धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल या राष्ट्रवादीच्या दोन वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात कारवाई झाल्याने शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा त्यांना अभय देणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आता दबाव वाढला आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना एक तर शिवसेनेच्या मंत्र्यांना दुसरा न्याय देता येणार नाही. मंत्र्यांनी वेडेवाकडे केल्यास शिंदे यांनाही कारवाई करणे भाग पडणार आहे.
विधान परिषदेत सभागृह सुरू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे भ्रमणध्वनीवर रमी खेळत असल्याची चित्रफीत आमदार रोहित पवार यांनी प्रसिद्ध केली होती. यावरून बराच गदारोळ झाला. कोकाटे यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात येत होती. दबाव वाढल्याने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्याकडीस कृषि खाते काढून घेतले.

यापूर्वी बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सहकाऱ्यांच्या अटकेनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महायुतीचे सरकार गेल्या डिसेंबरमध्ये स्थापन झाल्यापासून गेल्या आठ महिन्यांत राष्ट्रवादीच्याच दोन मंत्र्यांच्या विरोधात कारवाई झाली. मुंडे यांचा राजीनाा तर कोकाटे यांचे कृषि खाते काढून घेण्यात आले.

राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेचेही मंत्री विविध कारणांनी वादग्रस्त ठरले आहेत. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीसाठी हाॅटेल लिलावाची किंमत कमी करण्यात आल्याचा आरोप झाला होता. तसेच शिरसाट हे घरात बसले असताना नोटांनी भरलेली बॅग समोर दिसत असल्याची चित्रफीत समाज माध्यमांमध्ये समोर आली.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या डान्सबारवर पोलिसांचा पडलेला छापा विधान परिषदेत गाजला. जलसंधारणमंत्री संजय राठोड यांच्या खात्यातील बदल्या आणि सुधारित प्रशासकीय मान्यता यातून झालेला गैरव्यवहार हे प्रकरण गाजले. वादग्रस्त ठरलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांनी सतत पाठीशीच घातले. मंत्र्यांना दुखावण्याचे शिंदे यांनी आतापर्यंत टाळले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यावर सुरुवातीला अजित पवारांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंडे यांचा काहीही संंबंध नाही, असा युक्तिवाद केला होता. पण मुंडे यांच्या सहकाऱ्यांनी ज्या निर्दय पद्दतीने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्याची छायाचित्रे समोर येताच भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली. त्यातून अजित पवारांचाही नाईलाज झाला. शेवटी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. राजीनामा घेण्यात आला तरी मुंडे यांना सत्तेशिवाय स्वस्थ बसवत नाही.

सरकारी निवासस्थानही त्यांनी अद्याप सोडलेले नाही. कोकाटे यांच्या विरोधातील कारवाईचा निर्णय मात्र अजित पवारांनीच घेतला. वास्तविक, खोटी कागदपत्रे सादर केल्याचे न्यायालायत सिद्ध होऊन दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली तेव्हाच कोकाटे यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते. पण तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याचे सांगत त्यांचे समर्थन केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकाटे यांनी गेल्या पाच-सहा महिन्यांत अनेक वादग्रस्त विधाने केली होती. त्यावरूनही त्यांच्या विरोधात नाराजी होती. शेवटी कोकाटे यांचे कृषि खाते काढून त्यांच्याकडे क्रीडा हे तुलनेत दुय्यम दर्जाचे खाते सोपविण्यात आले. राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांच्या विरोधात झालेल्चा कारवाईनंतर वादग्रस्त ठरलेल्या किंवा भविष्यात गडबड करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांना पाठीशी घालता येणार नाही.