छत्रपती संभाजीनगर: धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघातून केवळ १५०९ मतांनी निवडून आल्यानंतर तानाजी सावंत मतदारसंघात एकदाही फिरकलेच नाहीत. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतही त्यांनी लक्ष घातले नाही. या संस्थेवर आता राहुल मोटे यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. किमान खरेदी विक्रीच्या संघाच्या निवडणुकीत सावंत लक्ष घालतील, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र, या निवडणुकीत ४५ अर्ज माघारी घेतल्यानंतर खरेदी विक्रीसंघाची निवडणूक बिनविरोध झाली. दरम्यान काम होणार नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल मोटे यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत कमी मतांनी निवडून आल्यानंतर तानाजी सावंत परंडा मतदारसंघात एकदाही फिरकले नाहीत. मतदारसंघात त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. त्यांच्या वतीने त्यांचे पुतणे धनंजय मतदारसंघातील सर्व कारभार पाहत असतात, असे सांगण्यात येते. या मतदारसंघात विधानसभा निवडणूक चुरसीची झाली होती. तानाजी सावंत अगदीच कमी मतांनी निवडून आल्याने ते नाराज होते. या विजयानंतर राज्याच्या मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश झाला नाही. आपल्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच वादात असणारे तानाजी सावंत मतदारसंघात आलेच नाहीत.
या मतदारसंघात तानाजी सावंत यांचे प्रतिस्पर्धी उमदेवार राहुल मोटे म्हणाले, ‘विजयानंतर ते मतदारसंघात एक मिनिटभरही आले नाहीत. त्यामुळे अनेक कामांचा पाठपुरावा आता मीच करत आहे. जर काम करायचे नसेल आणि त्यांच्याकडून होणार नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. असेही अडीअडचणाीला लोक मलाच भेटत आहेत. अनुभवाच्या अधारे अधिकाऱ्यांना सांगून कामे करूनही घेत आहे. मध्यंतरी ते पुण्यात वाहतुकीला मार्ग दाखवत असल्याचे दिसले. पण परंड्यात ते आले नाहीत. परंड्यात अलिकडे अंमली पदार्थ सापडले. सोलापूरच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास केला. पण त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही.’
पावसाळा अधिवेशनातही तानाजी सावंत यांची उपस्थिती किती यावर आता प्रश्नचिन्ह लावले जात आहे. ते ना मतदारसंघात ना विधिमंडळात असे चित्र दिसून येत आहे. आमदार म्हणून कमी मताने निवडून आलेल्या सावंत सध्या आहेत तरी कोठे, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे )जिल्हा प्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील म्हणाले , ‘ निकाल लागल्यानंतर तानाजी सावंत जे गेले ते मतदारसंघात आलेच नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनाही ते भेटत नाहीत, अशी तक्रार आता त्यांचे कार्यकर्ते आमच्याकडे करतात. यामुळे परंडा मतदारसंघाचे अनेक प्रश्न मांडणारा माणूसच उरला नाही. ही काही पहिली वेळ आहे असे नाही तर २०१९ मध्ये विजय मिळविल्यावरही ते अडीच वर्षे फिरकले नव्हते.’