अलिबाग : रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहे. एकीकडे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील प्रस्थापित नेत्याला न्यायालयाने दोषी ठरवल्याने, त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाड येथील मनसे शहर अध्यक्षाला केलेल्या मारहाण प्रकरणी सेनेच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट या दोन सत्ताधारी पक्षांमधील वाद विकोपाला गेले आहेत, त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची चौफेर कोंडी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुरू आहेत. अशातच दोन वेगवेगळ्या घटनामुळे शिवसेना शिंदे गटांच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

अलिबाग मधील शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांना २०१२ मधील एका जीवघेणा हल्ला प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले, त्यांना सात वर्ष सक्त मजूरीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे त्यांची तसेच त्यांच्या इतर २० सहकाऱ्यांची तळोजा कारागृत रवानगी करण्यात आली. जिल्हा परिषद निवडणूकीच्या तोंडावर दिलीप भोईर यांना सात वर्षाची शिक्षा झाल्याने, त्यांचे राजकीय भवितव्य अडचणीत सापडले आहे. जिल्हा परिषदेच्या आवास मतदारसंघातून ते शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार होते. दांडगा लोकसंपर्क आणि आदिवासी आणि कोळी समाजात भोईर चांगलेच लोकप्रिय होते. जिल्हा परिषद निवडणूकीच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. ऐन निवडणूकीच्या तोंडावर भोईर कारागृहात गेल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

दुसरीकडे राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यावर समाजमाध्यमांवर टीका टिप्पणी केली म्हणून शिवसैनिकांकडून मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी माहड पंचायत समितीच्या माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह सात जणांवर महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महाड मधील राजकारण तापले असून, मनसेकडून मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांच्यावरही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाल्याचा दावा मनसे कडून करण्यात आला आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणूकीच्या शिवसेना शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. या दोन्ही घटनामुळे शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.