महेश सरलष्कर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून शिंदे-भाजप युती सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवारांसह नऊ आमदार मंत्री झाल्याचा जबरदस्त राजकीय धक्का महाविकास आघाडीला बसला असला तरी, दिल्लीत जूनमध्ये झालेल्या चार बैठकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीला खतपाणी घातल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ‘६ अ कृष्ण मेनन’ मार्गावरील निवासस्थानी रात्री साडेदहा वाजता भेट घेतली होती. दोन तास झालेल्या बैठकीनंतर शिंदे व फडणवीस तातडीने मुंबईला परतले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ३० जून रोजी, शुक्रवारी रात्री शिंदे व फडणवीस यांनी पुन्हा शहांची भेट घेतली होती. या दोन्ही बैठकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे सांगितले जात होते. रविवारी अचानक अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे शुक्रवारी शिंदे व फडणवीसांनी तातडीने केलेला दिल्लीदौऱ्याचे इंगित उघड झाले.

हेही वाचा… हसन मुश्रीफ यांच्यासाठी ईडीच्या फेऱ्यातून सुटण्याचा मार्ग

जून महिन्याच्या सुरुवातीला शिंदे व फडणवीसांच्या दिल्लीवारीनंतर पाच दिवसांनी म्हणजे १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीतील पक्ष कार्यालयात झाले होते. या अधिवेशनाला अजित पवारही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या राजीनामानाट्यानंतर झालेले हे पक्षाचे पहिलेच अधिवेशन होते. या अधिवेशनामध्ये शरद पवारांनी अखेरच्या क्षणी अजित पवारांना दणका देत सुप्रिया सुळे व प्रफुल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक झाली. अधिवेशनामध्ये डोळ्यावर गॉगल घालून डोके धरून बसलेले अजित पवार तातडीने दिल्लीहून मुंबईला रवाना झाले होते.

हेही वाचा… अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी…”

या बैठकीनंतर शरद पवार यांना ‘६ जनपथ’ या निवासस्थानी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन दोन कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. अजित पवार यांच्याकडे विधानसभेतील विरोधीपक्षनेते पद असल्याने त्यांना कार्यकारी अध्यक्ष केले नसल्याचा खुलासा पवार यांनी केला. शिवाय, सुप्रिया सुळेंना कार्यकारी अध्यक्ष करण्याचा निर्णय अजित पवार यांच्या संमतीनेच घेतल्याचाही दावा शरद पवारांनी केला होता. अजित पवार यांनी मुंबईतील पक्षाच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपद न देता संघटनेचे काम देण्याची विनंती केली होती. पण, तीही दिली जाण्याची शक्यता नसल्याचे २८ जून रोजी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर अधोरेखित झाले होते. अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची मागणी केली असली तरी त्यांना हे पद लगेच दिले जाणार नाही, असे प्रफुल पटेल यांनी उघडपणे सांगितले होते. त्यामुळे अजित पवार शिंदे गट-भाजपशी हातमिळवणी करतील असे बोलले जात होते.

हेही वाचा… ‘चिखल’: राज ठाकरेंची महाराष्ट्रातील राजकारणावर मार्मिक प्रतिक्रिया

दिल्लीत शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे व प्रफुल पटेल हेही सहभागी झाले होते. अजित पवार यांनी फुटीच्या हालचाली केल्याची कुणकूण शरद पवारांना होती असे सांगितले जात आहे. अजित पवारांना परावृत्त करण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांच्याकडून केला जात होता. त्यासंदर्भात त्यांनी दोनवेळा अजित पवारांची भेट घेतल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमध्ये शरद पवारांचे खंदे समर्थक व नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेलही सामील झाल्याने फुटीचा डाव नेमका कोणी टाकला यावर दिल्लीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा… अजित पवारांच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रफुल पटेल यांच्याविरोधात ईडीचा ससेमिरा लागला असल्याने ते भाजपशी जुळवून घेण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात होते. मध्यंतरी अजित पवार याचा संपर्क होत नसल्याचे वृत्त पसरले होते. त्यावेळी प्रफुल पटेलसह छगन भुजबळ आदी नेते अजित पवार यांच्यासोबत भाजपशी युती करण्यासाठी उत्सुक असल्याची बाबही समोर आली होती. या चर्चा रंगल्या असताना अजित पवार यांनी दिल्लीत येऊन अमित शहांची भेट घेतल्याचेही सांगितले जात होते. प्रफुल पटेल हे आता फुटीर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले असल्याने त्यांना मोदी सरकारच्या विस्तारामध्ये केंद्रीयमंत्री पद दिले जाऊ शकते.