयाचे बांधकाम आहे. त्यात ४७० खाटांची व्यवस्था असून बाल रुग्णांसाठीचा २७ स्वतंत्र वॉर्ड आहेत. दुर्धर आजारावर प्रभावी वैद्यकीय उपचाराची सवलतीच्या दरात येथे सोय आहे. २८ फेब्रुवारी २०१५ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रुग्णालयाचे भूमिपूजन झाले होते. पहिल्या टप्प्याचे उद्घाटन २०१७ मध्ये पद्मविभूषण रतन टाटा यांच्या हस्ते झाले होते. विप्रोचे माजी अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी या रुग्णालयाला भेट देऊन व्यवस्थेचे कौतुक केले होते.