यवतमाळ : यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवून विजयी झालेले शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली. दोनवेळा अपक्ष आमदार, त्यानंतर भाजप, काँग्रेसमध्ये प्रवेश आणि पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत खासदारकी मिळविली.

महाविद्यालयीन जीवनातच संजय देशमुख यांनी शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात केली होती. १९९६ मध्ये ते दिग्रस तालुका शिवसेनाप्रमुख झाले. त्यानंतर १९९८ मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख झाले. विद्यमान पालकमंत्री संजय राठोड आणि संजय देशमुख हे दोघेही या काळात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. मात्र काही वर्षातच संजय देशमुख हे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी अपक्ष म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली. १९९९ आणि २००४ असे सलग दोनवेळा दिग्रस विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार होते. १९९९ मध्ये राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. त्यावेळी संजय देशमुख यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी अपक्ष आमदारांनी आघाडी सरकारला पाठिंबा देऊन मंत्रीपदे मिळवली. जवळपास दोन वर्ष ते क्रीडा व खनिकर्म खात्याचे राज्यमंत्री होते.

आणखी वाचा-निकालानंतर बंगालमध्ये भाजपा कार्यकर्ते घर सोडून पक्ष कार्यालयात ठाण मांडून का बसलेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाली तेव्हा दारव्हा विधानसभा मतदारसंघ बाद होऊन दिग्रस विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यावेळी संजय राठोड यांनी दिग्रस विधानसभा निवडणुकीत संजय देशमुख यांचा पराभव केला. तेव्हापासून संजय देशमुख यांचा राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष सुरू होता. त्यानंतर काँग्रेस, भाजप या पक्षांमध्येही गेले. २०२२ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. शिवसेना फुटल्यानंतर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. ही संधी हेरून संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देत शिवसेनेत प्रवेश केला. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभेचा उमेदवार म्हणून संजय देशमुख यांच्या नावाची घोषणा केली होती.