BJP MP Nishikant Dubey Offensive Statement : राज्यात हिंदी विरुद्ध मराठी असा भाषिक वाद निर्माण झाला असताना भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी त्या वादात आणखीच तेल ओतण्याचं काम केलं. मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्या मीरा भाईंदरमधील एका परप्रांतीय व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना निशिकांत दुबे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. इतक्यावरच न थांबता त्यांनी मराठी माणसाला उद्देशून वादग्रस्त विधानही केलं. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला असून राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कोण आहेत निशिकांत दुबे? त्यांच्यावर यापूर्वी काय आरोप झालेले आहेत? त्या संदर्भात घेतलेला हा आढावा…
मीरा भाईंदरमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. “हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रादेखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा”, अशी पोस्ट दुबे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केली. इतकंच नाही तर “मराठी लोकांनी महाराष्ट्राच्या बाहेर यावं, त्यांना आपटून आपटून मारू,” अशा पद्धतीची भाषा दुबे यांनी वापरली.
“तुम्ही काय म्हणता की मराठी बोलावं लागेल? तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? येथे टाटा, बिर्ला, रिलायन्स आहेत. मात्र, महाराष्ट्रात कोणतंही युनिट नाही. टाटांनी तर पहिला कारखाना बिहारमध्ये बांधला. तुम्ही फक्त आमच्या पैशांवर जगत आहात. तुम्ही कोणता कर भरता? आणि तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत, आमच्याकडे खाणी आहेत,” असं वक्तव्य त्यांनी मराठी माणसाला उद्देशून केलं. भाजपा खासदाराच्या या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी संताप व्यक्त केला. विरोधकांनी त्यांच्या विधानावरून आक्रमक पवित्रा घेत सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केलं.
आणखी वाचा : भाजपासाठी धोक्याची घंटा? मंत्र्यानेच दिला पराभवाचा गंभीर इशारा; कारण काय?
कोण आहेत निशिकांत दुबे?
- निशिकांत दुबे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यार्थी शाखेतून केलेली.
- २००९ मध्ये भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी झारखंडच्या गोंडा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली.
- पहिल्याच निवडणुकीत दुबे यांनी काँग्रेसचे उमेदवार फुरकान अन्सारी यांचा जवळपास सहा हजार मताधिक्यांनी पराभव केला.
- २००९ ते २०२४ या कालावधीत गौंडा लोकसभा मतदारसंघातून दुबे हे सलग तीनवेळा निवडून आलेले आहेत.
- २०२४ मध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दुबे यांच्याकडे तब्बल ७४ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
- दुबे यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केलेली असून त्यांच्यावर दंगली भडकविण्याच्या आरोपाखाली सात ते आठ गुन्हे दाखल आहेत.
- एप्रिल २०२५ मध्ये निशिकांत दुबे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.
- देशात धार्मिक युद्ध भडकवण्यास सर्वोच्च न्यायालय जबाबदार असून ते आपली मर्यादा ओलांडत आहेत, असं दुबे म्हणाले होते.
- प्रत्येक गोष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयातच जावं लागत असेल, तर लोकसभा व विधानसभा बंद करून टाकावी, अशी टिप्पणीही त्यांनी केली होती.
- देशात सुरू असलेल्या सर्व गृहयुद्धांना केवळ भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे जबाबदार आहेत, अशी भाषाही दुबे यांनी वापरली होती.
- निशिकांत दुबे यांच्या सर्वोच्च न्यायालयावरील टिप्पणीवरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि भाजपाने स्वत:ला या वादापासून दूर ठेवलं होतं.

देवेंद्र फडणवीसांनी दिली दुबेंना समज
दरम्यान, खासदार निशिकांत दुबे यांच्या विधानानंतर राज्यातील विरोधीपक्षांनी भाजपावर टीकेची झोड उठवली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलं. निशिकांत दुबे यांचं वक्तव्य हे मराठी माणसांसाठी नाही तर एका संघटनेच्या संदर्भात होतं, अशी सारवासारव मुख्यमंत्र्यांनी केली. खासदार दुबे यांचं वक्तव्य जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते फक्त एका विशिष्ट संघटनेविरोधात बोलले आहेत. त्यांनी मराठी माणसांबाबत सरसकट असं वक्तव्य केलेलं नाही. मात्र, तरीही माझं मत असं आहे की अशा प्रकारचं बोलणं योग्य नाही, कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. मी पुन्हा एकदा सांगतो की, मराठी माणसांचं योगदान महाराष्ट्रात प्रचंड मोठं आहे”, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
ठाकरे गटाकडून निशिकांत दुबेचा समाचार
मराठीत माणसांना आव्हान देणाऱ्या निशिकांत दुबेंचा शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातून चांगलाच समाचार घेण्यात आला. ‘कोण हा टिनपाट डुबे?’ या मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखातून सामनाचे संपादक संजय राऊत यांनी अक्षरक्ष: दुबे यांची लायकी काढली. “निशिकांत दुबेंनी केलेली महाराष्ट्राला आपटण्याची भाषा ही नरेंद्र मोदी, अमित शाहांचीच आहे. महाराष्ट्राविरुद्ध गरळ ओकण्यासाठी मोदी-शहांनी या ‘डुबे’चे थोबाड निवडलं आहे. त्यांचं तोंड गटार असून या गटारातून यापूर्वी सर्वोच्च न्यायालय, पहलगामचे निरपराध बळी यांच्याबाबत सतत मैलाच बाहेर पडतो”, असा घणाघात ठाकरे गटाकडून करण्यात आला.