सांंगली : सांगली लोकसभेच्या जागेसाठी ठाकरे शिवसेनेने धरलेला आग्रह जिल्ह्यातील काँग्रेसला रूचलेला नाही. यामुळे उद्या गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या जनसंवाद मेळाव्यापासून अलिप्त राहण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे, तर महाविकास आघाडीतील दुसरा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. सांगलीच्या जागेसाठी निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळे महाविकास आघाडीत सांगलीत तरी बेबनाव निर्माण झाला असून यातून मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत मिळत आहेत.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोल्हापूरच्या बदली सांगलीच्या जागेवर ठाकरे शिवसेनेने हक्क सांगत असताना पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारीही जाहीर केली आहे. जागा वाटप अंतिम झाले नसताना शिवसेनेचा जनसंवाद मेळावा उद्या म्हणजे २१ मार्च रोजी मिरजेत आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीलाही निमंत्रण देण्यात आले आहे.

हेही वाचा – साताऱ्यात उदयनराजे यांना महायुतीतूनच विरोध

सांगलीची जागा ही काँग्रेसची पारंपारिक जागा असून हा बालेकिल्ला असल्याने काँग्रेसच ही जागा लढविणार. यासाठी प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची उमेदवारी निश्‍चित करून तयारीही सुरू केली आहे. दुसर्‍या बाजूला ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी वारंवार सांगलीच्या जागेचा प्रश्‍न मिटला असून शिवसेनेचे पैलवान हेच आमचे उमेदवार असतील असे सांगत आहेत. तर काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सांगलीच्या मैदानात काँग्रेसचे पाटील असणारच असे ठामपणे सांगत आहेत. यावरून निर्माण झालेला पेच अद्याप मिटलेला नसताना ठाकरे शिवसेनेचा जनसंवाद मेळावा मिरजेत आयोजित करण्यात आला असून हा प्रचार शुभारंभच असल्याचे सांगण्यात येत आहे.

सांगलीच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असल्याने आणि मिरजेत आयोजित करण्यात आलेला मेळावा हा ठाकरे शिवसेनेचा असल्याने काँग्रेसचे पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहू शकत नसल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले. तर शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसचे विशाल पाटील हेच आमचे उमेदवार असून त्यांनाच महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेल असा विश्‍वास व्यक्त करून आम्ही निवडणुकीच्या तयारीत असल्याचे सांगितले.

हेही वाचा – अशोक चव्हाण – डॉ. माधव किन्हाळकर तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र!

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी मात्र मिरजेत शिवसेनेचा संवाद मेळावा हा मित्र पक्षाचा असल्याने आमचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. मात्र जागा वाटपाच्या चर्चेत व्यस्त असल्याने प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील या मेळाव्यास उपस्थित राहण्याची शक्यता दुर्मिळ असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे मिरजेत होत असलेल्या ठाकरे शिवसेनेचा जनसंवाद मेळावा हा महाविकास आघाडीच्या वाटेवर फुले उधळतो की विस्तव पेरतो हे सांगणारा ठरेल.