पुणे : शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात मनजुळणी झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेना (शिंदे) गटाने ‘आपरेशन टायगर’ आणि ‘प्रॉमिसिंग पुणे’ ही मोहीम आखली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आरंभ करण्यात आला असून, ठाण्यात आनंदाश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात २०० कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये युती होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भविष्यातील आव्हान लक्षात घेऊन पुण्यात शिवसेना शिंदे गटाने प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मोहीम फत्ते करण्यात आली असून, २०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

‘प्रॉमिसिंग पुणे’ संकल्पना काय आहे?

महापालिका निवडणुकांपूर्वी पुणेकरांसाठी पक्ष किती कार्यरत आहे, हे दाखवून देण्यासाठी ‘प्रॉमिसिंग पुणे’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय शिवसेना शिंदे गटाने घेतला आहे. त्यानुसार आगामी काळात पुण्यातील रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कचरा व्यवस्थापन यांसारखे प्रश्न हाती घेऊन ते सोडविण्यासाठी पक्षाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्याबरोबरच निवडणुकीपूर्वी पक्षाची ध्येयधोरणे पुणेकरांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत शिवसेना ठाकरे गटासह अन्य पक्षांतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पक्षात घेऊन पक्षाचा विस्तार करण्यासाठी आगामी काळात शिवसेना शिंदे पक्ष हा आक्रमक होणार असल्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकांपूर्वी शिवसेना शिंदे गटाने पक्षवाढीसाठी काँग्रेसचे कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना पक्षात घेऊन त्यांना पुणे महानगर प्रमुख पद दिले आहे. नाना भानगिरे यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची धुरा कायम ठेवण्यात आली आहे. या दोघांच्या नेतृत्त्वाखाली ‘ऑपरेशन टायगर’ आणि ‘प्रॉमिसिंग पुणे’ मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

दुभंगलेली ताकत जोडण्याचा प्रयत्न

पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी पाचजण भाजपकडे गेले आहेत. एका नगरसेवकाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तीनजण शिवसेना ठाकरे गटात असून, एकजण शिवसेना शिंदे गटात आहे. शिवसेनेची ताकत विभागली गेली आहे. त्यामुळे शिंदे गटाने पक्षवाढीसाठी ‘ऑपरेशन टायगर’ आणि त्याअनुषंगाने ‘प्रॉमिसिंग पुणे’ मोहीम आखली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर २०० पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे पक्षप्रवेश झाले आहेत. पुणेकरांचे प्रश्न हाती घेऊन ते सोडविण्यासाठी ‘प्रॉमिसिंग पुणे’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. – नाना भानगिरे, शहराध्यक्ष, शिवसेना शिंदे गट