काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दरबार साहिब किंवा सुवर्ण मंदिराला दिलेल्या भेटीकडे अध्यात्म किंवा राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिले जाते. १९८४ च्या हिंसक पार्श्वभूमीवर गांधी परिवारातील सदस्याच्या सुवर्ण मंदिरातील भेटीकडे नेहमीच वेगळ्या नजरेने पाहिले जाते. राहुल गांधी यांनी सोमवारी (दि. २ ऑक्टोबर) सुवर्ण मंदिराला भेट दिली. खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरची कॅनडामध्ये हत्या केल्यानंतर या हत्येच्या आरोपावरून भारत-कॅनडामध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. यानंतर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) शीखांविरोधात जाणीवपूर्वक प्रचार केला जात असल्याचा आरोप केला आहे. याही पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते.

भारत-कॅनडा वादात केंद्र सरकारने जी भूमिका घेतली आहे, त्याच्या पाठिशी उभे राहण्याची काळजी काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेसचे नेते आणि खासदार जयराम रमेश यांनी मागच्या महिन्यात सांगितले की, दहशतवादाच्या विरोधातील लढा देत असताना, विशेषतः दहशतवादामुळे जेव्हा भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात येते तेव्हा देशाने घेतलेल्या भूमिकेशी तडजोड न करता, त्याच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नेहमीच घेतली आहे. आपल्या देशाचे हित आणि चिंता या इतर कोणत्याही बाबींपेक्षा सर्वोच्च असायला हव्यात.

हे वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी; ओबीसींचा खरा कैवारी कोण?

पूर्वीपेक्षा राहुल गांधी यांचा अमृतसर दौरा यावळे पूर्ण वेगळा आहे. दरबार साहिब गुरुद्वारासमोर गांधी यांनी एका हॉटेलमध्ये आपला मुक्काम केला आहे. रात्री ते हॉटेलमध्ये होते, तर दिवसा त्यांनी दरबार साहिबमध्ये गुरुवाणी कीर्तन ऐकले आणि कम्युनिटी किचनमध्ये भांडी घासून कारसेवकाचे काम केले.

काँग्रेस आणि सुवर्ण मंदिराच्या इतिहासाला हिंसक पार्श्वभूमी आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात सशस्त्र दहशतवाद्यांनी सुवर्ण मंदिराचा ताबा घेतला होता, त्यावेळी लष्काराला पाचारण करून दहशतवाद्यांच्या तावडीतून सुवर्ण मंदिर आणि आतील लोकांची सुटका करण्यात आली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेता शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) इतर राजकीय नेत्यांना जशी विशेष वागणूक दिली जाते, तशी वागणूक राहुल गांधी यांना दिली नाही.

२००८ साली राहुल गांधी यांनी पहिल्यांदा शीख धर्माचे सर्वात पवित्र मंदिर असलेल्या सुवर्ण मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी अधूनमधून अनेकदा इथे भेटी दिल्या आहेत. २०१७ साली पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन होताच, राहुल गांधी यांनी अचानक सुवर्ण मंदिराला भेट दिली होती. त्यांच्या या भेटीची कल्पना राज्यातील नेत्यांनाही त्यावेळी नव्हती.

हे वाचा >> राहुल गांधींची पंजाबमध्ये अध्यात्मिक भेट, गोल्डन टेम्पलमध्ये घासली भांडी; पाहा VIDEO

यावर्षीच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात पंजाबमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेचा प्रारंभ करण्याआधी गांधी यांनी सुवर्ण मंदिरात दर्शन घेतले होते. त्यावेळी गांधी यांनी डोक्यावर भगवे वस्त्र गुंडाळल्यामुळे वादविवाद झाला होता. यावेळी विरोधकांनी टीका करताना म्हटले की, सुवर्ण मंदिराचा ताबा जेव्हा शीख अतिरेक्यांनी घेतला होता, तेव्हा त्यांनीही डोक्यावर भगव्या रंगाचे वस्त्र गुंडाळले होते. राहुल गांधी यांच्या कृतीतून त्या घटनेची आठवण झाली असल्याचे विरोधक म्हणाले. खरेतर ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान सुवर्ण मंदिराला दिलेली एकमेव भेट ही राजकीय हेतूने प्रेरित होती. इतर वेळेला त्यांनी वैयक्तिक आणि खासगी कारणानिमित्त सुवर्ण मंदिरात पाऊल ठेवले आहे. यावर माध्यमांनी प्रश्न विचारला असता राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

शीख गुरुंना प्रसन्न करण्यासाठी शीख धर्मात कारसेवेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशाप्रकारची सेवा ही भेदभावाला तिलांजली देऊन समाजाला एकत्र आणण्याचे काम करते. भाविक त्यांच्या आर्थिक किंवा सामाजिक स्तर, जात, धर्म, पंथ याची पर्वा न करता कारसेवा करण्यासाठी एकत्र येत असतात.

खलिस्तानी पार्श्वभूमी वगळता राहुल गांधी यांच्या सुवर्ण मंदिर भेटीमागे आणखी एक योगायोग आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये सध्या काँग्रेस नेते सुखपाल सिंह खैरा यांच्या अटकेमुळे तणाव निर्माण झालेला आहे. इंदिरा गांधी यांची ज्या दिवशी हत्या करण्यात आली होती, त्याच्या वर्धापनाच्या दुसऱ्या दिवशीच खैरा यांना अटक करण्यात आले होते.

आणखी वाचा >> २००४ साली राहुल गांधींचा सक्रीय राजकारणात प्रवेश, पण त्यापूर्वी ते काय करत होते?

सुवर्ण मंदिराने चित्र, माहिती फलक, गोळ्या झाडल्याचे निशाण याच्या रुपात इतिहासातील आठवणी आजही जतन करून ठेवल्या आहेत. एसजीपीसी दरवर्षी घल्लूघरा (ऑपरेशन ब्लू स्टार) चा वर्धापन दिन आणि इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करत असते.