राजस्थानसह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. राजस्थानमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा गाठला असून ११५ जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये सत्तापालट होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्या वसुंधरा राजे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
७० वर्षीय वसुंधरा राजे या दोन वेळा राजस्थानच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी दौसातील मेहंदीपूर बालाजी मंदिर आणि जयपूरमधील मोती डूंगरी मंदिरासह अनेक मंदिरांना भेट दिली. विशेष म्हणजे, भाजपाने राजस्थान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकाही नेत्याचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून प्रचार केला नाही. शिवाय प्रमुख चेहरा म्हणून वसुंधरा राजे यांनाही पुढे केलं नाही.
गेल्या काही वर्षांपासून राजस्थान भाजपामध्ये वसुंधरा राजे यांचं वर्चस्व आहे. पक्षातील त्यांचे अनेक प्रतिस्पर्धी राज्यात पक्षाचा चेहरा म्हणून उदयास येऊ पाहत आहेत. त्या सध्या भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी राजस्थानात भाजपला मोठा विजय मिळवून दिला होता. २०१३ मध्येही त्यांनी विजयाची पुनरावृत्ती केली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने २०० पैकी १६३ जागा जिंकल्या होत्या, हा विक्रम आजही कायम आहे.
अलीकडच्या काळात वसुंधरा राजे राजकारणात जास्त सक्रिय झाल्या आहेत. धार्मिक यात्रांसाठी त्या राज्यभर फिरल्या. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जोरदार पाठिंबा दिला. त्यामुळे त्या तिसऱ्यांचा राजस्थानची सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे. पण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांचं त्यांच्यासमोर आव्हान आहे.
यापूर्वी वसुंधरा राजे आपल्या प्रचारात हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर राहायच्या आणि विकासाच्या अजेंड्याला चिकटून राहायच्या. त्यामुळेच वसुंधरा राजे आणि केंद्रातील प्रमुख नेत्यांमध्ये काही प्रमाणात अंतर निर्माण झाल्याचं चित्र आहे. असं असलं तरी अलीकडच्या काळात राजे यांनी पक्षाच्या विचाराशी सुसंगत आणि गेहलोत सरकारला लक्ष्य करण्यासाठी उघडपणे हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारली आहे. त्यांनी काँग्रेस सरकारवर “तुष्टीकरणाचे राजकारण” केल्याचा आरोप करायला सुरुवात केली.
सध्याच्या निवडणुकीत भाजपाने अनेक खासदारांना रिंगणात उतरवलं होतं. यावेळी भाजपाने वसुंधरा राजे यांच्या गटातील काही नेत्यांनाही तिकीट दिले. तर तिकीट न मिळाल्यामुळे राजे यांच्या काही समर्थकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. येथे कोणत्याही एका पक्षाला सत्ता मिळाली नसती तर, अपक्ष निवडणूक लढवलेल्या आपल्या समर्थकांच्या जोरावर वसुंधरा राजे मुख्यमंत्रिपदावर दावा सांगू शकल्या असत्या. पण आता तशी परिस्थिती नाही. कारण इथे भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.