scorecardresearch

तानाजी सावंत : दुष्काळी भागातील ‘रोखठोक’ पुढारी

तानाजी सावंत यांची मंत्रीपदी लागलेली वर्णी उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलवणारी ठरू शकते.

तानाजी सावंत : दुष्काळी भागातील ‘रोखठोक’ पुढारी
तानाजी सावंत : दुष्काळी भागातील 'रोखठोक' पुढारी

सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : दुष्काळी परंडा मतदारसंघात तानाजी सावंत यांची ओळख ‘ लक्ष्मीपुत्र’ अशी. भाजपची जलयुक्त शिवार योजना जेव्हा लोकप्रियतेच्या टिपेला होती तेव्हा ती योजना भाजपाची नाहीच, शिवसेनाच त्या योजनेची जन्मदात्री असे वातावरण निर्माण करण्यासाठी परंडा मतदारसंघात जेसीबीची रांग लावण्यात आली. ‘शिवजलक्रांती’ अशी योजनेची घोषणा करत भाजपवर कुरघोडी करण्याचे समाधान नेतृत्वाला मिळावे यासाठी तानाजी सावंत यांनी खासे प्रयत्न केले. पुढे ते मंत्री झाले. त्यानंतर त्यांचा उस्मानाबाद, सोलापूर या दोन जिल्ह्यातील दुष्काळी पट्टयात रुबाब वाढू लागला. पण पुढे मंत्रीपदाची संधी नाकारली आणि शिवसेनेतील त्यांची नाराजीही वाढली. सेनेतील नाराज नेत्यांच्या यादीतील अग्रणी नाव शिंदे गटात जाणे स्वाभाविक होतेच. पण हा गट एकसंघ राहावा म्हणून त्यांनी केलेल्या प्रयत्नांची बक्षिसी म्हणून तानाजी सावंत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात वर्णी लावली. मराठवाड्यात शिंदे गटाचे ते तिसरे कॅबिनेट मंत्री.

हेही वाचा… राजकारणाच्या वाऱ्याच्या अचूक अंदाजामुळे उदय सामंत यशस्वी

हेही वाचा… डाॅ. विजयकुमार गावित : भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपनेच दिले मंत्रीपद

हेही वाचा… रवींद्र चव्हाण : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि पडद्यामागील कारवायांचे शिलेदार

स्वभाव ‘रोखठोक’! तुकडा पाडायचा स्वभाव. पुणे येथे अनेक शैक्षणिक संस्थांचा पसारा सांभाळणारे तानाजी सावंत हे खरे तर साखर कारखानदार. ‘भैरवनाथ शुगर’च्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघ बांधायला हाती घेतला. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेवर आपला एकहाती वरचष्मा असावा असे सावंत यांचे प्रयत्न लपून राहिले नव्हते. शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर, कैलास पाटील या तरुणांवर वर्चस्व निर्माण करत जिल्ह्यातील शिवसेनेवर त्यांचा वरचष्मा होता. प्रशासनात आपलाच शब्द प्रमाण मानला जावा असे त्यांचे वर्तन असे. खरे तर नियमबाह्य कामांना पुढे रेटायचे कसे, असे प्रश्न अधिकाऱ्यांनी विचारूच नयेत अशी बोलण्याची पद्धत असल्याने तानाजी सावंत यांच्याविषयी अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूरच ऐकू येतात. जिल्हा वार्षिक योजनेतील निधी खर्च करणे असो किंवा निवडणुकीत कार्यकर्ते सांभाळणे असो अंतिम शब्द आपला हवा यासाठी सावंत सातत्याने प्रयत्न करत हाेते. त्यांच्या प्रयत्नांना ‘मातोश्री’ कडून वेसण घालण्यात आली आणि सावंत यांनी त्यांच्या टीकेचा रोख तीव्र केला.

शिवसेनेत फूट पडते आहे असे दिसताच त्या कृतीला गती देण्यासाठी तेही सरसावले. त्यांनी पुरवलेली रसद एकनाथ शिंदे गटासाठी आवश्यक असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. तानाजी सावंत यांची मंत्रीपदी लागलेली वर्णी उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलवणारी ठरू शकते. या जिल्ह्याच्या राजकारणाचे सूत्र डॉ. पद्सिंह पाटील व त्यांचे सुपुत्र राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधाचे होते. ते आता बदलले आहे. त्यात तानाजी सावंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांची दुष्काळी भागातील ‘लक्ष्मीपुत्र’ ही ओळख नवी राजकीय गणिते ठरविणारी असू शकेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tanaji sawant a firebrand leader from drought prone area print politics news asj