वसंत मुंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्ता पदाच्या संधी मिळाल्यानंतरही निष्ठावंत समजले जाणारे नेते, कार्यकर्ते गरजेनुसार पक्षांतर किंवा राजकीय तडजोडी करीत होते. पण गाव पातळीवर काम करणारा राजेश्वर चव्हाण हा तरुण मात्र शरद पवार यांच्यावरील प्रेमापोटी राजकीय अमिषांना बळी न पडता कायम पक्षासोबत राहिला. उच्च शिक्षित असुनही बोलण्यात अस्सल ग्रामीण बाज, विनोदी शैली, मोकळा ढाकळा स्वभावामुळे सर्व दूर संपर्क. परिणामी पक्षातील नेते ‘वचकून’ असल्याने स्थानिक पातळीवर त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. यातूनच राजेश्वर चव्हाण यांच्याकडे राष्ट्रवादी ने जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.

हेही वाचा… देवेंद्र भुयार : शेतकरी आंदोलक ते आमदार

हेही वाचा… अमित साटम : व्यवस्थापन क्षेत्राकडून राजकारणाकडे

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचे हातोला (ता. अंबाजोगाई) येथे प्राथमिक आणि त्यानंतर योगेश्वरी नुतन विद्यालयात शिक्षण झाल्यानंतर वकीलीची पदवी घेताना त्यांनी महाविद्यालयात विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष होऊन राजकारणात पाऊल ठेवले. वडिल बाळासाहेब चव्हाण शेतकरी कामगार पक्षात गाव पातळीवर काम करणारे असले तरी पक्षाच्या राजकीय नेत्यांचा राबता असला तरी शालेय जीवनातच राजेश्वर यांच्यावर शरद पवारांच्या नेतृत्वाचा प्रभाव पडला. . वर्षभर वकीलीचा व्यवसाय केल्यानंतर थेट विधानसभेचीच निवडणूक लढवायचा निश्चय केला. राजेश्वर यांनी तत्कालीन रेणापूर मतदारसंघातील दोनशे गावे पिंजून काढली. दरम्यान विधानसभेपूर्वीच जिल्हा परिषद निवडणुकीत उजनी गटात विजय मिळवून राजकीय नेतृत्वाची चुणूक दाखवली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार यांच्यासह बहुतांशी नेत्यांशी बोलक्या स्वभावामुळे थेट संपर्क असल्याने त्यांची म्हाडाचे संचालक म्हणून निवड झाली. अंबाजोगाई परिसरात सहा हजारापेक्षा अधिक लोकांना घरे देऊन त्यांनी या पदाचा सामान्यांसाठी उपयोग केला. तर ग्रामीण भागात व्यसनमुक्ती साठी तरुणांना प्रोत्साहित करुन शिक्षण आणि चांगले जीवन जगण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय प्रभावामुळे राष्ट्रवादीतील बहुतांशी नेत्यांनी गरजेनुसार आणि संधी नुसार राजकीय पक्षांतरे, तडजोडी केल्या. मात्र राजेश्वर चव्हाण यांना अनेकदा राजकीय आमिषे आली तरी राष्ट्रवादीची साथ सोडली नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajeshwar chavan young politician and loyal leader from beed district print politics news asj
First published on: 31-12-2022 at 09:47 IST