राजस्थान विधानसभा निवडणुकीला आता काही महिने शिल्लक राहिलेले असताना काँग्रेस पक्षाने रविवारी निवडणुकीच्या प्रचारानिमित्त मध्यवर्ती वॉर रुमसाठी अध्यक्ष आणि सह-अध्यक्षांची नेमणूक केली. माजी आयएएस अधिकारी शशिकांत सेंथिल यांची अध्यक्षपदी, तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्तीय लोकेश शर्मा, पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंत गुर्जर आणि शौर्य चक्र प्राप्त झालेले निवृत्त सैन्य अधिकारी कॅप्टन अरविंद कुमार यांची सह-अध्यक्षपदी निवड झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणूगोपाल यांनी पत्रकार परिषदेद्वारे या नावांची घोषणा केली.

राजस्थानमधील सत्ता शाबूत ठेवण्याच्या आम्ही अगदी जवळ पोहोचलो असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगताच दुसऱ्या दिवशी वॉर रुमच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा झाली. मागच्या तीन दशकांत राजस्थानमध्ये एकाही पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणे जमलेले नाही. आसामच्या प्रतिदिन मीडिया नेटवर्कतर्फे आयोजित केलेल्या बैठकीत मत प्रदर्शित करताना गांधी म्हणाले, “आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही तेलंगणात कदाचित विजय मिळवू, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तर निश्चितच विजय मिळवूच आणि राजस्थानमध्ये आम्ही विजयाच्या अगदी नजीक असून तिथेही आम्ही सत्ता अबाधित राखू, असे मी आजच खात्रीने सांगू शकतो. आजच्या परिस्थितीवरून तरी हेच दिसते आणि भाजपाच्या अंतर्गतदेखील हीच चर्चा आहे.”

Congress Leader Kamalnath Promised Giving Article 370 Masjid Place But Real Video Is Different
“३७० लागू करू, मशिदीला जागा देऊ..”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचं मुस्लिमांना आश्वासन? Video तील वाक्य आधी नीट ऐका
mamata banerjee
‘काँग्रेस, कम्युनिस्ट हे भाजपाचे एजंट’, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”

हे वाचा >> एक माजी IAS अधिकारी कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचा शिल्पकार! पडद्यामागे राहून रणनीती ठरवणारे शशिकांत सेंथिल कोण आहेत?

शशिकांत सेंथिल कोण आहेत?

शशिकांत सेंथिल हे मूळचे तामिळनाडू राज्यातील आहेत. त्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ४४ वर्षीय सेंथिल यांनी काँग्रेसच्या बंगळुरूमध्ये असलेल्या वॉर रुमचे नेतृत्व केले. बसवराज बोम्मई सरकारची ‘४० टक्के कमिशन मागणारे सरकार’ अशी प्रतिमा निर्माण करण्यात सेंथिल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोपांच्या फैरी झाडल्यामुळे काँग्रेसने भाजपाविरोधात प्रचारात चांगलीच आघाडी घेतली होती. ४० टक्के कमिशनच्या घोषणेने भाजपाला बेजार केले, ज्यामुळे सरकारविरोधात मतदान झाले. भाजपावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यासाठी काँग्रेसने कर्नाटकात ‘PayCM’ ही मोहीम राबवली. ही कल्पना सेंथिल यांच्याच डोक्यातून आली होती. त्यांनी या मोहिमेंतर्गत क्यूआर कोडसोबत बोम्मई यांचा चेहरा लावला होता. संपूर्ण बंगळुरूमध्ये हे पोस्टर्स लावण्यात आले होते. मुख्यमंत्री बोम्मई यांनी तेलंगणाचा दौरा केला असता तेलंगणामधील हैदराबादमध्येही स्कॅनर कोडचे पोस्टर झळकविण्यात आले, ज्यावर लिहिले होते, “४० टक्के कमिशनवाल्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत आहे.”

सेंथिल हे २००९ च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे उपायुक्त असताना सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. आगामी काळात आपल्या देशाच्या मूलभूत तत्वांसमोर मोठे आव्हान उभे ठाकणार आहे, असे मला वाटते. त्यामुळे सर्वांचे आयुष्य सुकर करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेच्या बाहेर पडले पाहिजे असे मला वाटते. प्रशासकीय सेवेच्या बाहेर पडून काम करायला हवे, असे मला वाटते; असे शशिकांत सेंथिल राजीनामा देताना म्हणाले होते. त्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०२१ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत चेन्नई येथील वॉर रुममध्ये पक्षासाठी काम केले.

तामिळनाडू वॉर रुममधील सेंथिल यांच्या कामाने काँग्रेसमधील वरिष्ठ नेतेही प्रभावित झाले. त्यानंतर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये असताना सेंथिल यांच्यावर राहुल गांधी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचतील, हे पाहण्याची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारीही त्यांनी नेटाने पार पाडली. याच काळात त्यांची राहुल गांधी यांच्याशी जवळीक वाढली असल्याचे काँग्रेसमधील सूत्र सांगतात.

लोकेश शर्मा

लोकेश शर्मा हे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे ओएसडी (Officer on Special Duty) असून काही वर्षांत त्यांचे महत्त्व अचानक वाढले आहे. अशोक गहलोत २०१२ मध्ये मुख्यमंत्री झाल्यापासून शर्मा गहलोत यांच्यासह काम करत आहेत. गहलोत यांच्या डिजिटल मीडियाचे कामकाज शर्मा सध्या पाहत आहेत. शर्मा यांनी २००० साली राजस्थान काँग्रेसमध्ये कामाला सुरुवात केली, त्याआधी त्यांनी १९९८ साली नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) मध्ये काम केले होते. ‘युवा संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शर्मा यांनी राज्यातील युवकांमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.

१५ जिल्हे आणि ७५ विधानसभा मतदारसंघात डिजिटल स्वरुपात आणि प्रत्यक्ष भेटी देऊन गहलोत सरकारच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शर्मा यांनी केला आहे. या बैठकांना शेकडो युवक उपस्थित राहिल्याची माहिती मिळते. सध्या २० जिल्ह्यांमध्ये अशोक गहलोत फॅन्स क्लब तयार करण्यात आले आहेत, या फॅन्स क्लबचे संरक्षक म्हणून शर्मा काम करत आहेत.

हे वाचा >> १९५१ ते २०१८! राजस्थानच्या निवडणुकीचा रंजक इतिहास; जाणून घ्या कोण जिंकलं, कोणाचा पराभव?

शर्मा यांना राजस्थानच्या बिकानेर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची महत्त्वाकांक्षा आहे. या मतदारसंघात त्यांचे कौटुंबिक संबंध असल्याचे म्हटले जाते. या मतदारसंघातील उच्च जातींचा पाठिंबा असल्याचे ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकेश शर्मा यांचा दावा आहे.

कॅप्टन अरविंद कुमार

सैन्य दलातून निवृत्त झालेले, शौर्य चक्र प्राप्त केलेले कॅप्टन अरविंद कुमार हे राजस्थान सैनिक कल्याण बोर्डाचे सदस्य आहेत. जाट समुदायातून येत असलेले अरिवंद कुमार हे राजस्थान प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव आहेत. तसेच त्यांच्याकडे प्रदेश मुख्यालयाच्या कार्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अरविंद कुमार यांचे वडील पी. एस. जाट हे सिकर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि २०१४ साली त्यांनी या ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. आमेर आणि झोटवाडा विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदाची जबाबदारीही अरविंद कुमार यांच्यावर टाकलेली आहे.

आणखी वाचा >> “आया-बहिणींवरचे अत्याचार ‘राजस्थान’ सहन करणार नाही”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेस सरकारवर टीका

जसवंत गुर्जर

नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) या विद्यार्थी संघटनेपासून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या प्रदेश सरचिटणीस गुर्जर यांच्यामध्ये पक्ष संघटनेत काम करण्याचा पुरेसा अनुभव आहे. सध्या प्रदेश काँग्रेसचे ते सरचिटणीस आहेत. एनएसयुआयचे माजी उपाध्यक्ष असलेल्या गुजर यांच्याकडे सरचिटणीस पद येण्याआधी त्यांनी काही काळ सचिव पदावर काम केलेले होते. अलवर जिल्ह्याचे काँग्रेस प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अरविंद कुमार आणि गुर्जर हे दोघेही चाळिशीत असून मुख्यमंत्री गहलोत यांच्या गटातील विश्वासू सहकारी मानले जातात.