नवी दिल्ली : जेमतेम वर्षभरापूर्वी बांधून पूर्ण झालेल्या नव्या संसद भवनाला गळती लागली आहे. बुधवारी झालेल्या पावसामध्ये खासदारांच्या एका लॉबीत छतातून पाणी टपकू लागल्याने तेथे बादली ठेवण्याची वेळ आली. ही चित्रफीत काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी ‘एक्स’वर टाकल्यामुळे या मुद्द्याला तोंड फुटले. त्यामुळे आता सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

संसद भवनातील गळतीबाबत टागोर यांनी गुरुवारी स्थगन प्रस्ताव दिला. संसदेबाहेर पेपरफुटी आणि संसदेच्या आता पाण्याची गळती, अशी टोकदार टीका त्यांनी केली. पाण्याची गळती झालेल्या लॉबीचा विद्यामान राष्ट्रपतींनी वापर केला होता. ही इमारत बांधून फक्त एक वर्ष झाले असताना पाण्याची गळती कशी होऊ शकते? या इमारतीच्या टिकावूपणाचा मुद्दा गंभीर असून त्यावर तातडीने तोडगा काढला पाहिजे, असेही टागोर यांनी एक्सवरील संदेशात लिहिले आहे. नव्या इमारतीची सखोल पाहणी करण्याची गरज असून त्यासाठी सर्वपक्षीय समिती नेमण्याची मागणीही त्यांनी केली.

बुधवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे इमारतीचे मुख्यद्वार असलेल्या मकरद्वारासमोर मोठ्या प्रमाणावर पाणीही साठले. १२०० कोटींच्या इमारतीला १२० रुपयांच्या बादलीचा आधार, अशी मार्मिक टिप्पणी आम आदमी पक्षाने केली. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी नव्या इमारतीच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला. अयोध्येमध्ये राम मंदिराला गळती लागली आता नव्या संसदभवनातही गळती होत असून मोदी-शहांच्या ठेकेदारींनी ही वास्तू निर्माण केली असून ती खचू लागली आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पामध्ये लाचखोरी झाली आहे. ठेकेदारांच्या माध्यमातून निवडणुकांसाठी पैसे गोळा केले जात आहेत, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. संसदेची नवी इमारत पर्यावरणस्नेही असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र निसर्गाचे तिच्यावर इतके प्रेम असेल असे वाटले नव्हते, अशी टीका काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी केली.

हेही वाचा >>>“पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्याही भेटी घ्याव्यात”; अधीर रंजन चौधरींचा पक्षाला घरचा आहेर, तृणमूलवरही आगपाखड

समस्या सोडविल्याचा दावा

पाणीगळती थांबली असून समस्येवर उपाय करण्यात आल्याचे स्पष्टीकरण लोकसभा सचिवालयाकडून देण्यात आले. हरित संसदेची संकल्पना लक्षात घेऊन इमारतीच्या लॉबीसह अनेक भागांमध्ये काचेचे घुमट बसवण्यात आले आहे. या घुमटांमुळे मुबलक नैसर्गिक प्रकाशाचा वापर दैनंदिन कामात करता येतो. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात इमारतीच्या लॉबीवरील काचेचे घुमट घट्ट बसावे यासाठी वापरण्यात आलेले एडेसिव्ह निघाले होते. त्यामुळे पाण्याची किरकोळ गळती झाली. घुमटाची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच मकरद्वारसमोरील साचलेल्या पाण्याचाही निचरा झाल्याचे सचिवालयाकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव्या संसद भवनाच्या एका खासदार लॉबीमध्ये बुधवारी पाणीगळती झाली. काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी ‘एक्स’वर चित्रफीत टाकल्यामुळे या प्रकाराला वाचा फुटली.