नगरः नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांसमोर सादर केलेला माफीनामा आणि त्यानंतर लगेचच महसूल मंत्री तसा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नाराज माजीमंत्री, आमदार राम शिंदे यांची घेतलेली बंद दरवाजाआडची भेट यानंतरही भाजपमधील निष्ठावंतांची नाराजी कायम आहे. आमदार राम शिंदे यांनी तसा सूरही आळवला आहे. त्यामुळे भाजपमधील विखे पितापुत्र व निष्ठावंत यांच्यामधील दिलजमाईसाठी पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीची प्रतिक्षा निर्माण झाली आहे. भाजपमधील हा वाद अद्यापि कायम आहे व लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तो पुन्हा उफाळला याचाच अर्थ फडणवीस यांनी याकडे केलेले दुर्लक्ष.

गेल्या पाच वर्षात घडलेल्या विविध घटनांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतरच माझी नाराजी कोणत्या मुद्द्यावर आहे, हे स्पष्ट करेल. या मुद्द्यांचे निरसन होणे आवश्यक आहे. असे सांगतानाच आमदार राम शिंदे यांनी उमेदवाराचे तिकीट एकदा जाहीर झाल्यानंतर जाहीर माफी मागण्याची वेळ यायला नको होती. मंत्री विखे यांनी माझ्याशी चर्चा केली. या चर्चेत मी काही मुद्दे उपस्थित केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा – बच्‍चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?

आमदार शिंदे यांची मंत्री विखे यांनी घेतलेल्या बंदद्वार भेटीनंतर विखे व फडणवीस यांची मुंबईत भेटही झाली मात्र अद्यापी फडणवीस-विखे-शिंदे अशी एकत्रित भेट झालेली नाही. भाजपमधील वादाचा हा प्रश्न केवळ आमदार शिंदे यांच्यापुरता मर्यादित नाही तर तो जिल्हा भाजप, नगर व शिर्डी लोकसभा, आगामी विधानसभा निवडणूक यांच्याशीही जोडलेला आहे. त्यामुळेच त्यातून कसा मार्ग निघतो, याकडे पक्ष कार्यकर्त्यांचेही लक्ष लागलेले आहे. राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतरच या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न होतील, असे दिसते.

हेही वाचा – सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली

विखे पितापुत्रांच्या कार्यपद्धतीवर भाजपमधील निष्ठावंत आणि त्याचा फटका बसलेले असे नाराज यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आमदार शिंदे यांना स्वीकारणे त्यांच्यासाठी अपरिहार्य बनले आहे. कारण स्वतः राम शिंदे यांचा या दोन्ही गटात समावेश होतो. त्यामुळेच भाजपमधील वादाचा हा तिढा केवळ शिंदे किंवा त्यांच्याकडून हिसकावला गेलेला पूर्वाश्रमीचा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील गेल्या पाच वर्षातील घडामोडींशी संबंधित राहिलेला नाही तर कमी-अधिक प्रमाणात सर्वच विधानसभा मतदारसंघात त्याची अशाच स्वरुपाची लागण झालेली आहे. त्याला जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे जाहीररित्या तोंड फोडलेले आहे.

हेही वाचा – मुलाच्या ‘कल्याणा’साठी मुख्यमंत्र्यांचे सारे काही

नगर शहरात तर निष्ठावंतांची कुचंबणा अधिक झालेली आहे. खासदार विखे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यातील सख्य निष्ठावंतांसाठी ठसठसणारी जखम बनली होती. परंतु महायुतीत अजितदादा गट आणि या गटात आमदार जगताप सहभागी असल्याने आता निष्टावंतांना तक्रार करण्याची सोयही राहीलेली नाही. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतरही काही विधानसभा मतदारसंघात झालेली आहे. म्हणूनच विखे-शिंदे यांच्यातील वादाच्या तोडग्याकडे भाजप कार्यकर्त्यांचेही लक्ष लागलेले आहे.