BJP national president election केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे, ज्यामुळे लवकरच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी संध्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दोन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर त्यांनी मोहन भागवत यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक सुमारे ४५ मिनिटे चालली. ही बैठक दिल्लीतील झंडेवालान येथील संघाचे मुख्यालय ‘केशव कुंज’ येथे झाली, असेही सूत्रांनी सांगितले. मात्र, या भेटीनंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शिवराज सिंह चौहान यांच्या नावाची चर्चा का होत आहे? त्याविषयी जाणून घेऊयात….

बंद दाराआड बैठक

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर लगेचच भाजपाचे नवीन अध्यक्ष निवडले जातील, अशीही चर्चा आहे. अशातच आता शिवराज सिंह चौहान यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. चौहान हे भारत मंडपम येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात होते. त्या कार्यक्रमात त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी गजेंद्र शेखावतदेखील उपस्थित होते. कार्यक्रमानंतर लगेचच ते संघ कार्यालयात गेले. मोहन भागवत यांच्याबरोबर त्यांची बंद दाराआड बैठक झाली. त्यानंतर ते मध्य प्रदेशला रवाना झाले. भागवत यांच्याशी झालेल्या भेटीपासून, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शिवराज सिंह चौहान यांचे नाव पुन्हा एकदा आघाडीवर आले आहे.

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर लगेचच भाजपाचे नवीन अध्यक्ष निवडले जातील, अशीही चर्चा आहे. अशातच आता शिवराज सिंह चौहान यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. (छायाचित्र-पीटीआय)

ते भारतातील सर्वांत जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी १६ वर्षांपेक्षा अधिक काळ मध्य प्रदेशचे शासन सांभाळले आहे. त्यांच्या कार्यकाळामुळे भाजपाला हिंदी पट्ट्यात एक स्थिर आधार मिळाला, ज्याची तुलना गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या कार्याशी केली जाऊ शकते. ते एक ओबीसी नेते आहेत; मात्र तसे असले तरी त्यांच्याकडे विविध जातींमध्ये आपुलकी निर्माण करण्याची क्षमता आहे आणि त्यामुळेच काँग्रेसला काही विशिष्ट समुदायांमध्ये मिळणारा पाठिंबा कमी झाला आहे. उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार आहे आणि त्यानंतर लवकरच भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

शिवराज सिंह चौहानच का?

शिवराज सिंह चौहान हे तीन दशकांहून अधिक काळ भाजपाच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी मध्य प्रदेशमध्ये पक्षाचे भविष्य घडवले आणि राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे स्थान बळकट करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आरएसएसचे सदस्य म्हणून आणि नंतर भारतीय जनता युवा मोर्चातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी खऱ्या अर्थाने राजकारणाला सुरुवात केली आणि त्यात वेगाने प्रगतीही केली. २००५ मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यानंतर राज्यात भाजपाच्या राजवटीत परिवर्तन पाहायला मिळाले.

आपल्या १६ वर्षांच्या कार्यकाळात चौहान यांनी विशेषतः ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले. मुलींच्या कल्याणासाठी असणाऱ्या त्यांच्या ‘लाडली लक्ष्मी’ योजनेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. त्यांची आणखी एक यशस्वी योजना म्हणजे ‘भावांतर भुगतान’ योजना. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे हा होता. त्यांच्या नेतृत्वाखालील पायाभूत सुविधांचा विकास, वीज सुधारणा व सुधारित रस्ते जोडणी या उपक्रमांना महत्त्वाचे स्थान दिले जाते.

राजकीयदृष्ट्या चौहान यांच्याकडे विविध जाती आणि समुदायांशी जोडले जाण्याची क्षमता असल्यामुळे भाजपाला हिंदी पट्ट्यात आपली पकड टिकवून ठेवता आली. त्यांनी सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या. त्यांच्याकडे असलेला तळागाळातील लोकांचा पाठिंबा, प्रशासकीय कौशल्ये आणि संघटनात्मक क्षमता आदींमुळे ते पक्षासाठी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहेत.

इतर संभाव्य उमेदवार कोण?

भाजपाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. परंतु, सुरुवातीला अशी चर्चा होती की, दक्षिणेकडील नेते भाजपाचे पुढील अध्यक्ष होऊ शकतात. केंद्रीय कोळसा व खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांचेही नाव चर्चेत होते. ते आंध्र प्रदेश भाजपाचे अध्यक्षही होते.

दक्षिण भारतातून चर्चेत असलेले आणखी एक नाव आंध्र प्रदेशचेच आहे. ते म्हणजे डी. पुरंदरेश्वरी. त्या सध्या एनडीए शासित राज्यातील भाजपाच्या प्रमुख आहेत. मात्र, त्या टीडीपी प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नातेवाईक आहेत ही बाब त्यांच्या विरोधात जाऊ शकते. भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व कोईम्बतूरच्या आमदार वानती श्रीनिवासन यांचेही नाव चर्चेत आहे. तसेच गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे व भूपेंद्र यादव यांची नावेदेखील सातत्याने चर्चेत आली आहेत.