लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ईशान्येकडील मिझोराम राज्यात सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट पुन्हा सत्ता कायम राखणार की राज्यात सत्ताबदल होणार याची उत्सुकता आहे. मिझो शांतता करार झाल्यापासून राज्यात काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंट या दोन पक्षांमध्ये लढत होते. या दोन्ही पक्षांना लागोपाठ दोनदा सत्ता मिळालेली असल्याने यंदा मिझो नॅशनल फ्रंट बाजी मारेल, असा अंदाज वर्तविला जातो.

यंदा झोरम पीपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) या स्थानिक पक्षाचे आव्हान आहे. काँग्रेस पक्ष कमकुवत झाल्याने स्थानिक पक्षाने ही पोकळी भरून काढली आहे. झोरम पीपल्स या पक्षाने सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटसमोर आव्हान उभे केले आहे. ख्रिश्चन बहुल मिझोराममध्ये शेजारील मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराचे पडसाद उमटले आहेत. मतैईंच्या आक्रमक भूमिकेमुळे विस्थापित झालेल्या कुकींनी डोंगराळ भागातून पळ काढत मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे. मिझो नॅशनल फ्रंट सरकारने या निर्वासितांना आश्रय दिला.

हेही वाचा – काँग्रेसला पुन्हा संधी की, परंपरेचे पालन?

मिझोरामच्या निवडणुकीत चर्चची भूमिका महत्त्वाची ठरते. पारंपारिकदृष्ट्या काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंटमध्ये लढत होत असली तरी यंदा झोरम पीपल्स मुव्हमेंट या पक्षामुळे तिरंगी लढत अपेक्षित आहे. काँग्रेसने दोन स्थानिक पक्षांबरोबर आघाडी केली आहे. भाजपला ख्रिश्चन बहुल राज्यात कितपत यश मिळते याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेजारील मणिपूरमधील हिंसाचाराने भाजपला फटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केली जाते.

मिझोराम विधानसभेच्या ४० जागांपैकी सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट, काँग्रेस आणि झोरम पीपल्स या तीन पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने अद्याप नावे जाहीर केलेली नाहीत. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटने विधानसभा अध्यक्ष आणि गृहमंत्र्यांनाच उमेदवारी नाकारली आहे.

हेही वाचा – मध्य प्रदेशात दोन दशकांचे वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपची धडपड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१८ मधील पक्षीय बलाबल :

एकूण जागा : ४०
मिझो नॅशनल फंट – २७
काँग्रेस – ४
भाजप – १
अपक्ष – ८