‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या आपल्या ब्रीदवाक्याचे तंतोतंत पालन करणाऱ्या, नागरिकांच्या सेवेत तत्परता दाखवण्याचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या पुणे पोलिसांना त्यांच्या या सद्गुणांमुळेच सतत नागरिकांच्या त्रासाला कसे तोंड द्यावे लागते याचे आणखी एक उदाहरण पुण्यातील तीन मुलींनी आणि त्यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांनी चालवलेल्या छळाच्या प्रकरणातून पुढे आले आहे.
पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर असलेल्या, राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात शिक्षणासाठी, नोकरीधंद्यासाठी ‘बाहेरून’ येणाऱ्या आणि इथली सगळी संस्कृती ‘बिघडवून’ टाकणाऱ्या लोकांना ‘सरळ’ करण्याचे, सामाजिक कार्यकर्त्यांना ‘लायनीवर आणण्या’चे पोलिसांचे प्रयत्न विफल ठरवणाऱ्यांना ‘धडा’ शिकवण्याच्या पोलिसांच्या कामात किती व्यत्यय आहे, हे यानिमित्ताने दिसून येते आहे.
आता हे प्रकरण काय, तर छत्रपती संभाजीनगरमधील एक विवाहिता, सासरी होणारा छळ नशिबाचा भाग म्हणून भारतीय पतिव्रता नारीसारखा निमूटपणे सहन करायचा सोडून पुण्याला निघून आली. तिचे सासरे निवृत्त पोलीस अधिकारी. केवढा तो त्यांचा दबदबा. सुनेने असा बट्टा लावला तर चिडणारच. पण त्यांनी काळजीपोटी सून मिसिंग असल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दिली आणि आपली सगळी ताकद वापरून सुनेचा ठावठिकाणा शोधून काढला.
ती एका रात्रीपुरती पुण्यात कोथरूडमध्ये तीन मुलींच्या घरी राहिली होती. हे कळल्यावर औरंगाबादचे स्थानिक पोलीस आणि कोथरूडमधले पोलीस घेऊन ते त्या ठिकाणी पोहोचले तर सून तिथून गायब. ती ज्यांच्याबरोबर राहिली त्या मुलींनी आता या वयोवृद्ध सासऱ्यांना सहकार्य करावं की नाही…? सीधे उंगली से घी निकलता नही तो उंगली टेढी करनी पडती है, हे पोलिसांइतकं दुसऱ्या कुणाला माहीत असणार ? आता गनिमी काव्यातून एखाद्याकडून माहिती काढून घ्यायची तर काय त्याला सांगून जायचं काय त्याच्या घरी ? जरा भीती दाखवली तर पोरी पोपटासारखं बोलतील, सून कुठे आहे ते सांगतील, त्या म्हाताऱ्या सासऱ्यांची सुनेबद्दलची काळजी कमी करता येईल, या चांगल्या हेतूने पोलिसांनी उचललं त्या पोरींना, पोलीस ठाण्यात नेलं… तर किती तो कांगावा… मुलींकडून त्या सुनेची माहिती काढून घेणं हा पोलिसांचा शुद्ध हेतू होता.
थोडा पोलिसी खाक्या दाखवला तर लोक कसे पटापट बोलतात, हे त्यांनाच माहीत. म्हणून जरा गप्पा मारल्या तर म्हणे पोलिसांनी जातीवरून शिव्या दिल्या, महिला म्हणून त्रास दिला. मारहाण केली. एलजीबीटीक्यू वाल्या आहात का विचारलं… असे पोरींचे आरोप. पोलिसांनी काय केलं ते बघायला समोर कोणीही नव्हतं, म्हणून काय काहीही बोलायचं…? त्या ‘आपल्या’पैकी आहेत का, हे बघायला पोलिसांनी जात विचारली, उद्या पोरींची नीट लग्नं व्हायला हवीत, म्हणून त्या ‘नीट’ आहेत ना, हे समजून घ्यायला घरी पोरंबिरं येत नाहीत ना, हे विचारलं तर पोलीस वाईट? आपला मुलगा गे आणि मुलगी लेस्बियन नाही ना याची काळजी आजकाल प्रत्येक आईबापाला असते. त्याच भावनेतून पोलिसांनी माहिती काढायचा प्रयत्न केला तर लगेच पोलीस वाईट ? पोलीस ज्यांच्या रक्षणासाठी आहेत, त्यांच्याशी थोडेच असं वागणार आहेत? ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे त्यांचं ब्रीदवाक्य नाही का?
या तीन मुली साध्यासुध्या नोकरी करणाऱ्या मुली होत्या म्हणे…साध्या मुलींचे थोडेच कार्यकर्ते, राजकीय नेते यांच्याशी लागेबांधे असतात? त्यामुळे त्या साध्या नाहीत, हे पोलिसांना तर लगेच कळलं. कारण लगेच निरुद्योगी कार्यकर्ते काय गोळा झाले, फुकटचं फुटेज खायला राजकीय नेते काय गोळा झाले… लगेच अॅट्रॉसिटी, विनयभंग, ही कलमं, ती कलमं ही भाषा काय बोलायला लागले. ज्यांच्याबद्दल हे सगळं चाललंय, त्या मुली राहिल्याच बाजूला, कार्यकर्त्यांचाच आवाज जास्त. ज्यांना त्रास झाला त्या मुलींनी बोलावं ना.
पण त्या आपल्या तोंडाला फडकी बांधून नामानिराळ्या. म्हणजे ज्यांच्यावर म्हणे अन्याय झाला, त्या गप्प आणि चेव कुणाला तर रिकामटेकड्या कार्यकर्त्यांना. त्यांचं आपलं एकच टुमणं की पोलिसांनी या मुलींवर अन्याय केला. त्या पोलीस अधिकाऱ्याच्या मिसिंग सुनेसाठी पोलीस एवढं आकाशपाताळ एक करताहेत त्याचं यांना काहीच नाही. हे परदेशी निधी घेणाऱ्या संस्थांकडून फेलोशीप वगैरे घेणार, अर्बन नक्षलींबरोबर उठबस करणार, आणि वाईट कोण तर पोलीस? अर्बन नक्षलींना उगीच कोणी भेटतं का? अशा कार्यकर्त्यांना बोलावणारेही अर्बन नक्षली असणारच ना?
…आणि कायदे बियदे तर या कार्यकर्त्यांहून जास्त खरंतर जास्त पोलिसांनाच माहीत. पण या बाहेरून पुण्यात आलेल्या, लहान मुलींना जास्त त्रास व्हायला नको, प्रकरण वाढवायला नको, म्हणून पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही. वर असं काही घडलंच नाही, असं म्हणून प्रकरण संपवायचा प्रयत्न केला, तर लगेच सुरू की पोलीस सगळं दडपायला बघताहेत… पोलिसांचं चांगलं वागणं दिसतच नाही या लोकांना.
एकूण काय पोलीस बिचारे कसेही वागले तरी थपडाच खातात. या अर्बन नक्षल मुली आणि बायकांनी त्यांचा अगदी छळ चालवला आहे.