छत्रपतींच्या दोन वारसांमध्ये महाविकास आघाडीने शाहू महाराजांना मानाने उमेदवारी दिली. पण, साताऱ्याचे वंशज उदयनराजे भोसलेंना भाजपचे नेते भेटही द्यायला तयार नाहीत. दिल्लीत ठाण मांडून बसण्याचा उदयराजे यांचा शनिवार हा तिसरा दिवस आहे. त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी अजूनही भेट दिलेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, संध्याकाळी दिल्लीत येणार असून प्रदेश भाजप नेत्यांसोबत उदयनराजेंना शहांच्या भेटीची संधी दिली जाईल.
निरोपासाठी कान आतुरले!
उदयनराजेंना सातारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवायची असली तरी भाजपने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. साताऱ्यात त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय प्रदेश भाजप नेत्यांच्या हाती नसल्याने उदयनराजेंनी थेट दिल्ली गाठली. ते राजे असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांना तातडीने भेट देतील अशी त्यांची अपेक्षा असावी. पण, त्यांच्या हाती निराशा आली असून उदयनराजे यांना शहांनी तीन दिवस ताटकळत ठेवले आहे. दिल्लीतील निवासस्थानी शहांच्या निरोपाची वाट पाहण्याखेरीज राजेंना काहीही करता आलेले नाही. याबद्दल उदयनराजेंनी ‘लोकसत्ता’शी बोलण्यास नकार दिला. उदयनराजे भाजपचे राज्यसभेतील खासदार असून आणखी दोन वर्षांनी त्यांची वरिष्ठ सभागृहातील मुदत संपेल.
हेही वाचा – मराठा आंदोलनाच्या माध्यमातून प्रणिती शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
तेव्हा राजेंसाठी शहांच्या पायघड्या…
२०१९ मध्ये उदयनराजे भोसले यांनी लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर २०२० मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच उदयनराजेंचे वाजतगाजत भाजपमध्ये स्वागत केले होते. उदयनराजेंचा भाजप्रवेश हा दिल्लीत मोठा सोहळा झाला होता. भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश करण्यापूर्वी उदयनराजे यांनी शहांच्या कृष्णमेनन मार्गावर भेट घेतली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस व अन्य भाजप नेतेही उपस्थित होते. तमाम पत्रकारांनाही शहांच्या निवासस्थानी बोलावण्यात आले होते. त्यावेळी शहांनी निवासस्थानी उदयनराजेंची बडदास्त ठेवली होती. या सोहळ्यानंतर उदयनराजेंना भाजपने एप्रिल २०२० मध्ये राज्यसभेचे खासदार केले.
हेही वाचा – विखे-पाटील यांच्या माफीनाम्यानंतरही भाजपमधील निष्ठावंतांची नाराजी कायम
मध्यस्थीची अखेरची आशा
उदयनराजेंनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भरपावसात सभा घेऊन वातावरण पालटून टाकले होते. या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील विजयी झाले होते. त्याच साताऱ्यातील उदयनराजे यांनी वरिष्ठ सभागृहात क्वचितच कधी पाऊल टाकले असेल. आता त्यांना पुन्हा साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. पण, भाजपने जाहीर केलेल्या राज्याच्या उमेदवारींच्या पहिल्या यादीत उदयनराजेंना स्थान दिले नाही. त्यामुळे राजे आणखी अस्वस्थ झाल्याचे सांगितले जाते. राजेंना फडणवीस दिल्लीत येऊन मध्यस्थी करण्याची अखेरची आशा उरली आहे.