पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यावरील पकड ढिली करण्यासाठी आता भाजपने अजित पवार यांना ‘लक्ष्य’ करण्यास सुरुवात केली आहे. भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आणि पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप या दोन माजी आमदारांना पक्षप्रवेश दिल्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाकडे असलेले इंदापूरमधील प्रवीण माने यांना भाजपने आपल्याकडे घेऊन पक्षवाढीला चालना दिली. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या कट्टर प्रतिस्पर्धींना राजकीय पाठबळ देण्याची व्यूहरचना भाजपने आखली असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या प्रभाग रचनेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्राबल्य असलेला प्रभाग ताेडून अजित पवार यांची ताकद कमकूवत केली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद कमी करण्यासाठी भाजपने पवार यांचे राजकीय वैर असलेल्या नेतृत्त्वाला पाठबळ देण्याची राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला ४०२ कोटी रुपयांची कर्जहमी देण्यास अजित पवार यांचा विरोध असतानाही कर्जहमीचा निर्णय घेण्यात आला. पवार आणि थोपटे कुटुंबाचे अनेक वर्षांपासूनचे वैर आहे. या मतदार संघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर भरेकर हे आमदार आहेत. तरीही थोपटे यांच्या पाठिशी राहून भाजपने अजित पवार यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. या मतदार संघातील भोर नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींवर थोपटे यांचे प्राबल्य आहे. त्यामाध्यमातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांची भाजपकडून कोंडी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पुरंदर विधानसभा मतदार संघात भाजपला आतापर्यंत शिरकाव करण्यास संधी मिळत नव्हती. काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांच्यामुळे ही संधी मिळाली. पुरंदरमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाचे विजय शिवतारे हे आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने संभाजी झेंडे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे जगताप यांना फटका बसला. त्यामुळे जगताप आणि अजित पवार यांच्यातही फारसे सख्य नसल्याचे पाहून भाजपने जगताप यांना पाठबळ देण्यास सुरुवात केली आहे. या मतदार संघात नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अजित पवार हे भूसंपादनासाठी आग्रही आहेत. मात्र, स्थानिक नागरिकांचा विरोध पाहून भूसंपादनातून काही गावांतील क्षेत्र कमी करण्यात आले आहे. या परिसरात जगताप यांचा संपर्क असल्याने या प्रकल्पाच्या माध्यमातून भाजपकडून जगताप यांना पाठबळ देण्यात येत असल्याची चर्चा आहे.
इंदापूर विधानसभा मतदार संघातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात गेल्यानंतर या भागात प्रभाव असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रवीण माने यांना भाजपने पक्षात घेतले आहे. त्यामुळे या ठिकाणी अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे.
बारामती लोकसभा मतदार संघामध्ये असलेल्या सहा विधानसभा मतदार संघांपैकी भोर, पुरंदर आणि इंदापूर या तीन मतदार संघात अजित पवार यांना भाजपकडून कोंडीत पकडण्यात आले आहे. उर्वरित खडकवासला आणि दौंड या विधानसभा मतदार संघात अनुक्रमे भीमराव तापकीर आणि राहुल कुल हे दोन भाजपचे आमदार आहेत.
बारामती विधानसभा मतदार संघ वगळता अन्य मतदार संघातील डावपेच यशस्वी झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांमध्येही भाजपने अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ची अडचण केली आहे. पुणे महापालिकेच्या उपनगरी भागात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची ताकद आहे. मात्र, त्या ठिकाणच्या प्रभागांना शहरी भाग जोडून भाजपने कुरघोडी केल्याची चर्चा आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेत काहीही बदल करण्यात आलेला नाही. ही प्रभाग रचना भाजपसाठी अनुकूल आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत भाजपची सत्ता आली. आता तीच प्रभाग रचना असल्याने अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ची अडचण झाली आहे. या ठिकाणी भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना पाठबळ आहे. त्यामुळे लांडगे हे थेट अजित पवार यांच्यावर टीका करत असतात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने अजित पवार यांना ‘लक्ष्य’ केले असल्याने महायुतीतील या दोन मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.