उदयपूर फाइल्स हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट २०२२ मधील टेलर कन्हैय्या लाल तेली यांच्या हत्याकांडावर आधारित आहे. या आठवड्यात जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष आणि दारूल उलुम देवबंदचे प्राचार्य मोलाना अर्शद मदनी यांनी उदयपूर फाइल्सच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी दिल्ली, महाराष्ट्र व गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. असे असताना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने त्याचे प्रदर्शन स्थगित करण्यास नकार दिला आहे. या चित्रपटाचे निर्माते अमित जानी हेदेखील कायम वादाच्या केंद्रस्थानी असतात. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील वादग्रस्त १५० दृश्ये काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. तरीही अद्याप हा चित्रपट वादातच अडकलेला आहे.
कोण आहेत उदयपूर फाइल्सचे निर्माते अमित जानी?
या चित्रपटाचे निर्माते अमित जानी हे पहिल्यांदा जुलै २०१२ मध्ये प्रसिद्धीझोतात आले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या हिंदू संघटनेच्या इतर तीन सदस्यांना लखनऊच्या आंबेडकर पार्कमधील उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यासाठी नेले होते. अमित जानी यांनी पत्रकार परिषदेत मागणी केली होती की, समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पक्षाच्या निवडणूक आश्वासनांचे पालन करून मायावतींचे पुतळे हटवावेत. अन्यथा, त्यांनी धमकी दिली होती की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेप्रमाणेच उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनाही काम करील.
फेब्रुवारी २०१२ मध्ये तत्कालीन राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष अजित सिंह आणि काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवल्याबद्दल उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रहिवासी असलेल्या ४४ वर्षीय आझम खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मे २०१६ मध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांना धमकी दिल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती.
अमित जानी यांच्यावरील आरोप
- एप्रिल २०१७ मध्ये काही विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी क्रिकेट संघाला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्ली -देहारादून महामार्गावर काश्मिरींना राज्य सोडा; अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे आवाहन करणारे होर्डिंग्ज लावल्याचा आरोप होता. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. त्याच वर्षी जुलैमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सपा नेते आझम खान यांची जीभ कापण्याची मागणी केल्याबद्दल त्यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- ऑक्टोबर २०१७ मध्ये यूपी पोलिसांनी त्यांना ताजमहालच्या घुमटावर आणि मिनारावर भगवे झेंडे असलेली एक प्रतिमा सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल आणि ताजमहालमध्ये भगवे झेंडे फडकवून हिंदू संघटनांच्या मेळाव्याचे आवाहन केल्याबद्दल अटक केली.
- डिसेंबर २०१८ मध्ये, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर त्यांच्या संघटनेवर लखनऊमध्ये योगी विरूद्ध मोदी असे होर्डिंग्ज लावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये जुमलेबाजी विरुद्ध योगींचा हिंदुत्व ब्रँड अधोरेखित करण्यात आला होता.
- फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी त्यांच्या नोएडा हॉटेलमध्ये काश्मिरींना परवानगी नाही, असे फलक लावले होते. अमित जानी यांनी उदयपूर फाइल्स चित्रपट बनवला असला तरी त्यांनी शंभूलाल रेगर यांना २०१९ च्या लोकसभेचे तिकीट जाहीर केले होते. रेगर यांनी डिसेंबर २०१७ मध्ये राजसमंदमध्ये स्थलांतरित कामगार मोहम्मद अफ्राझल खान यांची अशाच प्रकारे हत्या केली आणि नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. उदयपूर प्रकरणात रेगर याचंही नाव जोडलं जात होतं.
- २०१७ मध्ये अमित जानी यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या काकांच्या नावावर शिवपाल यादव युवा ब्रिगेडची स्थापना केली. अखिलेश यांच्याशी मतभेद झाल्यानंतर प्रगतिशील समाजवादी पक्षाची (लोहिया) स्थापना करणाऱ्या शिवपाल यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये अमित जानी यांना त्यांच्या पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष बनवले. अगदी अलीकडेच अमित जानी यांनी हिंदू कृती दलदेखील सुरू केले.
२०२२ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीसाठीच्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रात अमित जानी यांनी मेरठ, दिल्ली, अमरोहा, लखनऊ, आग्रा व रामपूर येथे त्यांच्याविरुद्ध १४ प्रलंबित खटले दाखल असल्याची माहितीसह यादी दिली. त्यामध्ये २०१० मध्ये मेरठमधील शिवसेनेच्या कार्यालयाची तोडफोड, मायावतींच्या पुतळ्याची तोडफोड, हुंड्यासाठी छळ, लूटमार व डॉक्टरला धमकावणे यांसारख्या प्रकरणांचा उल्लेख होता.
‘उदयपूर फाइल्स’च्या प्रदर्शनाची तारीख जशी जवळ येत आहे, तसा अमित जानी यांनी दावा केला आहे की, त्यांना सोशल मीडियावर या चित्रपटासाठी जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
ठळक मुद्दे:
- ‘उदयपूर फाइल्स’ ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
- सर्वोच्च न्यायालयाने त्याचे प्रदर्शन स्थगित करण्यास नकार दिला आहे
- ‘उदयपूर फाइल्स’ कन्हैयालाल हत्याकांडावर आधारित आहे
४,००० हून जास्त चित्रपटगृहांत होणार प्रदर्शित
या चित्रपटाला केवळ धार्मिकच नाही, तर राजकीय समर्थनही मिळत आहे. कारण- कन्हय्यालाल यांच्या कुटुंबीयांनी निर्माते अमित जानी यांच्यासह पाटणा येथे आयोजित महाकुंभाला हजेरी लावली. तसेच आचार्य धीरेंद्र शास्त्री यांचे आशीर्वादही घेतले. शुक्रवारी (११ जुलै) हा चित्रपट चार हजारहून अधिक चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. पण, त्याआधीच चित्रपटाच्या समर्थन आणि विरोधाचा आवाज देशभरात उठू लागला आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप
“चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नुपूर शर्मा यांचे वादग्रस्त विधान आहे. त्यामुळे देशभरातील धार्मिक वातावरण बिघडले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमाही खालावली आणि इतर देशांसोबतच्या आपल्या मैत्रीपूर्ण संबंधांवरही नकारात्मक परिणाम झाला”, असे अर्शद मदनी म्हणाले.
२८ जून २०२२ रोजी मोहम्मद रियाज आणि घौस मोहम्मद या दोन व्यक्ती उदयपूर येथील कन्हय्यालाल यांच्या दुकानात ग्राहक म्हणून गेले. कन्हय्यालाल तेली यांनी भाजपा प्रवक्त्या शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या कारणाने त्यांची हत्या करण्यात आली. शर्मा यांना थेट टेलिव्हिजन चर्चेदरम्यान पैगंबरांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल निलंबितही करण्यात आले होते.
सोमवारी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी महाराष्ट्र विधानसभेत सांगितले की, चित्रपट प्रदर्शित केल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे त्यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. त्यांनी धर्माच्या नावाखाली फूट, अपमान किंवा हिंसाचार पसरवणाऱ्यांविरुद्ध खासगी सदस्य विधेयकदेखील मांडले. यापूर्वीही राजस्थानमध्ये या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये वाद झाला होता. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सरकारवर हल्लाबोल करीत म्हटले होते की, तीन वर्षांच्या खटल्यानंतरही इतक्या साध्या सरळ प्रकरणात दोषींना अद्याप शिक्षा झालेली नाही. दरम्यान, तेली कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनी चित्रपटाचे समर्थनही केले आहे. तसेच पत्रकार परिषदा, मंदिराला भेटी आणि धार्मिक नेते व राजकारण्यांच्या बैठकीमध्ये अमित जानी यांच्यासोबत ते गेले आहेत.