सांंगली : लोकसभेबरोबरच खानापूर-आटपाडी विधानसभा पोटनिवडणूक होण्याची चिन्हे दिसत असून प्रशासकीय पातळीवर तशा हालचाली सुरू आहेत. आमदार अनिल बाबर यांचे अकाली निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर स्व. बाबर यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हे शिवसेनेकडून निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे निश्‍चित झाले आहे. कोल्हापूरमधील शिवसेना अधिवेशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केलेली चर्चा याचे संकेत देत असून आगामी काळात बाबर घराण्यातूनच खानापूर-आटपाडीचा भावी वारसदार मिळण्याची चिन्हे सद्यस्थितीत दिसत आहेत.

स्व. अनिल बाबर यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना सामान्य माणसाच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम केले. शेताच्या बांधावर जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत या भागाचा कृषी विकास शक्य नाही हे ओळखून त्यांनी टेंभू योजनेसाठी राजकीय ताकद वापरून गती देण्याचा प्रयत्न केला. यामुळेच त्यांना पाणीदार आमदार अशी उपाधी जनतेने दिली. याच घराण्यातील वारसदार पुढचा प्रतिनिधी असणे सामान्यांनी गृहित धरले असले तरी बाबर यांना झालेला राजकीय विरोधही दुर्लक्ष करून चालणार नाही.

हेही वाचा – कोकणातील निवडणुकीला राणे- भास्कर जाधव संघर्षाची किनार

राज्यात सत्ताबदल होत असताना बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खंबीर साथ दिली. मंंत्रीमंडळ विस्तारात त्यांचे नाव मंत्रीपदासाठी घेतले जात होते. मात्र, मंत्रीमंडळ विस्तार होण्यापूर्वीच त्यांना अकाली निधन आले ही खंत अवघ्या मतदारसंघालाच नव्हे तर जिल्ह्याला कायम राहणार यात शंका नाही. मात्र, त्यांच्या राजकीय वाटचालीत राजकीय विरोधाचाही सामना त्यांना करावा लागला होता. त्यांच्या पश्‍चात मतदारसंघातील राजकीय संघर्ष समाप्त होण्याऐवजी अधिक तीव्र स्वरूपात पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, पोट निवडणुकीमध्ये हा संघर्ष एवढ्या तीव्रतेने पुढे येणार नसला तरी भविष्यात वारसदारांना या संघर्षाला गृहित धरूनच राजकीय वाटचाल करावी लागणार आहे.

अनिल बाबर यांच्या अकाली निधनानंतर एका निवडणुकीत वारसदारांना विरोध करायचा नाही हा राजकीय संकेत अख्ख्या जिल्ह्याने आतापर्यंत पाळला आहे. अगदी स्व. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर डॉ. विश्‍वजित कदम, आरआर आबांच्या पश्‍चात सुमनताई पाटील यांना आमदारकीची संधी देण्यात आली. या संकेतानुसार सुहास बाबर यांना संधी दिली जाईल असे सध्या तरी वाटत आहे. मात्र, ही संधी वारंवार मिळेलच अशी राजकीय स्थिती नाही. यदाकदाचित पोटनिवडणूक टाळून सार्वत्रिक निवडणूकच झाली तर मात्र, परिस्थिती वेगळी असेल यात शंका नाही.

हेही वाचा – अमरावती लोकसभा मतदारसंघावर रिपब्लिकन गटांचा डोळा

विटा शहरात माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे वर्चस्व आहे. या गटाचे नेतृत्व सध्या माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडे आहे. हा पक्ष सध्या महायुतीचा घटक पक्ष असला तरी मैत्रीपूर्ण लढतीची आपली तयारी असल्याचे सूतोवाच अ‍ॅड. पाटील यांनी गेल्याच महिन्यात केले होते. तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बाबर गटाशी फारसे सख्य नाही. त्यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांनी पुढचा आमदार आटपाडीचाच असेल असा नारा देत माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला आहे. तर माणगंगा साखर कारखाना, आटपाडी बाजार समिती ताब्यात घेऊन आपले राजकीय अस्तित्व दाखविणारे जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनाही राजकीय आकांक्षा खूप आहेत. सुहास बाबर यांच्या रुपात आपण स्व. अनिल बाबर यांना पाहू असे सांगत त्यांनी सध्या तरी आपला विरोध असणार नाही असे दाखवले असले तरी भविष्यात काहीही घडू शकते याची चुणूक माणगंगा कारखाना निवडणुकीवेळी बाबर गटाला दिसली आहे. माणगंगा कारखान्यातून बेदखल झालेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांचीही भूमिका या पुढील काळात काय असेल यावर राजकीय मांडणी अवलंबून असणार आहे. अलिकडच्या काळात त्यांचे स्व.बाबर यांच्याशी सख्य निर्माण झाले होते. हा स्नेह राखतच सुहास बाबर यांना नव्याने स्नेहसंबंध प्रस्थापित करावे लागणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुहास बाबर यांची केवळ आमदार पुत्र म्हणून मतदारसंघाला ओळख आहे असेही नाही. त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून गार्डी ओढा पात्राचे केलेले १३ किलोमीटर रुंदीकरणाचे काम गार्डी पॅटर्न म्हणून चर्चेत आले. मुक्त गोठा योजना त्यांनीच राबवली. या माध्यमातून शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. याचबरोबर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना शेतीमध्ये आधुनिकता यावी यासाठी विटा येथे पाणी, देठ, पान तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारणी करण्याचे त्यांचे प्रयत्न प्रगतीपथावर आहेत. यातून त्यांची गेल्या दशकापासून राजकीय वाटचाल सुरूच आहे. आता त्यांची ओळख राजकीय की रक्ताचे वारसदार म्हणून होते हे जनताच ठरवणार आहे.