सुमारे चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत ५५ वर्षीय भाजपा नेते कृष्णकुमार जानू यांनी अनेक भूमिका निभावल्या आहेत. शेतकरी, पत्रकार, जाट महासभा नेते, एबीव्हीपी आणि विहिंप नेते तसेच भाजपा उमेदवार व पक्षाचे राजस्थानचे प्रवक्ते, अशी जानू यांची राजकीय कारकीर्द आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या बहुतांश काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वेगवेगळ्या स्वरूपात संलग्न होते. मात्र, ८ ऑगस्ट रोजी पहिल्यांदाच कृष्णकुमार जानू हे राष्ट्रीय माध्यमांमध्ये झळकले. त्याचे कारण मात्र मुळीच आनंदी होण्यासारखे नव्हते. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यावर आणि स्वपक्षावर टीका केल्यामुळे त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर मोठी कारवाई केली. टीका करणाऱ्या त्यांच्या व्हिडीओमुळे त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. कृष्णकुमार जानू हे जाट समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. जानू यांच्या त्या व्हिडीओमध्ये ते भाजपाच्या जाट नेत्यांवर आक्षेपार्ह विधान करीत होते आणि त्यांना आवाज उठवण्याचे आवाहन करत होते.
“भाजपाला बहिरे आणि मुके नेते हवेत”
“मला मोकळेपणानं बोलायची सवय आहे. मला वाटतं की, पक्ष चुकीच्या बाजूला आहे; मग ते धनखड यांचं प्रकरण असो वा सत्यपाल मलिक यांचं. म्हणूनच मी या सूडाच्या राजकारणाविरोधात बोललो आणि लिहिलं. जर भाजपामधील जाट बोलू शकत नसतील, तर पक्षात राहण्याचा काय उपयोग? समुदायाचं ते काय भलं करतील जर त्यांना बोलण्याची मुभाच नसेल. मी भाजपाला प्रश्न विचारत नाही, तर पक्षातील जाट नेत्यांना मग ते खासदार असोत वा आमदार, त्यांना प्रश्न विचारले. पण, माझ्या हकालपट्टीचा अर्थ असा होतो की, पक्षाला बोलणारे नव्हे, तर बहिरे आणि मुके लोक हवे आहेत”, अशी प्रतिक्रिया जानू यांनी हकालपट्टी केल्यानंतर दी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा निरोप समारंभ न करण्याचा निर्णयही लाजिरवाणा असल्याचे सांगत जानू म्हणाले, “मृत व्यक्तीवर सूड उगवणं आणि त्यांना कफन म्हणून तिरंगा न देणं ही तर निर्लज्जतेची परिसीमा आहे. एकदा माणसाचा मृत्यू झाला की,सर्व वादविवादही संपतात, असं आपल्या संस्कृतीत म्हटलं आहे. तुम्ही अशा व्यक्तीचा अपमान करत आहात, ज्यांनी आमदार, मंत्री , पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व काही राज्यांचे राज्यपाल म्हणून काम केले. ही संकुचित मानसिकतेची व्याख्या आहे. ही खूप दु:खद बाब आहे.”
कोण आहेत कृष्णकुमार जानू?
जानू यांच्या या विधानामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली असली तरी त्यांच्या कुटुंबाचा वारसा स्वातंत्र्यसैनिक सरदार हरलाल सिंग यांच्याशी जोडलेला आहे. कृष्णकुमार जानू हे जाट नेते होते आणि स्वतंत्र भारतातील राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे पहिले अध्यक्ष होते. सिंग यांनी १९८६ मध्ये संघाची विचारधारा अवलंबली होती. ते सुमारे १० वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ सदस्य होते. शेखावाटी विभाग आणि बिकानेर इथे ते संघटन मंत्रीपदावर होते. त्यानंतर ते राज्य पातळीवरील सहमंत्री पदापर्यंत पोहोचले आणि एबीव्हीपीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे चार वर्षे सदस्य राहिले.
त्यांनी चुरू येथे डिपार्टमेंटल स्टोअर आणि आय टीव्ही हे न्यूज चॅनेल चालवले. २००३ मध्ये झुंझुनूच्या मंडावा विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली; मात्र ते पाचव्या क्रमांकावर राहिले.
त्यावेळी जानू यांनी म्हटले होते की, ज्येष्ठ भाजपा नेते राजेंद्र राठोड विद्यार्थी राजकारणाच्या काळापासूनच त्यांच्याविरोधात होते आणि उमेदवारी मिळाल्यावरही त्यांनी विरोधच केला. त्यानंतर जानू यांनी सुमारे पाच वर्षे विश्व हिंदू परिषदेत काम केले आणि ते जयपूर प्रदेशासाठी सहप्रभारी होते. जोधपूर व चित्तौड येथे त्यांच्यावर अनुसूचित जाती-जमातींसह विविध जाती आणि समुदायांमध्ये ऐक्य साधण्याची जबाबदारी होती. नंतर ते भाजपामध्ये सक्रिय झाले. नंतर त्यांना पहिल्यांदाच मीडिया पॅनेलिस्ट आणि २०२२ मध्ये पक्षाचे प्रवक्ते म्हणून नियुक्त करण्यात आले.
“खरं बोलल्यामुळे बक्षीस म्हणून माझी पक्षातून हकालपट्टी केल्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो. माझा पक्ष चुकीच्या दिशेनं जात असेल,तर मी प्रश्न विचारतच राहीन. मला मीडिया क्षेत्रातील अनुभव असल्यामुळे मी पुन्हा माध्यमांमध्ये सामील होईन आणि माझे मुद्दे मांडेन. पक्षातील विसंगती उघड करत राहीन”, असे जानू यांनी हकालपट्टीनंतर म्हटले. एवढंच नाही, तर भाजपाला आपल्या कृतीचा फटका येत्या पंचायत निवडणुकीत बसेल, असा दावाही जानू यांनी केला. “पक्षानं चूक केली आहे याची जाणीव करून देणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे. पक्षशिस्तीमुळे जे बोलता आलं नाही, ते आता मोकळेपणानं बोलेन. तसेच इतर समुदायांतील नेत्यांना बोलण्याची मुभा असताना त्यांच्यावरच कारवाई का”, असा सवालही त्यांनी केला.
जाट महासभेचे राज्य सचिव म्हणून कुष्णकुमार जानू यांनी काम पाहिले आहे. त्यांनी असेही म्हटले,”मी केवळ जाट समाजातील सदस्यांचा अपमान झाल्याचे मुद्दे मांडले आहेत. विप्र फाउंडेशनचे सदस्य जर पक्षात पदाधिकारी असतील, तसेच स्वर्गीय रामदास अगरवाल भाजपाचे राज्याध्यक्ष होते. करणी सेना व क्षत्रिय युवक संघाचे नेतेही भाजपामध्ये अनेक पदांवर आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणताही आक्षेप घेतला जात नाही. मग जाट समाजातील नेत्याचीच हकालपट्टी करण्याचं राजकारण का केलं गेलं? त्यांना केवळ कमकुवत जाट नेते हे शोभेसाठी म्हणून हवे आहेत. मातीशी जोडलेले कणखर जाट नेते त्यांना नको आहेत.”
“माझा पक्षाशी काही वाद नाही; पण व्यक्तिवादाशी आहे. समाजाचं नेतृत्व कुठे आहे? काँग्रेसचं घराणेशाहीचं राजकारण वाईट असेल, तर भाजपाचा व्यक्तिवादही वाईट आहे. आम्ही २०१४ मध्ये भाजपा सरकार उभं केलं; मात्र २०१९ पर्यंत मोदी यांचंच सरकार राहिलं. मी जी विचारधारा मानतो, त्यात व्यक्ती महत्त्वाची नाही. गुरुजी के. बी. हेडगेवार यांनी स्वत:ला पुढे न ठेवता, परम पवित्र भगवा ध्वज गुरू म्हणून मानण्यास सांगितले. कारण- व्यक्ती कधीही भ्रष्ट होऊ शकते”, असे जानू म्हणाले.
भाजपाचे राजाध्यक्ष मदन राठोड यांनी काही गोष्टी लिहिणे टाळावे, असा सल्ला दिला होता. त्याबाबत बोलताना जानू म्हणाले की, “त्यांनी सांगितलं की, योग्य वेळी चर्चा करावी; पण पक्षात असा वेळच नाही. त्यामुळे फेसबुक मला सर्वांत योग्य वाटतं. माझं लिखाण वाचल्यानंतरच या विषयावर चर्चा झाली, नोटीसही त्यानंतरच देण्यात आली. राज्याच्या बदलत्या राजकारणाबाबत ते म्हणाले की, निवडणुकांना आणखी चार वर्षं आहेत. तोपर्यंत मी पक्षातील माझ्या समाजातील सदस्यांना बोलायला भाग पाडेन.”