Congress criticism Modi speech भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. या भाषणात पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. या भाषणात मोदींनी स्वयंसेवक संघाचे तोंड भरून कौतुक केले. त्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधानांनी स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे कौतुक केले आणि राष्ट्रीय सेवेची १०० वर्षांची वाटचाल अतिशय अभिमानास्पद आणि गौरवशाली अध्याय असल्याचे म्हटले. त्यांनी या संस्थेला जगातील सर्वांत मोठी स्वयंसेवी संस्था, असे संबोधले. पंतप्रधान मोदींच्या भाषणाने राजकारण का तापले? विरोधकांनी काय आरोप केले? त्याविषयी जाणून घेऊयात…
पंतप्रधानांनी भाषणात काय म्हटले?
शताब्दी साजरी करीत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विशेष उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला. “येथे गर्वाने सांगू इच्छितो की, १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. व्यक्तिनिर्माणापासून राष्ट्रनिर्माणापर्यंत संघाचे मोठे योगदान आहे. लक्षावधी स्वयंसेवकांनी देशासाठी जीवन समर्पित केले. संघ जगातील सर्वांत मोठी ‘एनजीओ’ आहे”, असे म्हणत पंतप्रधानांनी संघकार्याचे कौतुक केले. काँग्रेस, तसेच डाव्या पक्षांनी संघाच्या उल्लेखावरून पंतप्रधानांवर टीका केली आहे.
काँग्रेसने काय आरोप केले?
- राष्ट्रीय व्यासपीठावरून स्वयंसेवक संघाचा उल्लेख केल्याने यावर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.
- काँग्रेसकडून पंतप्रधानांवर राष्ट्रीय कार्यक्रमाचे राजकारण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी स्वयंसेवक संघाचा उल्लेख घटनात्मक, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाच्या भावनेचे उघड उल्लंघन असल्याचे म्हटले.

त्यांनी ‘एक्स’ एका पोस्टमध्ये आरोप केला की, पंतप्रधानांच्या पुढील महिन्यात येणाऱ्या ७५ व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर, संस्थेला खूश करण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न आहे. त्यातून त्यांनी संघातील अंतर्गत सत्तासंघर्षाकडे लक्ष वेधले.” जयराम रमेश यांनी मोदींच्या भाषणाचे वर्णन ढोंगी, असे केले. काँग्रेसचे आणखी एक खासदार माणिकम टागोर यांनी भारताच्या इतिहासातील स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर टीका केली. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा वसाहतवादाशी लढण्याचा नाही, तर भारतीयांमध्ये द्वेष व फूट पाडण्याचा आहे.” त्यांनी पुढे पंतप्रधानांवर टीका केली आणि म्हटले, “संघर्षापासून अलिप्त राहिलेल्या एका संस्थेसाठी त्यांनी खऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीचा अपमान केला.”
भाजपाची बचावात्मक भूमिका
भाजपाने पंतप्रधानांच्या विधानांचा त्वरित बचाव केला आणि स्वयंसेवक संघाचे समाज आणि राष्ट्रनिर्माणातील योगदान अधोरेखित केले. भाजपाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले की, संस्थेचे अनेक वर्ष चालत आलेले सामाजिक कार्य, आपत्ती निवारण व चारित्र्यविकासाचा विक्रम राष्ट्रीय अभिमानाची बाब आहे. त्यांनी जवाहरलाल नेहरूसह काँग्रेसच्या नेत्यांनीही पूर्वी राष्ट्रनिर्माणातील स्वयंसेवक संघाची भूमिका मान्य केल्याचे दावे केले. त्यांनी काँग्रेसकडून होणाऱ्या या आरोपांना राजकीय प्रेरित हल्ला असल्याचे म्हटले. भाजपा संघाला एक देशभक्त, सेवाभावी संस्था मानतात. मात्र, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष त्याला एक उजव्या विचारसरणीचा, जातीयवादी गट म्हणून दर्शवीत आहेत. या संस्थेने स्वातंत्र्यसंग्रामात कोणतीही महत्त्वाची भूमिका बजावली नाही, असाही त्यांचा आरोप आहे.
ऑपरेशन सिंदूरबाबत मोदी काय म्हणाले?
“ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्यांनी शौर्य आणि पराक्रम दाखवला, त्या सगळ्या वीरांचे कौतुक करण्याची संधी मला मिळाली आहे. शत्रूला त्यांच्या कल्पनेपेक्षाही अधिक शासन करण्याचे काम आपल्या जवानांनी आणि सैन्यदलांनी केले. धर्म विचारून पहलगाममध्ये लोकांना मारले गेलले. पत्नीसमोर पतीला मारले, मुलांसमोर त्यांच्या वडिलांना ठार केले. संपूर्ण हिंदुस्थानात या घटनेने आक्रोश होता. या प्रकाराच्या हल्ल्यामुळे जग हादरून गेले होते; पण ऑपरेशन सिंदूर या आक्रोशाचे उत्तर होते,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले, “२२ एप्रिलनंतर आपण आपल्या सैन्यदलांना कारवाईसाठी पूर्ण सूट दिली होती. रणनीती त्यांनी ठरवावी, वेळ त्यांनी ठरवावी, लक्ष्य त्यांनी ठरवावे व आपल्या सैन्यदलांनी अशी कामगिरी केली, जी अनेक वर्षांत झाली नाही. आपल्या सैन्यदलांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यामुळे पाकिस्तानची झोप अजूनही उडाली आहे.” आता न्यूक्लिअर ब्लॅकमेल कधीही सहन करणार नाही. दहशतवाद माजविणारे आणि दहशतवादाला खतपाणी घालणारे सगळ्यांना एकच मानले जाईल, असा इशाराही मोदींनी दिला.