Top 5 Political Breaking News Today :  कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावली, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महायुतीत वादाची पहिली ठिगणी पडली. एकनाथ शिंदे यांनी सलग दुसऱ्यांदा माथाडी मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने त्यांचे शिलेदार चिंतातूर झाल्याचे पाहायला मिळाले. कर्जमाफीबाबत दगाफटका केल्यास कोणालाही सोडणार नाही, असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला. सरदार वल्लभाई पटेल यांचा दाखला देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली. या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…

उद्धव ठाकरे यांना चौकशी आयोगाची नोटीस

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाने राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘कारणे दाखवा‘ नोटीस बजावली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, यांनी दाखल केलेल्या अर्जासंदर्भात ही नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना दोन डिसेंबर रोजी आयोगासमोर समक्ष किंवा अधिकृत प्रतिनिधीद्वारे उपस्थित राहावे लागणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी फेब्रुवारी महिन्यात आयोगाला अर्ज केला होता. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी २४ जानेवारी २०२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या एका पत्राचा उल्लेख करण्यात आला होता. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचाराचा कट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रचला होता, असे आंबेडकर यांनी अर्जात म्हटले होते. त्यानंतर आयोगाने ठाकरे यांना दोन वेळा नोटीस बजावत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. मात्र, ठाकरे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे आयोगाने उद्धव ठाकरे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात जुंपली

आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीआधी महायुतीत वादाची पहिली ठिगणी पडली आहे. रायगड जिल्ह्यातील जागावाटपावरून शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि अजित पवार गटाचे खासदार यांनी एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीकेचा भडिमार केला आहे. गोगावले यांनी सुचवलेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची तटकरे यांनी खिल्ली उडवली आहे. त्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनीही तटकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आम्ही कोणाची चिंता करत नाही. आम्ही आता आमच्या बंधनातून मुक्त झालो आहे. रवी मुंढे यांच्या पक्ष प्रवेशावरून आमच्या विजयाची नांदी दिसून येत आहे”, असा टोला गोगावले यांनी लगावला आहे.

आणखी वाचा : मोहम्मद अझरुद्दीन यांची मंत्रिपदी वर्णी, भाजपाचा तीव्र संताप; काँग्रेसवर आरोप काय?

एकनाथ शिंदे यांचे शिलेदार चिंतातूर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग दुसऱ्यांदा माथाडी कामगारांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने आगामी निवडणुकांमध्ये माथाडी बहुल वस्त्यांमधून वर्चस्वाच्या आशेवर असलेले शिंदेंचे चिंतातूर दिसू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी या मेळाव्याच्या आयोजनासाठी स्वत: शिंदे यांनीच गळ घातली होती. आधी बुधवार, मग गुरुवार सकाळी आणि शेवटी त्याच दिवशी सायंकाळी अशा वेळ, तारखा बदलांचे घोळ घालत शिंदे यांनी पाटील यांच्या कार्यक्रमापुर्वीच नाकीनऊ आणले होते. अखेर ठरवून दिलेल्या वेळेतही शिंदे बच्चू कडु यांच्या मोर्च्याचे कारण देऊन फिरकले नाहीत. त्यामुळे नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून याठिकाणी आलेल्या माथाडी कामगारांचा मोठा हिरमोड झाला असून भाषणा दरम्यान नरेंद्र पाटील यांना फुटलेल्या हुंदक्यांमुळे शिंदेच्या नवी मुंबईतील समर्थकांना आता घाम फुटू लागला आहे.

कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा सरकारला इशारा

राज्य सरकारने दगाफटका केला तर कोणालाही सोडणार नाही, असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नागपूरमध्ये राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. अखेर सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आणि बच्चू कडू यांना गुरुवारी बैठकीसाठी मुंबईमध्ये बोलावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांची देखील उपस्थिती होती. या बैठकीमध्ये ६ जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करू असा शब्द सरकारने बच्चू कडू यांना दिला. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. त्याचबरोबर त्यांना इशारादेखील दिला.

हेही वाचा : पाकिस्तानला धडकी भरवणारा हवाई तळ भारताच्या हातातून निसटण्यामागे चीनचा हात?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी

देशाचा कारोभार एका व्यक्तीच्या भरोशावर चाल नाही, असे म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. भाजपा सरकारने देशाचे दोन तुकडे पाडल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. इतक्यावरच न थांबता सरदार वल्लभाई पटेल यांचा दाखला देत खरगेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा बंदी घालण्याची मागणी केली. “सरदार पटेल यांनी आरएसएस आणि जमात-ए-इस्लामीवर बंदी घातली होती. आज त्याच संस्थेला सरकारी कर्मचाऱ्यांशी जोडण्याची परवानगी दिली जात आहे, हे पटेल यांच्या वारशाचा अपमान आहे. जर मोदी आणि अमित शाह यांना खरोखरच पटेलांचा सन्मान असेल तर त्यांनी आरएसएसवर बंदी घातली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे देशात धार्मिक तणाव वाढला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे”, असा आरोपही खरगे यांनी केला.