अमरावती : सुमारे दशकभराचे राजकीय वैरत्व संपविण्याच्या उद्देशाने युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी माजी आमदार अभिजीत अडसूळ हेही उपस्थित होते. हे मनोमिलन की राजकीय अपरिहार्यता याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.रवी राणा यांनी अडसूळ यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले आणि समाज माध्यमांवर त्याचे छायाचित्र प्रसारीत केले. अडसूळ यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली, असे राणा यांनी म्हटले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत दर्यापूर मतदारसंघात अभिजीत अडसूळ हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असतानाही महायुतीचा घटक पक्ष असलेल्या युवा स्वाभिमानने उमेदवार उभा करून अडसूळ यांना आव्हान दिले. दोन्ही पक्षांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. शिवसेना ठाकरे गटाची सरशी झाली. या निवडणुकीदरम्यान राणा दाम्पत्य आणि अडसूळ पिता-पुत्र यांच्यात टोकाचा संघर्ष पहायला मिळाला. त्याआधी २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीतील घटक असूनही आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ यांनी नवनीत राणा यांना तीव्र विरोध दर्शविला होता. अडसूळ यांनीच नवनीत राणा यांच्‍या विरोधात जात प्रमाणपत्र प्रकरणी न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने लोकसभा निवडणुकीआधी नवनीत राणा यांच्या बाजूने निकाल दिला होता.  

लोकसभा निवडणुकीदरम्यान अडसूळ यांच्‍या अमरावतीतील निवासस्‍थानी पोहचून राणा दाम्‍पत्‍याने अभिजीत अडसूळ यांची भेट घेत मनधरणी करण्‍याचा प्रयत्‍न केला होता. पण, मतैक्य होऊ शकले नव्हते. अडसूळ पिता-पुत्राने विरोधात काम केले, त्याचा सूड म्हणून दर्यापूरमध्ये अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात युवा स्वाभिमान पक्षाने निवडणूक लढवली होती. आता हे वैर संपविण्यासाठी रवी राणा यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जात आहे.

नवीन राजकीय डावपेच

लवकरच अमरावती महापालिका, जिल्हा परिषद आणि नगर पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. शिवसेना शिंदे गटाने त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर भाजपमधून निष्कासित माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे शिंदे गटाला अमरावतीत बळ मिळाले असताना महायुतीच्या राजकारणात युवा स्वाभिमान पक्षाला स्वत:ची जागा निर्माण करणे सोयीचे व्हावे, या हेतूने रवी राणा यांनी अडसूळ यांची मदत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा महायुतीत असला, तरी अमरावतीत मात्र या गटाची धुरा सांभाळणारे आमदारद्वय संजय खोडके आणि सुलभा खोडके यांनी राणा यांच्यासोबत जुळवून घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. महापालिका निवडणुकीत खोडके आणि राणा दाम्पत्यामध्ये संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत. महायुती एकत्रितपणे निवडणूक लढणार की स्वतंत्रपणे हे अद्याप स्पष्ट नसले, तरी राजकीय पुढारी मात्र पक्षसंघटना मजबूत करण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. खोडके यांच्याकडून मदतीची अपेक्षा नसल्याने राणा हे अडसूळ यांच्याकडे गेले, अशी चर्चा रंगली आहे.