PM Narendra Modi Government Cabinet Expansion 2025 : ९ जून २०२४ रोजी नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळेल याची उत्सुकता सगळ्यांना होती. त्यावेळी भाजपाने धक्कातंत्राचा वापर करीत जुन्या नेत्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली. आता मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा एकदा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठी पक्षात सुरू असलेल्या संघटनात्मक हालचाली, तसेच सोमवारी करण्यात आलेल्या तिन्ही नव्या राज्यपालांच्या नियुक्त्या हे सर्व मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या तयारीचा भाग असल्याचं वृत्त ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने दिलं आहे.

नुकतीच केंद्र सरकारने हरियाणा व गोवा या दोन राज्यातील नवीन राज्यपालांची नियुक्ती केली. त्याशिवाय लडाखसाठी उपराज्यपालांची नेमणूकही करण्यात आली. या नियुक्त्यांच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने राज्यसभेसाठी चार नामनिर्देशित खासदारांची नियुक्ती केली होती. ज्यामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम, मीनाक्षी जैन, हर्षवर्धन श्रृंगला आणि के. सदानंदन मास्टर यांचा समावेश होता. हर्षवर्धन श्रृंगला हे माजी परराष्ट्र सचिव आहेत. तर, सदानंद मास्टर हे केरळमधील ज्येष्ठ समाजसेवक शिक्षण तज्ज्ञ आहेत. तर, मीनाझी जैन हा प्रसिद्ध इतिहासकार आहेत.

मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत भाजपाचे नेते काय म्हणाले?

भाजपामधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, मागील सरकारमधील महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या बहुतांश मंत्र्यांना मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात त्याच खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. आतापर्यंत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा भर फक्त सलगतेवर होता, मात्र आता परराष्ट्र व्यवहार, व्यापार व वाणिज्य यांसारख्या नव्या मुद्द्यांना प्राधान्य देऊन मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या नव्या टॅरिफ धोरणामुळे ही गरज अधिक स्पष्ट झाली आहे.

आणखी वाचा : भाजपाचे १० ते १५ आमदार फुटणार? ‘या’ राज्यात राजकीय भूकंपाचे संकेत? कारण काय?

मंत्रिपदासाठी कोणकोणते पक्ष इच्छुक?

भाजपातील एका सूत्राने ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, अमेरिकेमधील भारताचे माजी राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यांची राज्यसभेसाठी खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील काही जुन्या मंत्र्यांना मंत्रिपदापासून दूर करून भाजपातील संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपाकडून आपल्या मित्रपक्षांतील काही नेत्यांना मंत्रीपद देण्याच्या तयारीत आहे. ज्यामध्ये, शिवसेना एकनाथ शिंदे गट, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड पक्ष, चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष आणि तेलगू देशम पार्टीचा समावेश आहे.

कोणत्या पक्षाला मिळणार केंद्रात मंत्रीपद

जनता दल युनायटेड व लोकजनशक्ती पार्टी हे बिहारमधील महत्वाचे पक्ष आहेत. यावर्षीच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तिथे विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे जागावाटपाचा मुद्दा सोडविण्यासाठी व मित्रपक्षांना खूश करण्यासाठी या दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. तर तेलगु देशम पार्टीच्या नेतृत्वात भाजपाला दक्षिण भारतातील एकमेव राज्यात सत्तास्थापन करण्यात यश मिळालं आहे. महाराष्ट्रातही अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तेतील भागीदार आहेत. त्यामुळे एनडीएमधील या घटक पक्षांतील नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

pm narendra modi amit shah and jp nadda
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह</figcaption>

कोण होणार भाजपाचे पुढील प्रदेशाध्यक्ष?

भाजपातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या सर्व हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच राज्यपालांच्या नियुक्त्या व भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीवरून बैठका सुरू आहेत. त्यामुळे सर्वात आधी कोणता निर्णय घेतला जाणार हेदेखील पाहावं लागणार आहे. जर मंत्रिमंडळातील फेरबदलाचा निर्णय आधी घेण्यात आला तर एनडीएमधील कोणत्या मित्रपक्षांना केंद्रात मंत्रीपद दिलं जाणार याकडेही अनेकांच्या नजरा आहेत. दरम्यान, भाजपाने आतापर्यंत ३७ पैकी निम्म्याहून अधिक राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे लवकरच जे.पी. नड्डा यांच्या उत्तराधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे.

हेही वाचा : Maharashtra Politics : ठाकरे बंधूंची युती झाल्यास निवडणुकीत कसं जुळणार मतांचं समीकरण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील किती मंत्री?

नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात- नितीन गडकरी (कॅबिनेट मंत्री), पियुष गोयल (कॅबिनेट मंत्री), रक्षा खडसे (राज्यमंत्री), मुरलीधर मोहोळ (राज्यमंत्री), शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव (स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री) यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही केंद्रात मंत्रीपद मिळण्याची इच्छा होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत फक्त एकच जागा जिंकता आल्याने त्यांच्या पक्षाला मंत्रीपद नाकारण्यात आलं होतं, असं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, यावेळच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मंत्रिपदी वर्णी लागू शकते, असा अंदाजही सूत्रांनी वर्तवला आहे.