सुहास सरदेशमुख

तसा त्यांनी स्वत:चा ग्रामीण ढंग कधी सोडला नाही. आवाज करडा. अंगावर आल्यावर शिंगावर घेण्याचीही तयारी. भाषेचा लहेजाही तसाच. ‘उजुक’ हा त्यांचा परवलीचा शब्द. ‘‘उजुक’ जरा निधी वाढवून द्यायला पाहिजे व्हता’ अशा अर्थाने वापरण्याचा. अशा ठासून भरलेल्या ग्रामीण बेरकीपणावर पैठणचे मतदार प्रेम करतात म्हणूनच संदीपान भुमरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले.

पाच वेळा निवडून आलेले संदीपान भुमरे यांचे तसे भाजप नेत्यांशीही चांगले संबंध. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकाळापासून ते त्यांनी जपले. पुढे रावसाहेब दानवे यांच्याशीही त्यांनी जुळवून घेतले. आमदार म्हणून निवडून येणाऱ्या भुमरे यांना मंत्रीपद देण्यासाठी शिवसेनेकडून तसा उशीर झाला. पण ग्रामीण बेरकी राजकारणी असणारे भुमरे या वेळी शिवसेनाविरोधाच्या बंडात सहभागी झाले. फारशी राजकीय चर्चा न करता जिल्हा बँक, दूध संघासह सहकार विश्वात आपला माणूस पुढे करण्यात त्यांचा हातखंडा. स्वीय सहाय्यकांनी दुष्काळात घातलेले आर्थिक घोळ आणि अलिकडच्या काळात रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहारातून त्यांच्यावर झालेली टीका वगळली तर भुमरे यांची राजकीय कारकीर्द गाजली ती बंडानंतरच. खरे तर शिक्षण विभागात उत्तम काम करणारे नंदकुमार हे रोजगार हमी विभागासाठी सचिव म्हणून कार्यरत होते.

काेविड काळात रोजगार हमी विभागाकडून खूप अपेक्षाही होत्या. पण भुमरे यांना त्यांच्या कामाचा ठसा काही उमटवता आला नाही. जायकवाडी धरणामुळे निर्माण झालेली सिंचन क्षमता व त्यातून ऊसाच्या राजकारणाची अपरिहार्य गरज यामुळे साखरधंद्यातील चढउतार माहीत असणाऱ्या भुमरे यांनी मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असतानाही पैठणसाठी नव्या याेजना आणल्या. संत एकनाथाच्या भूमीतून भागवत धर्माची पताका उंचावली जाईल यासाठी संतपीठही सुरू करण्यात आले. पण असे प्रकल्प सुरू करताना लागणारी व्यापक दृष्टी मात्र विकसित झाली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतपीठ म्हणजे वारकरी संप्रदायाचे शिक्षण एवढेच त्याचे मर्यादित रुप राहिले. जगभरातील संत व त्यांची विचारधारा समजून घेण्यासाठी या संतपीठाची उभारणी केली जावी असे उद्दिष्ट मागे पडले. पण लोकप्रतिनिधी म्हणून भुमरे यांनी ‘ बघा, सुरू केलं का नाही संतपीठ’ एवढाच श्रेयवाद जपला. पैठण येथील मोसंबी संशोधन केंद्रही सुरू करण्यासाठी निधी मिळाला. पण सातवाहनकालीन प्रतिष्ठान नगरीचा पर्यटनस्थळ म्हणून विचार व्हावा असे नियोजन काही भुमरे यांनी केले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून येणाऱ्या भुमरे यांच्या मागे आता शिवसैनिक नाहीत, असा दावा केला जात होता. मात्र, पैठण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पुन्हा भुमरे यांच्या समर्थकांनीच विजय मिळविला. कोणतेही काम असू ते ‘निच्चित’ होणारच असा भुमरे यांचा दावा असतो. त्यांना आता कोणते खाते मिळते, याची उत्सुकता आहे.