scorecardresearch

शेखर माने : सामाजिक भान असलेला कार्यकर्ता

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की ज्यांना कसलीही पार्श्वभूमी नाही. या अशा काही तरूण, आश्वासक पहिल्या पिढीच्या सर्व पक्षीय राजकारण्यांचा परिचय करून देणारी ही विशेष मालिका.

शेखर माने : सामाजिक भान असलेला कार्यकर्ता
शेखर माने : सामाजिक भान असलेला कार्यकर्ता (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दिगंबर शिंदे

सांगली : सांगली शहरालगत असलेल्या कर्नाळमध्ये केवळ ३३ गुंठे जमीन. सिंचन सुविधा नसल्याने घरात हातातोंडाची गाठ पडण्यासाठी वडिलांची रोज एकाचा बांधाला पायपीट ठरलेली. अशा स्थितीत निदान दोन वेळच्या जेवणाची तरी भ्रांत मिटेल या आशेने सांगली जवळ केली. अशा घरातून आलेला एक युवक आज नेतृत्वाबरोबर युवकांमध्ये वाढती व्यसनाधिनता रोखण्यासाठी आणि हाताला काम देण्यासाठी झटत आहे. काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव म्हणून कार्यरत असलेले युवा नेतृत्व म्हणजे शेखर विश्वासराव माने.

घरची परिस्थिती यथातथाच असतानाही संगणक शाखेतील पदविका घेऊन सांगलीत आज बांधकाम व्यवसायामध्ये चांगला जम बसविला आहे. मात्र, आपण ज्या समाजातून आलो, त्या समाजाचे काही तरी देणं लागतो म्हणून समाजाचा विचारही प्राधान्याने करण्याचे बाळकडू शालेय वयातच मिळाले. यातून वसंतदादा घराण्याच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा घेऊन धडाडीने राजकारण, समाजकारण करणाऱ्या स्व. मदन पाटील यांच्या संपर्कात आले.

हेही वाचा: राहुल पंडित : रत्नागिरीच्या राजकारणातला सुशिक्षित, सुसंस्कृत चेहरा

यातून महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करण्याची दोन वेळा संधीही मिळाली. कामगार वर्गाला विसावा मिळावा यासाठी शहरात बांधकाम कामगारांसाठी निवारा केंद्र उभारण्यात पुढाकार तर घेतलाच, पण याचबरोबर शहराचे सौंदर्य वाढावे, नागरिकांना नैसर्गिक विरंगुळा मिळावा यासाठी काळी खण विकासासाठी आग्रहही धरला. आज या योजना मूर्त स्वरूपात येण्याच्या अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत.गेल्या दोन वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात सक्रिय आहेत. सध्या प्रदेश संघटक व सचिव या पदावर पक्षात कार्यरत असताना सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात पक्ष निरीक्षक म्हणून पक्षाने जबाबदारी सोपवली आहे.

हेही वाचा: रुपेश राऊळ : राडा संस्कृतीतील लढवय्या

भ्रष्टाचारमुक्त प्रशासन यासाठीचा त्यांचा आग्रह महापालिका सदस्य असताना वेळोवेळी दिसून आला आहे. याच बरोबर युवकांमध्ये वाढती व्यसनाधिनता रोखण्यासाठी चळवळही युवा मंचच्या माध्यमातून चालविण्यात येते. पर्यावरण संरक्षणासाठीही संघटित प्रयत्न केले जात आहेत. केवळ युवकच नाही तर महिलाही सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी महापालिकेच्या माध्यमातून गृह उद्योगाला चालना देत असतानाच उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचेही प्रयत्न केले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 09:31 IST

संबंधित बातम्या