तमिळनाडूमधील चिदंबरम येथील प्राचीन अशा नटराजा मंदिरात पुजाऱ्यांनी उत्सवकाळात भाविकांना मंदिरात विशिष्ट जागेवर दर्शन घेण्यापासून मज्जाव केला असल्याचा फलक काढल्यावरून एकच गोंधळ उडाला आहे. मंदिरातील पुजाऱ्यांनी थिरुमंजनमच्या उत्सवाचा उल्लेख करून भाविकांना मंदिरातील विशिष्ट जागेत येण्यापासून मज्जाव केला होता. त्यासाठी त्यांनी हस्तलिखित फलक त्याठिकाणी लावला. हिंदू रिलिजिअस अँड चॅरिटेबल एंडोवमेंट (HR&CE) विभागाने सोमवारी (दि. २६ जून) हा फलक हटविला. गुरुवारी (२९ जून) भाजपातर्फे याविषयावरून आंदोलन करण्यात आले. HR&CE विभाग फलक हटविण्यासाठी आले असताना पुजाऱ्यांनी अडथळा केल्यामुळे ११ पुजाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तमिळनाडूमधील अधिकतर मंदिराची प्रशासकीय व्यवस्था HR&CE विभागाकडून सांभाळली जाते. नटराजा मंदिराचाही त्यात समावेश आहे.

सरकारच्या विभागाने फलक हटवून मंदिराच्या परंपरेचा भंग केल्याचा आरोप काही पुजाऱ्यांनी केला आहे. या पुजाऱ्यांना भाजपानेही पाठिंबा दर्शविला आहे. नटाराजा मंदिराचा वाद सुरू असतानाच एचआर अँड सीई विभाग आणि पोडू दीक्षितार समितीमध्येही वाद निर्माण झाले आहेत. पोडू दीक्षितार हे सदर मंदिराचा सांभाळ, देखरेख ठेवण्याचे काम करतात. द्रमुक सरकार मंदिरावर स्वतःचे नियंत्रण आणू पाहत आहे, असा आरोप दीक्षितार समितीने केला आहे.

दीक्षितार समितेचे वकील जी. चंद्रशेखर म्हणाले की, आम्ही सरकारला आव्हान देत नाही आहोत. पण मंदिरावर नियंत्रण मिळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना आम्ही कायद्याने उत्तर देऊ. दीक्षितार यांच्या दाव्यानुसार उत्सवाच्या काळात मंदिरातील त्या जागेवर कोणत्याही भाविकाला प्रवेस दिला जात नाही, ही जुनी परंपरा आहे. उत्सवाच्या आयोजनासाठी ते अत्यावश्यकदेखील असल्याचे दीक्षितारच्यावतीने सांगण्यात आले.

एचआर अँड सीई विभागाची बाजू उचलून धरताना मंत्री पी.के. सेकरबाबू म्हणाले की, भाविकांना विना अडथळा दर्शनाची सुविधा मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मंडपातून भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी देणारे न्यायालय आणि सरकारी आदेशांचे पालन करण्याचा प्रयत्न एचआर अँड सीई विभागाने केला आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांनी भाविकांना दर्शन घेण्यापासून अडविण्याचा जो निर्णय घेतला, तो अभूतपूर्व आणि अन्यायकारक असा होता.

मंत्री सेकरबाबू यांनी पुजाऱ्यांवर आरोप करताना म्हटले की, नटराजा मंदिर ही खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे पुजारी वागत आहेत. सामान्य जनता आणि सरकारला मंदिराच्या आर्थिक बाबी, उत्पन्न, दाग-दागिणे यासारखी माहिती देण्यासाठी पुजाऱ्यांनी नकार दर्शविला आहे. दुसऱ्या बाजूला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी म्हटले की, सरकारने केलेली कारवाई भाविकांना नाराज करणारी आहे. तसेच द्रमुकची २०२१ साली सत्ता आल्यापासून त्यांनी न्यायालयाने निर्धारित केलेल्या कायदेशीर मर्यादा ओलांडल्या आहेत. तसेच अन्नामलाई यांनी सरकारद्वारा संचलित केल्या जाणाऱ्या मंदिराचे मागच्या १५ वर्षांतील उत्पन्न जाहीर करण्याची मागणी केली होती. सदर उत्पन्न मंदिराला न दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंदिराच्या आवारात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर फलक हटविण्यात आला आहे. तसेच या बालविवाहाची माहिती पुजाऱ्यांना होती, अशी बाबा चौकशीअंती समोर आल्यानंतर पोलिसांनी काही वरिष्ठ पुजाऱ्यांना अटक केली आहे. तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांचे राज्य सरकारसोबत फारसे सख्य नाही आणि त्यांच्यात वारंवार खटके उडत असतात. राज्यपाल रवि यांनी पुजाऱ्यांची बाजू घेतली असून त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.