Rahul Gandhi Allegations on Vote Theft : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (१८ सप्टेंबर) नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे जाहीर पत्रकार परिषद घेतली. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेतून केला. काँग्रेस पक्षाची ताकद असलेल्या मतदारसंघातून अनेक मतदारांची नावे काढून टाकण्यात आली असा दावाही त्यांनी केला. त्या संदर्भातील काही पुरावेदेखील राहुल यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. आपल्याला निवडणूक आयोगातूनच मदत मिळत असून आता आम्ही थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, राहुल गांधी यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांना निवडणूक आयोगातून नेमकं कोण मदत करतंय त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

मागील काही दिवसांपासून राहुल गांधी हे मतचोरीच्या आरोपावरून सातत्याने निवडणूक आयोगासह भाजपाला लक्ष्य करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्नाटकमधील महादेवपुरा या विधानसभा मतदारसंघात मतांमध्ये कशी फेरफार झाली याचे पुरावे सादर केले होते. इतकंच नाही तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक फिक्स होती असा आरोपदेखील राहुल यांनी केला होता. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात जेवढे मतदार वाढले नाही, तेवढे पाच महिन्यात वाढले. काही भागांमध्ये मतदारांची संख्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षाही जास्त होती, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांसह निवडणूक आयोगाने त्यांच्या या आरोपांचे खंडन केले होते. त्यावेळीही राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांची संपूर्ण देशभरात चर्चा झाली होती.

rahul gandhi vote chori
काँग्रेसचे नेते राहुल गांधी (छायाचित्र सोशल मीडिया)

काँग्रेसची मते डिलिट केल्याचा राहुल यांचा दावा

आज राहुल यांनी राजधानीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मतचोरीचा मुद्दा पुन्हा मांडला असून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य केले आहे. “ज्या मतदारसंघात काँग्रेस सशक्त आहे, त्या मतदारसंघात मतदारांची नावे डिलीट करण्यात आली आहेत. सत्ताधारी पक्ष ज्या मतदारसंघात कमकुवत आहे, तिथे इतर मतदारांची नावे टाकण्यात आलेली आहे. मतदार नोंदणीवेळी चुकीचे फोन नंबर देण्यात आले आणि ते ओटीपी दुसऱ्या क्रमांकावर गेले. सॉफ्टवेअर मार्फत बुथ मतदारयादीतील पहिल्या मतदाराच्या नावाने अर्ज करत इतर मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहे. हे कार्यकर्त्यांच्या स्तरावर झालेले काम नसून कॉल सेंटरच्या स्तरावरून झाले आहे”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले, कर्नाटकमधील आलंद विधानसभा मतदारसंघात सहा हजार १८ मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमच्या एका बुथस्तरावरील कार्यकर्तीच्या नातेवाईकाचे नाव मतदार यादीतून डिलिट झाले, तेव्हा तिने या सर्व प्रकाराची तपासणी केली. त्यावेळी तिच्या असे लक्षात आले की, हे काम तिच्या शेजाऱ्यानेच केले आहे. तिने याबाबत जाब विचारला असता त्याने मी नाव डिलिटच केले नाही आणि मला याबाबत काहीच माहिती नाही असे उत्तर दिले. एका वेगळ्याच शक्तीने ही प्रक्रिया हायजॅक केली आणि मतदाराचे नाव डिलिट केले.”

rahul gandhi news
राहुल गांधी मतदार यादी दाखवताना (छायाचित्र सोशल मीडिया)

राहुल गांधींचे मुख्य निवडणूक आयुक्तांवर आरोप

पत्रकार परिषदेत राहुल म्हणाले, “मतदारयादीतील नावे डिलिट करण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला. त्यासाठी कर्नाटकच्या बाहेरील वेगवेगळ्या राज्यातील मोबाईल क्रमांक वापरण्यात आले, ज्याअंतर्गत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत मतदारांना लक्ष करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार ‘मतचोरांचे’ रक्षण करीत आहेत. कर्नाटकमध्ये सीआयडीने एफआयआर दाखल केली आणि १८ महिन्यात १८ पत्र निवडणूक आयोगाला पाठवत याबाबत माहिती मागितली. मात्र, तरीही निवडणूक आयोगाने त्यांना या संदर्भातील माहिती दिली नाही. मतदारयादीतून मतदारांची नावं कोण डिलिट करतंय हे निवडणूक आयोगाला माहिती आहे. मात्र, ते लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रातील राजुरा येथे सहा हजार ८५० फेक मतदारांची नावे ऑनलाईन यादीत घेतली गेली. महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश अशा सगळ्या ठिकाणी हेच झाले. त्या संदर्भातील सर्व पुरावे आमच्याकडे आहेत.”

राहुल गांधी यांना निवडणूक आयोगातूनच मदत?

मतचोरी आणि मतदारांच्या गैरव्यवहाराबाबत आम्हाला निवडणूक आयोगातूनच मदत मिळत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. “सध्या प्रत्येक राज्यात मतांची चोरी होत असून, आम्हाला निवडणूक आयोगातून माहिती मिळू लागली आहे. गेल्या १० वर्षांपासून हा सर्व प्रकार सुरू आहे. काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघातून मतदारांची नावे अगदी पद्धतशीरपणे वगळण्यात आली आहे. दलित आणि अल्पसंख्याक समुदायाला प्रामुख्याने लक्ष्य केले जात आहे”, असा आरोप राहुल यांनी केला.

election commission of india
केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त (छायाचित्र सोशल मीडिया)

राहुल यांना माहिती देऊन भाजपाला कोण आणतंय अडचणीत?

राहुल गांधी यांना कथित मतचोरीची माहिती देऊन भाजपाला नेमके कोण अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामागचे कारण म्हणजे आपल्याला निवडणूक आयोगातूनच मदत मिळत असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, राहुल यांनी मतचोरीचा विषय अतिशय गंभीरतेने हाताळण्यास सुरुवात केलेली आहे. काँग्रेसची इगल समिती या कामात त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करीत आहे. राहुल गांधी यांना खरंच निवडणूक आयोगातून मदत मिळतेय का असा प्रश्न या नेत्याला विचारला असता, काँग्रेसच्या नेत्याने त्यावर बोलण्यास नकार दिला. राहुल यांचे बरेच शुभचिंतक आहेत. केंद्रात सुरू असलेली हुकूमशाही काहींना मान्य नसल्यामुळेच त्यांना काहीजण मदत करीत असल्याचे या नेत्याने सांगितले.

राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने काय म्हटलं?

राहुल गांधी यांचे मतचोरीचे आणि मतदारांचे नावे डिलिट केल्याचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत. “राहुल यांनी केलेले हे आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. कोणत्याही मतदाराचे नाव ऑनलाइन वगळता येत नाही, तसेच अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणालाही कोणत्याही मतदाराचे नाव वगळता येत नाही. संबंधित मतदाराला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतेही नाव वगळता येत नाही,” असे आयोगाने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. दरम्यान, कर्नाटकच्या आळंद विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगानेच एफआयआर दाखल केल्याचे आयोगाने म्हटले आहे.

राहुल गांधींचे सर्व बॉम्ब निकामी केले जातील : रविशंकर प्रसाद

आपल्याला निवडणूक आयोगातूनच माहिती मिळत असल्याचा राहुल यांचा दावा भाजपाच्या नेत्यांनी फेटाळून लावला आहे. निवडणूक आयोग एक स्वतंत्र आणि पारदर्शकतेने काम करणारी संस्था आहे, त्यामुळे त्यांच्या कामात कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. राहुल हे अपप्रचार करून आयोगाची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे एका भाजपाच्या नेत्याने सांगितले. दरम्यान, भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांनीही राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. “राहुल गांधींना संविधान समजतं का? ते सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने सूचना दिल्या. त्यांनी काही ठोस कारवाई केली का? त्यांना कायदा किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना समजत नाहीत. ते फक्त ‘संविधान, संविधान’ असे ओरडत असतात,” अशी टीका रविशंकर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केली. राहुल गांधींना मते मिळत नाहीत तर आपण काय करू शकतो? ते विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांच्याकडे काही मूल्ये असली पाहिजेत. ते देशातील मतदारांचा अपमान करत आहेत. जनता त्यांना पुन्हा एकदा योग्य उत्तर देईल. त्यांचे सर्व बॉम्ब निकामी केले जातील. मी त्यांचा निषेध करतो”, असेही रविशंकर म्हणाले.