त्रिपुरामध्ये मागील काही महिन्यांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून सत्ताधारी भाजपा पक्षाला मोठे धक्के बसत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता येथे भाजपाच्या आतापर्यंत सहा आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. असे असतानाच दिबाचंद्रा हरंगखवाल या भाजपाच्या सातव्या आमदारानेही आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा >>> बिहारमध्ये होणार जातीनिहाय जनगणना! आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नितीशकुमारांचा निर्णय

हरंगखवाल हे धलाई जिल्ह्यातील करमचेरा मतदारसंघाचे आदिवासी आमदार आहेत. “मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे मी हा निर्णय घेतला आहे,” असे हरंगखवाल यांनी सांगितले आहे. तसेच “माझी आगामी वाटचाल कशी असेल, याबाबत मी अद्याप ठरवलेले नाही. मात्र निश्चितच राजकारणी असल्यामुळे मी आगामी काळातही राजकारणात सक्रीय असेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> गुलाम नबी आझाद यांना धक्के, आतापर्यंत १२६ नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी; प्रस्थापित होण्याआधीच अस्तित्व धोक्यात?

याआधी हरंगखवाल हे काँग्रेस पक्षात होते. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले होते. मात्र २०१८ च्या विधानसभा निवडणुकीअगोदर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. तर हरंगखवाल यांच्या जाण्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा भाजपाने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वर्षात एकूण चार आमदारांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. आशिष कुमार साहा, सुदीप रॉय ब्रमन, बुर्बो मोहन त्रिपुरा या महत्त्वाच्या नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. साहा आणि ब्रमन यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन फेब्रुवारी महिन्यात काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.