पुणे : ‘आमच्या घरातील महिलांवर का आरोप करता? माझ्या तीन बहिणींवर प्राप्तिकर खात्याने छापा टाकायचे कारण काय? सुनेत्रा पवारांचाही पुस्तकात संदर्भ आहे. आमच्या घरातील महिलांवर हे हल्ले करतात. तुमची लढाई राजकीय आहे, तर आमच्याशी लढा,’ असे थेट आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला दिले.

‘ईडीपासून मुक्ती मिळावी, यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला,’ असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी शुक्रवारी पुण्यात याबाबत भाष्य करताना, महायुती सरकारचे वाभाडे काढले. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही आरोप केले.

हेही वाचा >>>पूर्व नागपुरात राष्ट्रवादीसमोर अडचणींचा डोंगर

खासदार सुळे म्हणाल्या, ‘भुजबळ यांनी दावा केलेल्या पुस्तकात आमच्या पक्षातील नेत्यांबरोबच महिलांचाही उल्लेख आहे. पुस्तकामध्ये संदर्भ येताना सुनेत्रा पवारांचेही नाव आहे. त्यांच्यावर आरोप करायचे कारण काय? माझ्या तीन बहिणींच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा टाकला गेला. एक दिवस नाही, तर सलग पाच दिवस ही छापेमारी सुरू होती. त्या वेळी त्यांच्या घरात त्यांची नातवंडे होती. हे सर्व बघून त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल, याचा विचार अदृश्य शक्तीने केला का? की संजय राऊतांच्या आईला काय वाटले असेल? अनिल देशमुख यांच्या नातेवाइकांना कशातून जावे लागले, याचा विचार केला गेला आहे का, असे सुळे म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीसांविरोधात खटला भरायला हवा’

‘सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप असलेले अजित पवार यांच्या फाइलवर शेवटची चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी लावली. त्यावर त्यांचीच स्वाक्षरी होती. पुढे मुख्यमंत्री झाल्यावर ज्यांच्या विरोधात ही कारवाई सुरू झाली, त्याच अजित पवारांना घरी बोलावून ही फाइल दाखवण्यात आली. हा गुन्हा असून, फडणवीस यांच्याविरोधात खटला दाखल केला पाहिजे. फडणवीसांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. या सगळ्यांची उत्तरे फडणवीस यांनी दिली पाहिजेत,’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.