कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या माजी नगरसेविका वैशाली दरेकर-राणे यांना कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी देऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात महिला उमेदवार उतरविण्याची खेळी खेळली आहे. उमेदवारीच्या चर्चेत ठाकरे गटाकडून दरेकर यांचे नाव कधीही चर्चेत नव्हते. पूर्वाश्रमीच्या मनसेच्या नगरसेविका राहिलेल्या दरेकर त्याच पक्षाकडून २००९ साली लोकसभा निवडणुकही लढल्या होत्या. कल्याण डोंबिवलीत पालिकेत डोंबिवली विभागातून गोग्रासवाडी भागातून वैशाली दरेकर यांनी मनसेच्या नगरसेविका म्हणून काम पाहिले. त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. महिला आणि बालकल्याण समितीचे सभापती पद त्यांनी भुषविले होते.

उत्तम वक्त्या म्हणून त्या ओळखल्या जातात. पालिकेत विरोधी पक्षनेत्या असताना शहरातील अनेक विकास कामे मार्गी लावण्यात त्यांचा पुढाकार होता. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत महत्वाचे विषय लावून धरून अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन नागरी समस्या, विकास कामांचे विषय मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा होता. मनसेमध्ये त्यांनी प्रदेश पातळीपर्यंत कामे केली. शिवसेना, मनसेमध्ये असताना अनेक आंदोलने, उपोषणांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

हेही वाचा : ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरला, ‘या’ महिला नेत्याला दिली संधी

दरम्यानच्या काळात मनसेमध्ये कोंडी होऊ लागल्याने त्या मनसे पक्षातून बाहेर पडल्या. त्या शिवसेनेत दाखल झाल्या. शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षा बरोबर राहणे पसंत केले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत वैशाली दरेकर यांनी शिवसेनेचे आनंद परांजपे यांच्या विरुध्द मनसेकडून निवडणूक लढविली होती. त्यांना एक लाख दोन हजार ६३ मते त्यावेळी मिळाली होती.

ठाकरे गटात आता त्या सक्रिय होत्या. ठाकरे गटाचे महिला संघटनेचे पद त्यांच्याकडे होते. उत्तम वक्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या डोंबिवलीकर माहेरवाशीण आहेत. या नाते संबंधातून वैशाली दरेकर यांना ही उमेदवारी मिळाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये मातोश्रीच्या खास विश्वासातले ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांचा महत्वाचा सहभाग असल्याचे समजते.

हेही वाचा : “मला त्या पापात वाटेकरी व्हायचं नाही”, ठाकरे गटात प्रवेश करताच खासदार उन्मेश पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप

डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात आगरी समाजातील एखादा उमेदवार दिला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. माजी आमदार सुभाष भोईर यांच्या नावाची चर्चाही जोरात होती. याशिवाय युवासेनेचे वरूण सरदेसाई, सुषमा अंधारे, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे अशा काही नावांची चाचपणी करण्यात आली होती. मात्र चर्चेत असलेल्या या नावांना बगल देत खर्ड्या वक्त्या आणि अभ्यास व्यक्तीमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या वैशाली दरेकर यांना संधी देत उद्धव ठाकरे यांनी कल्याणात नवा प्रयोग केला आहे.