Uddhav Thackeray-Raj Thackeray Alliance : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत लवकरच युती होणार, अशा चर्चांना पुन्हा वेग आला आहे. मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्रित लढणार, असे संकेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने दिले आहेत. एकेकाळी दुरावलेल्या या दोन्ही भावांकडून युतीबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्या संदर्भात वक्तव्य केलं आहे. “ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्रित लढवतील आणि जिंकतील. मुंबई, ठाणे, नाशिक व छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांसारख्या अनेक ठिकाणच्या जागांबद्दल चर्चा सुरू असून, कोणतीही वाईट शक्ती त्यांच्या एकीला तोडू शकणार नाही”, असं राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांना सांगितलं.
राज ठाकरेंची बदलती भूमिका व भाजपाचा दृष्टिकोन
राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेतेही संभ्रमात असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सत्ताधारी महायुतीमधील इतर नेत्यांबरोबरच्या अलीकडच्या भेटींमुळे ते भाजपाशी हातमिळवणी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मुंबईतील मराठी मतदार मनसेच्या पाठीशी असल्याने भाजपाही त्यांना महायुतीत सामावून घेईल, असं सांगितलं जात होतं. सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर त्यांची युतीची चर्चा सुरू असली तरी आतापर्यंतच्या निवडणुकीचा इतिहास पाहता, मनसेचा प्रभाव मर्यादित असल्याचं दिसून येतं.
आतापर्यंतच्या निवडणुकांमधील मनसेची कामगिरी
२००७ मध्ये राज ठाकरेंनी एकसंध शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं ५.७ टक्के मताधिक्यासह एकूण १३ जागा जिंकल्या; पण त्यानंतर पक्षाचा आलेख घसरला. २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला फक्त एकच जागा जिंकता आली. तर, गेल्या वर्षीच्या निवडणुकीत त्यांना भोपळाही फोडता आला नाही. तरीही राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा जोरकसपणे लावून धरल्यानं मराठी मतदारांमध्ये त्यांना मोठी लोकप्रियता असल्याचं दिसून येतं. मनसेनं आतापर्यंत लढलेल्या तीन महानगरपालिका निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांच्याबरोबर युती केल्यास फायदा होऊ शकतो.
आणखी वाचा : योगी आदित्यनाथांचं कौतुक करणाऱ्या महिला आमदाराची पक्षातून हकालपट्टी; कोण आहेत पूजा पाल?
महापालिका निवडणुकांमधील मनसेची कामगिरी
- महाराष्ट्रातील एकूण २२ महानगरपालिकांमध्ये नगरसेवक पदाच्या दोन हजार ११८ जागा आहेत.
- २००६ ते २००९ दरम्यान मनसेनं १२ महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि ५.८७ टक्के मतांसह ४५ जागा जिंकल्या.
- मनसेची सर्वोत्तम कामगिरी नाशिकमध्ये झाली, जिथे पक्षानं १०८ जागांपैकी १२.९७ टक्के मताधिक्यासह एकूण १२ जागा जिंकल्या.
- त्यानंतर पुणे महानगरपालिकेतील १४४ पैकी आठ जागा जिंकल्या. पुण्यात मनसेला मिळालेली मतं ७.७४ टक्के होती.
- मुंबई महानगरपालिकेत (BMC) मनसेनं दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक १०.४३ टक्के मतं मिळवली आणि २२८ जागांपैकी सात जागा जिंकल्या.
- त्यावेळी मुंबई व नाशिक महापालिकेत एकसंध शिवसेनेनं सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तर पुण्यात एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आघाडीवर होती.
- विशेष बाब म्हणजे नाशिक व मुंबईत मनसेच्या मतांची टक्केवारी ही भाजपाला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त होती.
- २००६ ते २००९ दरम्यानच्या निवडणुकांचं विश्लेषण केल्यास मनसेनं जिंकलेल्या ४५ जागा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातील होत्या.
- त्याशिवाय ६३ जागांवर मनसेचे उमेदवार कमी मताधिक्यानं पराभूत झाले होते. त्यापैकी २५ जागा शिवसेनेनं, १३ काँग्रेसनं, १२ राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि सात जागा भाजपानं जिंकल्या.
- या आकडेवारीनुसार, त्यावेळी मनसे व शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवल्यास त्यांना सर्वाधिक फायदा झाला असता, तरीही त्यांना कोणत्याही महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळालं नसतं.
- या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या एकमेव पक्षाला नवी मुंबई व पिंपरी-चिंचवड या दोन महानपालिकांमध्ये स्वबळावर बहुमत मिळवण्यात यश मिळालं.

२००९ ते २०१४ मध्ये मनसेची कामगिरी
२००९ ते २०१४ या काळात मनसेनं २६ पैकी २४ महापालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि १६२ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकांमध्ये पक्षाच्या मतांची एकूण टक्केवारी १२.४३ टक्क्यांवर पोहोचली. नाशिकमध्ये ४० जागा आणि २८.२४ टक्के मतांसह मनसे सर्वांत मोठा पक्ष ठरला. जरी त्यांना पूर्ण बहुमत मिळालं नसलं तरी सभागृहाचं नेतृत्व करण्यासाठी बाह्य पाठिंबा मिळाला. नाशिकपाठोपाठ मनसेनं पुण्यात २९, मुंबईत २८, कल्याण-डोंबिवलीमध्ये २७, जळगावात १२ आणि ठाण्यात सात जागा जिंकल्या. मुंबई, पुणे व कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेनं मतांच्या टक्केवारीत मोठी आघाडी घेतली. कल्याण-डोंबिवलीमध्ये २८.७२% मतं मिळवून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मागे टाकलं. या निवडणुकीत मनसे व शिवसेना यांनी युती केली असती, तर कल्याण-डोंबिवलीमध्ये त्यांना पूर्ण बहुमत मिळालं असतं.
हेही वाचा : राहुल गांधींची वकिलानेच केली कोंडी; सावरकरांसंदर्भातील जुन्या खटल्यावरून अडचणीत येण्याची शक्यता
२०२४ ते २०१९ दरम्यानची मनसेची कामगिरी
२०२४ ते २०१९ दरम्यानच्या निवडणुकांमध्ये मनसेला मोठा धक्का बसला. २७ पैकी २१ महापालिकेच्या निवडणुका लढवणाऱ्या मनसेला फक्त २६ जागांवरच विजय मिळवता आला. त्यांची मतांची एकूण टक्केवारी ३.५६% पर्यंत घसरली. मनसेच्या जागांची संख्या फक्त एका महापालिकेत, तर मतांची टक्केवारी फक्त दोन ठिकाणी वाढली. या निवडणुकीत मनसेनं कल्याण-डोंबिवलीमध्ये नऊ, मुंबईत सात व नाशिकमध्ये पाच जागा जिंकल्या. या काळात मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना व भाजपामध्ये चुरशीची लढत होती; तर नाशिकमध्ये भाजपानं एकट्यानं स्पष्ट बहुमत मिळवलं.
कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या मतांची टक्केवारी १८.४१%, नाशिकमध्ये १८.२३%, पुण्यात १४.१६% व मुंबईत १२.९४ टक्यांनी घसरली. या आकडेवारीनं स्पष्ट होतं की, मनसेचा प्रभाव शहरी भागांमध्ये कमी झाला आहे. तरीही त्यांच्याकडे असलेल्या मर्यादित जागा आणि मतांची टक्केवारी शिवसेना ठाकरे गटासाठी फायदेशीर ठरू शकते. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांना मोठं यश मिळेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.