PM Modi Derogatory Remarks Controversy : लोकसभा व त्यापाठोपाठ काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपानं आता आपलं लक्ष्य बिहारकडे वळवलं आहे. यावर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधीच काँग्रेस व भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रा काढली आहे. या यात्रेतून ते भाजपासह निवडणूक आयोगावर टीका करताना दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी दरभंगा येथे काँग्रेसच्या मंचावरून एका स्थानिक नेत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी अपशब्द वापरल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी याच मुद्द्याला हाताशी धरून काँग्रेससह राहुल गांधींवर टीकेचा प्रहार केला.

आसामची राजधानी गुवाहाटी येथील एका जाहीर सभेतून अमित शाह यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी वापरलेल्या अवमानकारक भाषेची यादीच पुढे केली. उपस्थितांना संबोधित करताना शाह म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २७ देशांनी सर्वोच्च पुरस्काने सन्मानित केलं. जगभरातील अनेक देशांमधील नेते त्यांचा आदर करतात. मात्र, पंतप्रधानांविरुद्ध वापरलेल्या अपमानास्पद शब्दांची मालिका काँग्रेस नेत्यांच्या वर्तनातून वारंवार दिसून आली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी द्वेष आणि तिरस्काराचं राजकारण सुरू केलं आहे. सध्या बिहारमध्ये ‘घुसखोर बचाओ’ यात्रा सुरू आहे. या यात्रेतून पंतप्रधान मोदींच्या दिवंगत आईविषयी अपशब्द वापरण्यात आले आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं हे सर्वात घृणास्पद कृत्य आहे.”

अमित शाह यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

“काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशात नकारात्मकता आणि द्वेषाचे राजकारण सुरू केलं आहे. त्यांच्या या वृत्तीमुळे देश कधीही प्रगतीच्या मार्गावर जाणार नाही, अशी टीका अमित शाह यांनी केली आहे. “काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी अपमानास्पद शब्द वापरून सर्वात निंदनीय कृत्य केलं आहे. मी याचा तीव्र शब्दांत निषेध करतो”, असं शाह यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा : बिहारमधील ३ लाख मतदार मतदानाचा हक्क गमावणार? निवडणूक आयोगाने का पाठवली नोटीस?

“पंतप्रधान मोदींविषयी अपमानास्पद भाषा वापरण्याची काँग्रेसच्या नेत्यांची ही काही पहिलीच वेळ नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी, मणी शंकर अय्यर, दिग्विजय सिंह, जयराम रमेश, रेणुका चौधरी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत. अशा भाषेमुळे काँग्रेसला निवडणुका कशा जिंकता येतील?” असा प्रश्नही शाह यांनी उपस्थित केला आहे.

मोदींना जितक्या शिव्या द्याल, तितकं कमळ फुलेल : शाह

“काहीजण मोदींना मृत्यूचा व्यापारी म्हणतात, काही विषारी साप म्हणतात, काही त्यांना नीच म्हणतात, काहीजण त्यांना रावण म्हणतात, काहीजण मोदींना भस्मासुर म्हणतात, काही विषाणूही म्हणतात. काँग्रेस नेत्यांना काय वाटते? अशा प्रकारची भाषा वापरून तुम्हाला जनादेश मिळेल? आज मी काँग्रेस नेत्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही मोदींना जितक्या जास्त शिव्या द्यालः तितकेच कमळ अधिक फुलेल”, असेही शाह म्हणाले.

amit shah and narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (छायाचित्र पीटीआय)

बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेसचा निषेध

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातोश्रींबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वापरलेल्या भाषेचा तीव्र निषेध केला. “व्होटर अधिकार यात्रेदरम्यान काँग्रेस आणि आरजेडीच्या व्यासपीठावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या स्वर्गीय मातोश्रींविरुद्ध वापरलेली भाषा अवमानास्पद आहे. मी याचा निषेध करतो,” अशी पोस्ट नितीश कुमार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर केली आहे. पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या राजकीय पक्षांना आगामी निवडणुकीत जनता नक्कीच धडा शिकवणार, असा संताप राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात; भाजपा सावधगिरी का बाळगतंय?

पंतप्रधानांना शिवीगाळ करणारी व्यक्ती भाजपाची एजंट : काँग्रेसचा दावा

“पंतप्रधानांविरोधात शिवीगाळ करणारी व्यक्ती भाजपाची एजंट होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रा काढली आहे. त्यांच्या यात्रेला संपूर्ण राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेवरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपानं जाणून बुजून हा मुद्दा तयार केला, असा आरोप काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी केला आहे. “पंतप्रधान मोदी व त्यांच्या आईविषयी शिवराळ भाषा त्यांच्याच (भाजपाच्या) एजंटने वापरली आहे. मात्र, चोरी पकडली गेल्याने हे लोक निराश झाले आहेत. पोलिसांनी अटक केलेला व्यक्ती कोण आहे? तो कोणत्या पक्षाचे काम करतो? याचा शोध घ्यायला हवा. बिहारमधील जनता आणि संपूर्ण देश भाजपाची गुंडगिरी पाहत आहे, असं खेरा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनीही पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. “काँग्रेसमधील कोणताही नेता, कार्यकर्ता व पदाधिकारी पंतप्रधान किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल अपशब्द वापरणार नाही, कारण आमच्या पक्षाची ही संस्कृती नाही, ज्याने मोदी व त्यांच्या आईविषयी शिवराळ भाषा वापरली, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. एकंदरीत राहुल गांधी यांची व्होटर अधिकार यात्रा व भाजपा नेत्यांनी केलेले आरोप यावरून बिहारचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.