दयानंद लिपारे

कोल्हापूर : जातीय हिंसाचाराच्या माध्यमातून निवडणुकांचा निकाल बदलतो हे पश्चिम महाराष्ट्राने २००९ साली अनुभवले होते. सांगली, मिरज, इचलकरंजी येथे झालेल्या दंगलीमुळे विधानसभेच्या ९ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला होता. ही पार्श्वभूमी पाहता कोल्हापुरातील दंगलीची मुळे राजकारणात दडली नाहीत असे म्हणणे धाडसाचे ठरणारे आहे. ‘कोल्हापुरात जातीय दंगली होतील’ असे विधान माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी करायचा अवकाश दोन दिवस कोल्हापूर पेटून उठले आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचा प्रभाव मोडून काढण्याची सुप्त रणनीती यामागे असू शकते.

29 Naxalites killed on Chhattisgarh-Maharashtra border
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर तब्बल २९ नक्षलवाद्यांचा खात्मा, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई
Nashik, Chhagan Bhujbal, dada bhuse,
नाशिकच्या जागेवरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये वर्चस्वाची लढाई
mahayuti eknath shinde and devendra fadanvis
जागावाटपाचे खडाष्टक सुरूच; भाजपच्या कुरघोडय़ांनी शिंदे गट अस्वस्थ, तर मविआत राऊतांवर काँग्रेस संतप्त
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम

जातीय, धार्मिक दंगली या निवडणूक, राजकारणावर परिणाम करणाऱ्या असल्याचा एक निष्कर्ष आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याने तो प्रत्यक्ष अनुभवला आहे. १४ वर्षापूर्वीचा पडदा दूर केला तर तेव्हाची दंगल याला साक्ष देण्यास पुरेशी ठरणारी आहे. २००९ साली मिरज येथे गणेश उत्सवात अफजलखान वधाचा फलक उभारल्यावर त्यास आक्षेप घेतल्याने आणि गणेश मूर्तीची विटंबना झाल्याने जातीय दंगल उग्र बनली होती. त्याचे लोण पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पसरले होते. परिणामी सांगली, मिरज, इचलकरंजी या शहरांमध्ये आठवडाभर संचारबंदी लागू करण्यात आली होती. ही तिन्ही शहरे दंगलीमध्ये भाजून निघाली होती. त्यातून हिंदुत्वाला पूरक मतपेढी तयार होवून त्याचा लाभ त्या विचारसरणीच्या उमेदवारांना होवून उभय कॉंग्रेसचा बालेकिल्ला कोसळला होता.

आणखी वाचा-सोलापूरमध्ये पाय रोवण्यावर भारत राष्ट्र समितीचा भर, भगीरथ भालके चंद्रशेखर राव यांच्या भेटीला

तिरंगा हटला, भगवा फडकला

याचा परिणाम लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला. कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस – राष्ट्रवादीला जबर हादरे बसले. सांगली संभाजी पवार, मिरज सुरेश खाडे, जत प्रकाश शेंडगे, इचलकरंजी सुरेश हाळवणकर (सर्व भाजप), हातकणंगले डॉ. सुजित मिणचेकर, कोल्हापूर राजेश क्षीरसागर, करवीर चंद्रदीप नरके यांचा विजयाला तेव्हाचे वातावरण कारणीभूत ठरले होते. मदन पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे या माजी मंत्र्यांसह छत्रपती घराण्यातील मालोजीराजे, कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील अशा मात्तबर राजकारण्यांना पराभूत व्हावे लागले होते.

पुरोगामित्वाला आव्हान

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची पार्श्वभूमी पाहता हा जिल्हा पुरोगामी विचारांचा म्हणून ओळखला जातो. त्याला धक्के द्यायला हळूहळू पण नियोजनबद्ध सुरुवात करताना हिंदुत्वाचा मुद्दा खुबीने वापरला जात आहे. शाहूनगरी कोल्हापूरचे पुरोगामीत्व हे आधीपासूनच कडवट हिंदुत्वाच्या डोळ्यावर येत राहिले. कोल्हापूर शहरात ‘लव्ह जिहाद” विरोधात निघालेल्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याचवेळी प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी समाज माध्यमातून ‘ कोल्हापूर हे काही पुरोगामी राहिले नाही; ते भगवे झाले आहे,’ असा हिरीरीने दावा करायला सुरुवात केली. तसे होत असताना स्वतःला पुरोगामी म्हणवणारे जिल्ह्यातील बडे नेते या मुद्दावर भाष्य करायला तयार नव्हते. हा त्यांच्या उक्ती- कृतीतील आणखी एक ठळक विरोधाभास. इचलकरंजी येथील ईदगाह मैदान मुद्द्यावर धु्रवीकरण करण्याचा प्रयत्न झाला.. त्याला मुस्लिम बहुल विशाळगड प्रकरण, ३-४ गावातील स्टेट्स प्रकरण, हेरले गावातील शिवाजी महाराज पोस्टर विटंबना; लव्ह जिहादचे आरोप या घटनांवरून वातावरण तापवत ठेवले. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत ‘काश्मीर फाईल’ हा चित्रपट मोफत दाखवताना त्याचा मतदान, निवडणुकीसाठी कसा वापर झाला हे कोल्हापूरकरांना ज्ञात आहे.

आणख वाचा-गडचिरोली-चिमूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच

उभय काँग्रेसला शह

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीला शह देण्याच्या हालचाली जुन्या आहेत. त्यासाठी धार्मिक, जातीय दंगलीचा उपयोग होऊ शकतो का, असा एक मुद्दा त्यामध्ये आहे. ‘पुढील दोन महिन्यांमध्ये कोल्हापुरात जातीय दंगली होतील’ असा दावा माजी गृहराज्यमंत्री आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी अलीकडेच केला होता. मिरज दंगलीनंतर कोल्हापुर जिल्ह्यात विधानसभेला शिवसेना – भाजपला अपूर्व यश मिळाले होते. हाच कित्ता सरकार पुन्हा गिरवत असल्याचा आरोप सतेज पाटील यांचा होता. त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे समर्थक माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी ‘राज्यातील शिवसेना भाजपचे सरकार चांगले काम करत असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची पायाखालची वाळू घसरली आहे. कोल्हापुर शाहूंची भूमी असून येथे दंगल होणार नाही,’ असा प्रतिदावा केला होता. मात्र तो करून आठवडा उलटायच्या आत कोल्हापुरात दंगल उसळली आहे. सतेज पाटील, हसन मुश्रीफ या उभय कोंग्रेसच्या नेतृत्वाच्या बुडख्यावर घाव घातला कि दुय्यम फांद्या आपोआप कोसळतील ही राजनीती यामागे असू शकते.

‘श्रीरामा’चे सत्ताकारण

कोल्हापुरातील दोन पोलीस ठाण्यासमोर काल हिंदुत्ववादी कार्यकर्ते आंदोलन करीत होते. तर आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन आरंभले होते. एरवी गणेशोत्सव, महालक्ष्मी देवीची मिरवणूक, क्रिकेटचा सामना अशावेळी या चौकात अगोदर पासूनच मोठा बंदोबस्त तैनात केलेला असतो. कालपासून कोल्हापूर धुमसत असताना किंवा आज आंदोलक पुन्हा एकत्र येतील याचा अंदाज शासन, प्रशासन, गृह विभागाला कसा आला नाही असा मुद्दा आता उपस्थित केला जात आहे. आंदोलनाला पांगवण्यासाठी सुरुवातीला सौम्य भूमिका घेतली. आंदोलकांनी दगडफेक सुरू केल्यावर अश्रुधुराचा वापर करण्यात आला. मात्र तत्पूर्वी हिंदुत्ववादी आंदोलकांना सुप्तपणे साध्य करायचे होते; तो उद्देश जवळपास पूर्णत्वात गेला होता. घोषणा मात्र श्रीरामाच्या दिल्या जात होत्या. श्रीरामाच्या घोषणेने आधीच केंद्रातील सत्ता मिळवून दिली होती. हा राजकीय मुद्दाही दुर्लक्षित करण्यासारखा नाही.