Punjab BJP President Sunil Jakhar resignation : पंजाब भाजपाचे कोणी प्रदेशाध्यक्ष आहेत की नाही? असा प्रश्न राज्यातील भाजपा नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पडला आहे. प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत सर्वांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच राज्यात पक्षाचं नेतृत्व कोण करणार, सध्या पक्षाची कमान नेमकं कोण सांभाळतंय याबाबत सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये पंजाब भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर पक्षाच्या राज्य पातळीवरील विविध बैठकांमध्ये ते दिसले नाहीत. परंतु, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यावर फारसं भाष्य केलं नाही. त्याचबरोबर, समाजमाध्यमांवर नेहमी सक्रीय असणाऱ्या जाखड यांनी देखील राजीनाम्याबाबत कोणतीही पोस्ट केली नाही किंवा त्यांनी राजीनाम्याबाबतच्या वृत्तांवर मौन बाळगणं पसंत केलं. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याबाबत सर्वांच्याच मनात संभ्रम होता.

दरम्यान, १७ ऑक्टोबर रोजी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचा शपथविधी पार पडला. यावेळी चंदीगड विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जाखड विमानतळावर पुष्पगुच्छ घेऊन हजर होते. त्यांनी मोदींचं स्वागत केलं, त्यांच्याशी हस्तांदोलनही केलं. त्यानंतर जाखड यांच्या राजीनाम्याबाबतच्या बातम्या मागे पडल्या. लोकांच्या मनातील शंका दूर झाली. मात्र, गेल्या महिन्यात प्रसारमाध्यमांशी बातचीत करत असताना जाखड यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. १४ नोव्हेंबर रोजी प्रसारमाध्यमांसमोबर जाखड म्हणाले की “मी सहा महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जूनमध्येच मी राजीनामा दिला आहे. राज्यात माझ्या नेतृत्वाखाली भाजपाला लोकसभेची एकही जागा जिंकता आली नाही. त्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत मी राजीनामा दिला आहे”.

हे ही वाचा >> Delhi Election 2025 : आम आदमी पक्षासाठी I-PAC मैदानात; दिल्ली विधानसभा निवडणुकीची समीकरणं बदलणार?

राज्यात राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, ती भरू काढायला हवी : जाखड

एकीकडे राजीनाम्याचं वृत्त स्वीकारलं तर दुसऱ्या बाजूला शनिवारी जाखड यांनी एक्सवर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की पंजाबमध्ये जनतेच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी मजबूत विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. पंजाबमध्ये आप सत्तेत आहे व काँग्रेस विरोधात, तरी त्यांनी काँग्रेसची हातमिळवणी केली आहे. दोन्ही पक्ष धान खरेदीसारख्या राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलतच नाहीत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर दोन्ही पक्ष गंभीर नाहीत. त्यामुळे राज्यात एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्याची वेळ आली आहे.

हे ही वाचा >> महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला ? रोहिणी खडसे यांचा एकनाथ शिंदे यांना कवितेतून चिमटा

प्रदेशाध्यक्षपदावरून पंजाब भाजपात दोन गट

दुसऱ्या बाजूला सुनील जाखड यांच्या राजीनाम्यावर भाजपा नेतृत्त्वाने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच त्यांनी नव्या प्रदेशाध्यक्षांची नेमणूकही केलेली नाही. पंजाब भाजपात प्रदेशाध्यक्षपदावरून दोन गट पडले आहेत. यापैकी एका गटाची मागणी आहे की वरिष्ठांनी पुन्हा एकदा या पदावर सुनील जाखड यांचीच नेमणूक करावी. तर दुसऱ्या गटाचा जाखड यांना विरोध आहे. जाखड हे दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून आले आहेत. त्यामुळे पक्षातील जुन्या निष्ठावंतांचा त्यांना विरोध आहे. त्यांच्यापैकी काहीजण नेतृत्व करण्यास इच्छूक आहेत.

हे ही वाचा >> संसदेचे अधिवेशन दक्षिणेतील राज्यात घेणे शक्य? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वाजपेयी यांनी दिला होता पाठिंबा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जाखड परत येतील व पक्षाची धुरा सांभाळतील”, सहकाऱ्यांना विश्वास

जाखड यांच्या राजीनाम्यावर त्यांनी स्वतःच शिक्कामोर्तब केल्यानंतरही भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अनिल सरीन म्हणाले, “जाखड हे अजूनही आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ते लवकरच पक्षाच्या बैठकांमध्ये दिसतील. त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा राजीनामा सादर केला होता. मात्र ते आमचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. भाजपा हा संघटना-आधारित पक्ष आहे. एखाद्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत संघटनेचं काम चालूच राहतं. मी देखील पक्षापासून काही दिवस दूर राहिलो तरी पक्षाचं काम चालूच राहणार. त्यात कुठलाही खंड पडणार नाही. सुनील जाखड लवकरच पक्षाच्या जाहीर सभांमध्ये महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावर दिसतील. गेल्या काही महिन्यांत ते त्यांच्या वैयक्तिक गोष्टींमुळे पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये दिसले नव्हते. मात्र आता ते हिरहिरीने सहभागी होतील.