शिवसेनेतील बंडानंतर तुमची पहिलीच निवडणुक होत आहे, या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता ?

हो खर आहे, शिवसेनेत झालेल्या गद्दारीनंतर पहिल्याच निवडणुकीला मी सामोरे जात आहे. त्यामुळे आता ही निवडणूक गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशीच आहे. आम्ही बाळासाहेबांचे, मातोश्रीचे एकनिष्ठ शिवसैनिक होतो, आहोत आणि यापुढे ही राहणार. ज्या पक्षाने सर्व काही दिले, त्या पक्षाच्या विरोधात गद्दार गटाचे बोलण्याचे धाडस होतेच कसे ? त्यामुळे आता ही आमची खरी लढाई आहे..

विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक होण्याऐवजी यंदाही आनंद दिघे यांच्या नावानेच निवडणुक प्रचार होताना दिसून येतो, याबद्दल काय सांगाल?

निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावरच व्हायला हव्यात. ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर या ठिकाणी १० वर्षात केलेली विकासकामे मी जनतेसमोर घेऊन जात आहे. गद्दार गटाकडे विकासाचे मुद्देच नसल्याने आमच्या आनंद दिघे यांच्या नावाचा प्रचार त्यांनी सुरू केला आहे. मुळात आनंद दिघे साहेब असते तर त्यांना ही गद्दारी मान्यच झाली नसती, असा माझा विश्वास आहे. आनंद दिघे याचे आनंदाश्रम हडपणाऱ्यांना या निवडणुकीत जनता नक्कीच धडा शिकवेल. आनंद दिघे यांच्या नावाने फक्त मत मागायची आणि खोटे सिनेमा काढून सहनभुती कशी मिळवता येईल यासाठी त्याचे प्रयत्न राहिले आहेत.

आणखी वाचा-भाजपा हरियाणात एका मध्ययुगीन मुस्लीम राजाचा उदो-उदो का करत आहे?

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, शिवसेनेतील दुभंगानंतर मुख्यमंत्री ठाणेकर असल्यामुळे ही निवडणूक तुम्हाला सोपू जाईल असे वाटते का?

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो गद्दार गटाचा नाही. ज्यांनी सोन्यासारखा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, नाव चोरले त्यांना नैतिक अधिकार नाही. कोणतीच निवडणूक सोपी नसते. गद्दार गटाकडे सत्ता आहे, पैसा आहे, यंत्रणा आहे. त्यामुळे साम,दाम,दंड,भेद वापरून शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून, दमदाट्या करून ही निवडणूक त्यांच्याकडून लढली जात आहे. ठाणेकर जनता सुज्ञ आहे, मतदार हुशार आहेत. या निवडणूकीत नक्कीच धडा शिकवतील असा विश्वास मला आहे.

या निवडणूकीत तुम्हाला महत्वाचा मुद्दा काय वाटतो, त्याकडे तुम्ही कसे पाहता ?

माझ्या आयुष्यात पहिली निवडणूक मी अशी पाहतो आहे की सत्ताधाऱ्यांना नागरीक, मतदार कंटाळले आहेत. ९० टक्के लोक भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे ही निवडणुक संविधान वाचण्यासाठी, राष्ट्रहितासाठी, देश प्रेमासाठी आहे. हाच महत्वाचा फॅक्टर असून धर्म, जात, पंथ यांच्यात वाढलेला दुरावा कमी करण्यासाठी हीच निवडणुक योग्य ठरणार आहे..

आणखी वाचा- Queen Vs Shehzada: कंगणा रणौत आणि विक्रमादित्य सिंह यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा निवडणुकीवर काय परिणाम होणार?

तुमचा प्राधान्यक्रम कशाला असेल ?

सर्वप्रथम ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्टेशनचे काम पूर्ण करून ठाणेकरांना नवीन स्टेशन उपलब्ध करून देणार तसेच ठाण्यात लवकरात लवकर मेट्रो सुरु करणार ,शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरा बाहेरून बाह्य वळण रस्त्यांची निर्मिती , जलवाहतूक प्रकल्प मार्गी लावणार तसेच शहरातील पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी योग्य नियोजन करून नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका करणार. भविष्यात होणारी पाणीटंचाई टाळण्यासाठी व शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य नियोजन करणार आहे. नवी मुंबईत कळवा एलिवेटेड नवीन रेल्वे स्टेशनची निर्मिती करून सदर प्रकल्प मार्गी लावणार, ऐरोली -कटाई नाका मार्ग, घणसोली ऐरोली जोड रस्ता, पर्यटन स्थळांचा विकास, आंतरराष्ट्रीय विमानतळ, भूमिपुत्रांचे मार्गी लावलेले प्रश्नांची योग्य अंमलबजावणी. मीरा-भाईंदर रेल्वे स्थानकांचा विकास, मेट्रो मार्ग सुरू करणार, सूर्या धरण प्रकल्प मार्गी लावून पाणी समस्या दूर करणार,मच्छीमारांना अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहे.