Uddhav Raj alliance impact: ५ जुलै रोजी ‘आवाज मराठीचा’ या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी एकत्र आल्याचे दाखवून दिले. मराठी अस्मितेचं रक्षण करणारे अशी त्यांची प्रतिमा मराठी माणसांच्या नजरेत आणखी मजबूत झाली. दुसरीकडे हिंदीविरोधी भूमिका असल्याने महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्वस्थता वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीसारख्या राजकीय आघाडीची शक्यता राऊत यांनी फेटाळून लावली. अशी युती केवळ मोठ्या निवडणूक लढायांसाठीच फायदेशीर असते, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत?
“इंडिया आघाडीची स्थिती काय आहे? असे विचारण्यात आले, त्यावर मी म्हणालो की, ती लोकसभा निवडणुकीसाठी आणि महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत या दोघांचीही गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढल्या जातात”, असे राऊत यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
देशातील सुमारे २५ पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सत्तावाटपावरून झालेल्या वादानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना दीर्घकालीन मित्रपक्ष भाजपापासून वेगळी झाली. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये शिवसेना, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. संजय राऊत यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, “उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात औपचारिक युती नसली तरी पुन्हा एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंवर आगामी बीएमसी निवडणुकीसाठी एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव वाढत आहे.
“मी असे म्हटले नव्हते की, मनसे आणि शिवसेना (उबाठा) एकत्र निवडणुका लढवीत आहेत. मी असे म्हटले होते की, लोकांचा दबाव आहे की, शिवसेना आणि मनसेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात. कारण- लोकांचा असा विश्वास आहे की, मराठी माणसांचे हक्क जपायचे असतील, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे”, असेही राऊत म्हणाले.
पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर युतीबाबत निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातील पालिकांसह इतर नागरी संस्थांच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. सुमारे दोन दशके शिवसेनेने मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवली.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदीला तिसरी भाषा म्हणून लागू करण्याचे दोन्ही सरकारी आदेश मागे घेतले. या निर्णयाच्या आनंदाप्रीत्यर्थ ठाकरे बंधूंनी ‘आवाज मराठीचा’ हा मेळावा एकत्रितपणे आयोजित केला. या मेळाव्यात सुमारे दोन दशकांनंतर उद्धव आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आल्यानंतर संजय राऊत यांनी हे विधान केले. “आम्ही एकत्र आलो आहोत आणि एकत्र राहू”, असे ठाकरे बंधूंनी त्यावेळी जाहीर केले. त्यामुळे मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीत संयुक्त लढाईच्या तर्कवितर्कांना आणखी बळकटी मिळाली.

रामदार आठवले म्हणतात…
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “मला वाटते की, संजय राऊत यांच्या वक्तव्याचा अर्थ असा आहे की, जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आगामी मुंबई पालिका निवडणूक एकत्र लढवली, तर त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये फूट पडू शकते. असे झाले, तर त्याचा फायदा आपल्या महायुतीला होईल आणि निवडणुका जिंकता येतील. बरेच मराठी लोक भाजपा, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पाठिंबा देतात. म्हणूनच उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात समेट झाला तरीही आम्हाला काही फरक पडत नाही.”
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी म्हणाले, “सुरुवातीपासूनच सर्व जण एकमेकांना खाली खेचत आले आहेत. जर विधानसभेत सर्वांनी एकमेकांसाठी काम केले असते आणि जागावाटप योग्यरीत्या झाले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती.”
महाविकास आघाडीतील नेत्यांची भूमिका
काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही राऊत याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन लढवल्या जातात. त्यामुळे या निवडणुकांकडे अशा दृष्टिकोनातून पाहू नये. त्यामुळे यावर मला काहीही भाष्य करण्याची गरज नाही.” दरम्यान, या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.