झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे प्रधान सचिव राजीव अरुण एक्का सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ बाहेर आला, तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले. त्यामुळे राजीव एक्का यांची मूळ विभागातून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव पदावरून हटवून पंचायती राज विभागाच्या सचिवपदी बदलीवर पाठविण्यात आले आहे. रविवारी भाजपाचे नेते बाबूलाल मरांडी यांनी राजीव एक्का यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. तसेच एक्का यांचा एका महिलेसोबतचा व्हिडीओही त्यांनी व्हायरल केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण आहेत राजीव एक्का?

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतून (एम्स) १९८० च्या दशकात प्रशिक्षण घेत डॉक्टर झालेले राजीव अरुण एक्का हे त्यांच्या आदिवासी समाजातील पहिले विद्यार्थी आहेत. १९९४ मध्ये त्यांनी करिअरची दिशा बदलत आयएएस होण्याचा मार्ग निवडला. हेमंत सोरेन यांचे प्रधान सचिव असलेले राजीव एक्का हे स्वतःला कधीही प्रसिद्धीच्या झोतात येऊ देत नाहीत किंवा चर्चेत राहत नाहीत. ते शांतपणे काम करण्यासाठी ओळखले जातात. पुढच्या वर्षी ते निवृत्त होणार आहेत. पण त्याआधीच भाजपाने त्यांची व्हिडीओ क्लिप बाहेर काढल्यामुळे त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. या व्हिडीओमध्ये एक्का विशाल चौधरी नामक एका व्यावसायिकाच्या घरात बसून फायलींचा निपटारा करताना दिसत आहेत. रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार, अनधिकृत खाणकाम आणि मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी विशाल चौधरीच्या घरी मागच्याच वर्षी ईडीने धाड टाकली होती.

हे वाचा >> समाजवादी पक्ष ‘अमेठी’ लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविणार; काँग्रेसशी आघाडीची शक्यता संपुष्टात?

भाजपाकडून क्लिप बाहेर काढल्याच्या काही तासांतच सरकारने एक्का यांना पंचायती राज विभागात हलविले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्का यांच्याकडे प्रधान सचिव पदासोबतच गृह विभागाचाही पदभार होता. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातात गृह विभाग असेल तर चुकीचा संदेश जाईल. त्यामुळेच एक्का यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना तात्काळ बाजूला सारण्यात आले. एक्का यांच्यावरील कारवाईबाबत असेही सांगितले जाते की, मोठ्या धेंडांना वाचिवण्यासाठी एक्का यांच्यासारख्या अधिकाऱ्याचा बळी देण्यात आला आहे.

एक्का हे झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील आहेत. आजवर कधीही ते फारसे प्रकाशझोतात आले नव्हते. तसेच ते फार कुणाशी संवाद साधत नाहीत. त्यामुळे त्यांना समजून घेणे समोरच्या व्यक्तीला अवघड जाते, अशी माहिती त्यांच्यासोबत सरकारमध्ये काम करणाऱ्या एका सूत्राने दिली. करोनाच्या पहिल्या लाटेत एक्का यांनी आपल्या निर्णयक्षमतेची चुणूक दाखविली होती. त्यांनी इमारत व बांधकाम विभागाचा वापराविना पडलेला निधी ‘दीदी किचन्स’ योजनेसाठी वळता केला. ज्यामुळे अनेकांना मदत झाली.

त्या व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी राजीव एक्का यांचा तथाकथित व्हिडीओ बाहेर काढला. ज्यामध्ये राजीव एक्का विशाल चौधरीच्या ऑफिसमध्ये बसून सरकारी फायली हाताळत आहेत. त्यांच्याबाजूला एक महिला उभी असून ती त्यांना फाईल देत मदत करत आहे. संबंधित महिला सरकारी कर्मचारी नाही. या महिलेशी पैशांच्या देवाणघेवाणीबाबत चर्चा झाल्याचे व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. मरांडी यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी तक्रार राज्यपालांकडे दिली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranchi ias rajeev arun ekka removed from the post of chief secretary to cm posted in panchayati raj department kvg
First published on: 08-03-2023 at 18:27 IST