तेलंगणामध्ये विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर २०२३ मध्ये होणार आहेत. निवडणुकीला अद्याप वर्षभराचा कालावधी असला तरी या राज्यातील वातावरण आतापासूनच ढवळून निघाले आहे. भाजपाला दक्षिणेकडील कर्नाटक वगळता अन्य राज्यांमध्ये वर्चस्व अजून तरी प्रस्थापित करता आलेले नाही. तेलंगणात भाजपाला यशाची खात्री वाटते. यामुळेच भाजपाने सध्या सारी ताकद ही तेलंगणात लावत आहे. त्यात आता तेलंगणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार बंडी संजय कुमार यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेडचल मतदारसंघातील जवाहर नगरमधील कचऱ्याच्या प्रश्नावरून बंडी संजय कुमार यांनी तेलंगाणा सरकारवर निशाणा साधला. “तेलंगणा राष्ट्र समिती ( टीआरएस ) सरकार सध्या व्हेंटिलेटरवर असून, लवकरच ते कोसळणार आहे. कचऱ्याच्या डेपोमुळे जनतेच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. येथील समस्या सोडवण्याची जबाबदारी भाजपा घेईल. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना जनेतबद्दल प्रेम आणि आदर असेल तर, त्यांनी जबाबदारी घ्यायला हवी होती,” असं संजय कुमार यांनी म्हटलं.

“राव राज्य घटनेचा अपमान…”

“के चंद्रशेखर राव यांनी मेडचल येथील कचरा डेपो गहाण ठेवला असून, तेथे शॉपिंग मॉल्स बांधले जात आहेत. टीआरएसच्या नेत्यांना पकडून कचऱ्याचा डेपोत बांधा आणि भाजपाला सत्ता द्या, मग कसा प्रश्न सुटत नाही ते पाहू. काही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी के चंद्रशेखर राव यांची बरोबरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी करत आहेत. त्या अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. के चंद्रशेखर राव डॉ. आंबेडकर यांनी लिहलेल्या राज्य घटनेचा अपमान करणारी व्यक्ती आहे,” अशी टीका संजय कुमार यांनी केली आहे.

“कमिशनसाठी ट्रॅक्टर खरेदी केली जात…”

“मुख्यमंत्री राव यांच्या कुटुंबीयांसाठी ईडी म्हणजे करोना आणि सीबीआय म्हणजे पाय दुखणे वाटत आहे,” असा टोला लगावत संजय कुमार म्हणाले, “बोदुप्पल भागात १०० खाटांचे रुग्णालय अथवा महाविद्यालय नाही. येथील जमिनी हडप करण्यात येत आहेत. केंद्र सरकारचा निधी वळवण्यात येत आहे. कमिशनसाठी ट्रॅक्टर खरेदी केली जात असून, त्यामाध्यमातून शेकडो कोटींची मालमत्ता कमावली जात आहे,” असा आरोप कुमार यांनी तेलंगणा सरकारवर केला आहे.

“मुख्यमंत्री राव यांना राष्ट्रपतीच्या उमेदवार मुर्मू नको होत्या”

“टीआरएस पक्ष हा माफियांचा केंद्रबिंदू आहे. मेडचल मतदासंघातील किती नागरिकांना घरे देण्यात आली? किती बेरोजगारांना नोकऱ्या आणि त्याचे फायदे मिळाले आहेत? अनुसूचित जाती/जमातीच्या नागरिकांना तीन एकर जमीन दिली जात नाही. दौपद्री मुर्मू अनुसूचित जमातीच्या असल्याने राष्ट्रपतीच्या उमेदवार म्हणून मुख्यमंत्री राव यांना नको होत्या,” असाही आरोप प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांनी केला आहे.

के चंद्रशेखर राव यांचे भाजपबरोबर का बिनसले?

यापूर्वी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे केंद्रातील भाजपाबरोबर चांगले सख्य होते. राज्यसभेत पुरेसे संख्याबळ नसल्याने तेलंगणा राष्ट्र समिती भाजपाला अनुकूल अशी भूमिका वरिष्ठ सभागृहात घेत असे. पण, तेलंगणात हातपाय पसरायला संधी दिसू लागली तशी भाजपाने के चंद्रशेखर राव यांचे पंख कापण्यास सुरुवात केली. गेल्या हंगामात तेलंगणात उत्पादित झालेला सर्व तांदूळ खरेदी करण्यास नकार देऊन भाजपाने तेलंगणा राष्ट्र समितीला पहिला धक्का दिला.

तेलंगणा राज्य पूर्वी निजामाच्या आधिपत्यखालील प्रदेश होता. यामुळे निजामाच्या राजवटीच्या खुणा अजूनही दिसतात. यातूनच भाजपाने धार्मिक ध्रुवीकरणावर भर दिला. लोकसभा निवडणुकीत निझामाबाद, करीमनगर, आदिलाबाद, सिकंदराबाद या चार मतदारसंघात भाजपाचे खासदार निवडून आले. यापैकी तीन मतदारसंघात धार्मिक ध्रुवीकरण भाजपाच्या कामी आले होते. हैदराबादमध्ये तेलंगणा राष्ट्र समितीची एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवेसी यांच्याबरोबर आघाडी आहे. याचा फायदा भाजपाने हैदराबाद महापालिका निवडणुकीत उचलला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana government will collapse soon say state bjp chief bjp telangana president and mp bandi sanjay kumar ssa
First published on: 21-09-2022 at 14:24 IST