ठाणे: प्रभु श्रीराम हे मांसाहारी असल्याचे वादग्रस्त विधान केल्यामुळे टिकेचे धनी ठरलेले राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आता रामाचा नारा देण्यास सुरूवात केली आहे. या समर्थकांकडून आव्हाड यांच्या मतदार संघातील कळवा परिसरात आठ हजार भगव्या झेंड्यांचे वाटप करण्यात आलेले असून हे झेंडे सर्वत्र लावण्यात आलेले आहेत. यामुळे कळवा परिसरात भगवामय झाल्याचे दिसून येत आहे. तसेच या राममय वातावरण निर्मीतीच्या माध्यमातून त्यांचे समर्थक आव्हाडांना धक्का देण्याच्या तयारीत तर नाही ना, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आयोध्या येथे २२ जानेवारीला राम मंदीर उद्घाटन आणि मुर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्वत्र रामाचा जप सुरू झाला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि त्यांच्या पक्षाशी संबंधीत संस्था आघाडीवर असल्याचे दिसून येते. राम मंदीराच्या मुद्दयावरून राजकारण होत असल्याची टिका भाजपवर विरोधकांकडून केली जात आहे. असे असतानाच, प्रभु श्रीराम हे मांसाहारी असल्याचे विधान करून राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाद ओढावून घेतला होता. हा वाद काहीसा शमल्याचे चित्र असतानाच, आता आव्हाड समर्थकांनी रामाचा जप सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा… सांगलीत भाजपच्या पालकमंत्र्यांवर अजित पवारांची कुरघोडी !

आव्हाड यांच्या समर्थकांनी कळवा परिसर भगवामय करत राम घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. यानिमित्ताने टिकेनंतर आव्हाड समर्थकही रामाकडे वळल्याचे चित्र आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या मतदार संघातील कळवा परिसरात त्यांच्या समर्थकांनी आठ हजार भगव्या झेंड्याचे वाटप केलेले आहे. या झेंड्यांवर रामाचे आणि मंदीराचे चित्र आहे. हे झेंडे परिसरातील रस्ते, इमारतींवर लावण्यात आलेले आहेत. ‘मन और घर मे जय श्रीराम’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आव्हाड समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. यानिमित्ताने आव्हाड समर्थकांना जनतेच्या मनातील ‘राम’ कळला असून यातूनच त्यांनी हा उपक्रम राबविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रभु श्रीराम हे आमच्याही मना-मनात आहेत. प्रभु श्रीराम हे प्रत्येक हिंदूंचा अभिमान असून ते प्रत्येकाच्या मना-मनात आहेत. त्यामुळेच आम्ही झेंड्यांमार्फत राम घराघरापर्यंत पोहचविण्याचा छोटा प्रयत्न केला आहे. कळवा परिसरात आठ हजार भगवे झेंडे लावलेले असून हे कोणत्याही राजकीय पक्षाचे नाहीत. या झेंड्यांवर राम आणि मंदिराचे चित्र आहे. ‘मन और घर मे जय श्रीराम’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला आहे. – मंदार केणी, माजी युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट)