नुकतेच उत्तर प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात विविध राजकीय खेळींमुळे राजकारण रंगते. मात्र यंदाच्या उत्तर प्रदेश अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकारणासोबतच विधानसभेचे सभागृहसुद्धा रंगलेले पहायला मिळत आहे. यूपीच्या राजकारणात एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे. आणि राजकारणातील या नव्या ट्रेंडचे पडसाद विधानसभेत उमटले आहेत.

काय आहे युपी विधानसभेतील नवा ट्रेंड ?

उत्तर प्रदेश विधानसभेच्या सभागृहात समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी लाल टोप्या घालणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, आता उत्तर प्रदेश विधानसभेत समाजवादी पक्षाच्या लाल रंगांच्या टोप्यांना आता नवीन साथीदार मिळाला आहे. आता भाजपाच्या आमदारांनी सभागृहात भगव्या टोप्या परिधान करायला सुरुवात केली आहे. जेष्ठ मंत्र्यांपासून ते नवनिर्वाचित भाजपा आमदारांपर्यंत, बहुतेक सर्वांनी कमळाचे चिन्ह असलेल्या टोप्या घातल्या होत्या. 

“आमच्या टोप्यांवर आमच्या पक्षाचे चिन्ह आहे. अशी टोपी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा घातली होती. विधानसभेत कुठलाही ड्रेसकोड नाही, त्यामुळेच आम्ही या टोप्या घालण्याचा निर्णय घेतला”, अशी माहिती भाजपाचे विधानपरिषद सदस्य विजय बहादूर पाठक यांनी इंडियन एक्सप्रेसला दिली.

कोणाच्या डोक्यावर कुठली टोपी?

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत टोप्या आणि त्यांचा रंग हा यूपीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला होता. ज्यामध्ये विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाच्या रंगाच्या टोप्या घातल्या होत्या. लाल टोप्या असलेले समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते, निळ्या टोप्या आणि स्ट्रोल्स घातलेले बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते, पिवळे फेटे म्हणजे ओमप्रकाश राजभर यांच्या एसबीएसपीचे कार्यकर्ते आणि भाजपाचे म्हणजे भगव्या टोप्या आणि स्ट्रोल्स घेतलेले कार्यकर्ते अशी ओळख निर्माण झाली आहे. 

विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनी, यूपीमध्ये भाजपाच्या प्रचाराच्या वेळी समाजवादी पक्षाला लक्ष्य करण्यासाठी त्यांच्या लाल टोपीचा उल्लेख केला होता. “रेड कॅप्स रेड अलर्ट” या टीकेला उत्तर देताना अखिलेश यादव यांनी आरएसएसचे नेते घालत असलेल्या काळया टोप्यांचा उल्लेख केला होता. 

अलीकडे लाल टोप्या समाजवादी पक्षाच्या प्रतीक बनल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव यांनी पक्षाची सूत्रे हातात घेतल्यानंतर ते पक्ष कार्यकर्त्यांना लाल टोप्या घालण्यास प्रोत्साहन देत आहेत. अनेक सभांमध्ये अखिलेश यादव स्वतः लाल टोपी घालतात. त्यामुळे आता पक्षाच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली आहे.

युपी विधानसभेत राजकीय रंगांचेच वर्चस्व

उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपाचे संख्याबळ सर्वात जास्त असल्यामुळे सभागृहात भगवी लाट आलेली दिसत होती, तर विरोधी बाकांवर समाजवादी पक्षाच्या लाल टोप्या वर्चस्व गाजवत होत्या. यासोबतच बसपाचे निळे स्ट्रोल्स आणि टोप्या, पिवळ्या आणि हिरव्या टोप्या ठळकपणे दिसून येत होत्या. या सर्व रंगांच्या भाऊगर्दीत काँग्रेसची पांढरी टोपी फार क्वचितच दिसून येत होती.