scorecardresearch

Premium

जोशींवर गुन्हा आणि रविंद्र चव्हाणांची फरफट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या मित्र पक्षात ठाणे जिल्ह्यात सुरु असलेली धुसफूस थांबता थांबत नसल्याचे सध्या चित्र आहे.

eknath shinde-ravindra chavan
ठाणे जिल्ह्यात शिंदेसेना-भाजपतील वाद टोकाला (फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या मित्र पक्षात ठाणे जिल्ह्यात सुरु असलेली धुसफूस थांबता थांबत नसल्याचे सध्या चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले डोंबिवली भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंग प्रकरणी दाखल झालेला गुन्हा हे या दोन पक्षातील वितुष्टाचे ताजे कारण ठरले आहे. जोशी यांच्यावर गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासातच मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. खरे तर बागडे यांची बदलीच होईल अशी चर्चा डोंबिवलीत होती. मात्र बागडे यांना थेट ठाण्याहून ‘पाठबळ’ मिळाल्याने बदलीऐवजी त्यांची सक्तीच्या रजेवर सुटका करण्यात आल्याचे बोलले जाते. यानिमीत्ताने डोंबिवलीकर चव्हाण आणि ठाणेकरांचे सूत काही केल्या जमत नसल्याच्या चर्चेने मात्र जोर धरला आहे.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

राज्यात सत्ताबदल झाला आणि मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्तेबाहेर असलेल्या भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आनंद काही काळ गगनात मावेनासा झाला. ठाणे जिल्ह्यातील भाजपला मात्र सत्ताबदलानंतर अवघ्या काही दिवसातच आपल्यापुढे नेमके काय वाढून ठेवले आहे याची जाणीव व्हायला लागली. मागील नऊ- दहा महिन्यात तर शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात स्थानिक पातळीवर सातत्याने खटके उडत असून राज्यातील मंत्री मंडळात सहभागी असलेले रविंद्र चव्हाण यांनाही याची झळ पोहचू लागल्याने आता आम्हाला वाली कोण असा सवाल जिल्ह्यातील भाजप नेते, पदाधिकारी दबक्या सुरात करु लागले आहेत. डोंबिवलीत चव्हाण यांचे कट्टर समर्थक नंदू जोशी यांच्याविरोधात एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास करुन पुढील कार्यवाही करायला हवी होती असे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. प्रत्यक्षात मात्र ठाणे जिल्ह्यातील एका बड्या लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे तातडीने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केला. हा लोकप्रतिनिधी कोण या प्रश्नाचे उत्तर कांबळे यांनी जाहीरपणे दिले नसले तरी भाजप कार्यकर्त्याचा रोख मात्र मुख्यमंत्री पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे असल्याचे अगदी स्पष्टपणे दिसून आले.

आणखी वाचा-सुनील तटकरे नाराज का झाले?

चव्हाण-शिंदे यांच्यातील संघर्ष टोकाला ?

डोंबिवली पुर्व येथील भाजप मंडळ अध्यक्ष असलेले नंदू जोशी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा नेल्याने संघ वर्तुळात नाराजीचा सुर व्यक्त होताना दिसत असला तरी भाजपमध्ये मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात जाहीरपणे संघर्षाची भाषा सुरु झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे हे खासदार शिंदे यांच्या निकटवर्तीयांमध्ये ओळखले जातात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बागडे यांची मानपाड्यात नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बागडे यांच्या मानपाडा येथील नियुक्तीस टोकाचा विरोध होता. मात्र नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी ही नियुक्ती प्रतिष्ठेची केल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. बागडे यांनी नंदू जोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करताच भाजपमधून त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे बोलले जाते. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्यानंतर बागडे यांची बदली होईल असे दावेही केले जात होते. मात्र शुक्रवारी बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कारवाईची धग कमी करण्यात आली. बागडे यांना अर्थातच ठाण्याहून पाठबळ मिळाल्यानेच त्यांची बदली झाली नाही असेही बोलले जाते. यानिमीत्ताने चव्हाण आणि ठाण्यातील छुप्या संघर्षाच्या चर्चेला मात्र बळ मिळाले आहे.

काही दिवसांपूर्वी ठाण्यात भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या एका बैठकीत रविंद्र चव्हाण यांनी आक्रमक व्हा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. ठाण्यातील आनंदनगर भागातील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याविरोधात स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांच्या दबावामुळे थेट ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या तक्रारी चव्हाण यांच्यापुढे मांडण्यात आल्या होत्या. यावर ‘तुम्ही रडत काय बसता, आक्रमक व्हा. अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घ्या’ अशास्वरुपाचे बोधामृत पाजून चव्हाण डोंबिवलीत परतले होते. नंदू जोशी यांच्यानिमीत्ताने चव्हाण यांना आम्ही काय सहन करतो आहोत याची जाणीव होईल, अशी प्रतिक्रिया ठाणे भाजपमधील एका मोठ्या नेत्याने लोकसत्ताला दिली.

आणखी वाचा- समाजाच्या पाठबळामुळेच पंकजा मुंडे यांच्या सततच्या इशाऱ्याकडे भाजपचे दुर्लक्ष 

नंदू जोशी यांच्यावर कोणाच्या दबावामुळे गुन्हा दाखल झाला हे सर्वाना ठावूक आहे. युतीधर्म पाळायचा म्हणून आम्ही नेहमीच शिवसेनेला साथ देत आलो. त्याची परतफेड म्हणून आम्हाला बदनाम करणे, खच्चीकरण करणे असे प्रकार होत असतील तर ते सहन करणार नाही. यावेळी लोकसभेसाठी आम्ही भाजप उमेदवारासाठीच काम करु. उड्या मारणाऱ्यांना त्यांची कुवत काय आहे हे दाखवून देऊ. –शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष भाजप, कल्याण</strong>

“दोन सख्खे भाऊ छोट्या कुरबुऱ्या होतातच, पण वेळेला एकत्र येतात. मोर्चात सहभागी होण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करुन आम्हाला आदेश असते तर आम्ही गेलो असतो. कुरबुऱ्यांकडे कधी कानाडोळा करायचा असतो. फार गंभीर घ्यायचे नसते.” –राजेश कदम, उपजिल्हाप्रमख, शिवसेना.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 14:10 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×