अहिल्यानगर:संगमनेरमध्ये काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात व मूळचे भाजप परंतु आता शिंदे गटाचे आमदार असलेले अमोल खताळ यांच्यामध्ये पुन्हा राजकीय वाद भडकला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काहीसा थंडावलेला दोघांमधील राजकीय वाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच पुन्हा पेटला आहे.
नव्याने पेटलेल्या राजकीय वादात आश्चर्यकारक गोष्ट एकच, जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे पुत्र माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी अद्याप कोणतेही न केलेले वक्तव्य. नव्या वादात विखे यांची आत्तापर्यंतची अलिप्तता हा एक चर्चेचा विषय!.
काही दिवसांपूर्वी संगमनेरजवळील घुलेवाडी येथे संग्राम बापू भंडारे या महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. कीर्तनाच्या कार्यक्रमातून धार्मिकतेचे तरंग निर्माण होण्याऐवजी राजकीय वादळ निर्माण झाले. त्यातून थोरात-खताळ यांच्यामध्ये रास्ता रोको, मोर्चा अशा आंदोलनाच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप असे प्रकार घडत आहेत. समाजमाध्यमांवर त्याचे पडसाद उमटत आहेत. त्याची पातळी खालच्या स्तरावर जाऊ लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात हिंदू आक्रोश मोर्चेही होत आहेत. त्यामध्ये विविध महाराज, साधू सहभागी होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याचे संकेत आहेत, हे लक्षात घेऊन पुन्हा एकदा ध्रुवीकरणाचा घाट घातलेला दिसतो. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शाहू-फुले आंबेडकरांची विचारधारा असल्याचे सांगत असले तरी त्यांच्याच पक्षातील नगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांनी नवी हिंदुत्ववादाची आक्रमक भूमिका घेतली आहे. केवळ नगर शहरच नाही तर जिल्ह्याबाहेर जाऊनही ते हिंदुत्ववदाची आक्रमक भूमिका मांडू लागले आहेत. जगताप यांनीही संगमनेरमधील वादावरही हिंदुत्ववाद्यांच्या बाजूने प्रतिक्रिया व्यक्त केली. संग्रामबापू भंडारे यांनी नथूराम गोडसे यांचा उल्लेख करुन केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद आता राज्य पातळीवर गेला आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरात व त्यांचे समर्थक काहीसे ‘बॅकफुट’वर गेले होते. घुलेवाडीतील घटनेने त्यांना पुन्हा एकदा आक्रमक होण्याची संधी मिळाली. थोरात यांचा पराभव झाला असला तरी तालुक्यातील सहकारावर त्यांची पूर्ण वर्चस्व आहे. या सहकारी संस्थांचे मुख्यालये घुलेवाडी येथेच आहेत. तेथेच कीर्तनाचा कार्यक्रम होता. त्यामुळे थोरात यांना आक्रमक होणे भागच होते. त्याचेच प्रत्यंतर गेल्या दोन-तीन दिवसांतील घटनांतून दिसत आहे. थोरात तसे मावळ स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. थोरात यांची ही आक्रमक भूमिका त्यांच्या पक्षाला जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी उपयोगी ठरू शकते.
जिल्ह्यातील थोरात-विखे राजकीय वाद हा राज्याला परिचित व गाजणारा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री विखे यांचे संगमनेर परिसरात दौरे वाढलेले आहेत. विखे अलीकडच्या काळात जिल्ह्यात इतर ठिकाणी क्वचितच दौरे करताना दिसतात. तुलनेत संगमनेर परिसरात त्यांचे दौरे मोठ्या संख्येने होत आहेत. आमदार खताळ हे तसे विखे यांच्या पाठबळातूनच निवडून आले. स्वतः खताळ हे देखील ते मान्य करतात. असे असले तरी घुलेवाडीतील धार्मिक कार्यक्रमातून निर्माण झालेले राजकीय वादात पालकमंत्री विखे व त्यांचे चिरंजीव माजी खासदार विखे यांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. संगमनेरमधील या वादंगात हीच खरी आश्चर्यकारक घटना ठरत आहे.