‘गर्दीतील कोणत्याही व्यक्तीला अतिरेकी क्रौर्याकडे किंवा उदात्त नायकत्वाकडे नेण्याची ताकद असते कुशल वक्त्यामध्ये.’ हिटलरमध्ये ती होती. आपले वक्तृत्व आणि ‘पार्टेटॅग’सारखे इव्हेन्ट यांच्या बळावर त्याने सामान्य जर्मन नागरिकांना भुलवले आणि मग त्यांच्यावर राज्य केले..

जमाव. माणसांचा जमाव. आबालवृद्धांचा, स्त्री-पुरुषांचा. शहाण्यांचा, अडाण्यांचा. अर्धवट शिकलेल्यांचा, शिकलेल्या अर्धवटांचा. विद्वानांचा, अतिशहाण्यांचा जमाव. माणसे एकत्र येतात आणि गर्दी जमत जाते. पण माणूस कुठेही असला, म्हणून काय झाले? त्याचे व्यक्तिमत्त्व तेच राहणार. आपल्याजवळ पाहा. आपण एखाद्या गर्दीचा भाग असलो, एखाद्या सभेचे श्रोते असलो, म्हणून का आपण बदलतो? आपला चेहरा हरवतो का? आपले विचार बदलतात का? आपण आपले स्वतंत्र सार्वभौमच असतो ना?.. पण मग ही संघटित गर्दी प्रोपगंडापंडितांना एवढी का मोहवते? डॉ. जोसेफ गोबेल्स हा प्रोपगंडाचा विश्वगुरूच. त्याच्या मते प्रोपगंडातील सर्वात महत्त्वाची बाब कोणती असेल, तर ती म्हणजे जनसभा – ‘पार्टेटॅग’. त्याही साध्या सभा नव्हेत. ‘गोबेल्स’ या आपल्या पुस्तकात पीटर लाँगेरिच यांनी त्यांचे वर्णन ‘भव्य इव्हेन्ट’ अशा शब्दांत केले आहे. असे इव्हेन्ट आयोजित करून लोकांची गर्दी जमविणे हे गोबेल्सला का आवश्यक वाटत असे? लोकांनी एकत्र यावे हे प्रोपगंडाकारांसाठी एवढे गरजेचे का असते?

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
What Kangana Said?
“आपल्या देशात पॉर्नस्टारला जितका आदर..”, सनी लिओनीचं नाव घेत कंगनाने केलं ‘त्या’ वक्तव्याचं समर्थन

याचे उत्तर आपल्याला सापडते फ्रेंच समाज-मानसशास्त्रज्ञ गुस्ताव ले बॉन यांच्या ‘द क्राऊड – ए स्टडी ऑफ पॉप्युलर माइंड’ या पुस्तकात. गर्दीचे मानसशास्त्र सांगणारे हे पुस्तक आले होते १८९५ मध्ये. समाजमनाच्या, गर्दीच्या अभ्यासात आजही हा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो. मोठा प्रभाव होता त्याचा प्रोपगंडाच्या अभ्यासकांवर. गोबेल्सच्या प्रोपगंडा मंत्रालयात त्याचा एक सहकारी होता रुडॉल्फ सेम्लेर या नावाचा. तो सांगतो, गोबेल्सवर ले बॉन यांचा चांगलाच प्रभाव होता. या ले बॉन यांनी, संघटित गर्दीत आपण आपले व्यक्तिमत्त्व अबाधित राखू शकतो हा भ्रमाचाच भोपळा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, एकदा माणूस झुंडीचा, संघटित गर्दीचा भाग बनला की त्याला चेहरा प्राप्त  होतो तो त्या गर्दीचाच. एकटा असताना तो सुसंस्कृत व्यक्ती असू शकतो. पण झुंडीचा भाग बनला की तो संस्कृतीच्या शिडीच्या अनेक पायऱ्या खाली उतरतो. रानटी बनतो. गर्दीतील अशा व्यक्तीला ले बॉन यांनी उपमा दिली आहे वाळूच्या ढिगाऱ्यातील वाळूच्या कणाची. वाहती हवा ते कण हवे तसे उडवू शकते. व्यक्ती संघटित गर्दीचा भाग बनली, की तिचे व्यक्तिमत्त्व विरघळून जाते आणि त्याची जागा घेते गर्दीचे मन. हे मन एकजीव असते. ते भावनाशील असते आणि म्हणून अंतिमत: धोकादायक असते.

ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ विल्फ्रेड ट्रॉटर यांनी १९१६ साली ‘द इन्स्टिक्ट ऑफ द हर्ड इन पीस अ‍ॅण्ड वॉर’ या ग्रंथातून एक वेगळे मत मांडले. त्यानुसार, व्यक्तीच्या मनात ज्या सहजप्रवृत्ती असतात, त्याच प्रवृत्ती गर्दीवरही सत्ता गाजवीत असतात. तेव्हा गर्दीवर राज्य करायचे, तर काय करायला हवे? तर त्या सहजप्रवृत्तींना ताब्यात घेतले पाहिजे. त्यांना खेळविले पाहिजे. हे मुद्रित माध्यमांना चांगल्या प्रकारे नाही करता येणार. त्यासाठी हवा बुद्धिमंतांचा खास गट. फ्रॉईड आपल्या पेशन्टवर उपचार करताना विशिष्ट प्रतिमांचा वापर करीत असे. तसा वापर या गटाला करता आला पाहिजे. आता हे बुद्धिमंत कोण? तर याचे उत्तर पुढे जाऊन एडवर्ड बर्नेज यांनी दिले आहे. हा गट म्हणजे ‘नैसर्गिक नेतृत्वगुण असलेले, समाजास आवश्यक असलेल्या कल्पनांचा पुरवठा करण्याची क्षमता असलेले आणि सामाजिक व्यवस्थेत महत्त्वाची जागा असलेले’ लोक. बर्नेज यांचे ‘अदृश्य सरकार’ आणि ट्रॉटर यांचा बुद्धिमंतांचा गट सारखेच म्हणावे लागेल.

हिटलर, गोबेल्स यांच्यासमोर ही मांडणी आयतीच होती. हिटलरनेही गर्दीच्या मानसशास्त्राचा विचार केला होता. ‘माइन काम्फ’मध्ये तो सांगतो, की कोणत्याही प्रकारचा दुबळेपणा स्वीकारण्यास जनसमूहाचे मन तयार नसते. ते स्त्रियांप्रमाणे असते. स्त्रियांना सामर्थ्यांची एक भावनिक ओढ असते. त्यांचे मन प्रभावित होते ते अमूर्त तर्काहून या अशा भावनांनी. समूहाचेही असेच असते. त्याला ‘याचिकाकर्त्यां’विषयी तिरस्कार आणि अधिकारशहाबाबत प्रेम वाटते. तेव्हा असा समूह एकत्र करणे गरजेचे. त्यासाठी हवेत जनसभांचे इव्हेन्ट.

पण त्यांचे आयोजनही विचारपूर्वक, अगदी तपशिलाने केले पाहिजे. स्थळ आणि काळाबद्दल काळजी घेतली पाहिजे. सभा व्हाव्यात त्या शक्यतो एखादी मोठी खोली, सभागृह वा क्रीडागार अशा बंदिस्त वातावरणात. किंवा मग त्या सभास्थानाला काही ऐतिहासिक, सांस्कृतिक प्रतीकात्मक मूल्य हवे. वेळेबाबत तर हिटलरने खास सूचना देऊन ठेवल्या आहेत. तो सांगतो, की लोकसमूहाला आपल्या भूमिकेच्या बाजूने वळवायचे असेल तर ते कार्यक्रम कधीही सकाळच्या वेळी करू नका. ‘त्यासाठी अंधूक प्रकाश असलेली वेळ उपयोगाची. खासकरून संध्याकाळची. कारण त्या वेळी लोक थकलेले असतात. विरोध करण्याची त्यांची ताकद कमी झालेली असते. अशा वेळी त्यांना भावनिकदृष्टय़ा शरण आणणे सोपे असते.’ अशा शरणागत माणसांना बेफाम करणे अवघड नसते. ती आता मुळात दुसऱ्याच्या बुद्धीने वागू लागलेली असतात. अतिशय सूचनाक्षम बनतात. जणू संमोहित झालेली असतात ती. अशा वेळी त्यांच्या मनात निर्माण केलेल्या प्रतिमा या खऱ्याच असतात, तो भ्रम हेच वास्तव असते असे समजून ते चालत असतात. हिटलरचे सर्व सभा, मेळावे आदी इव्हेन्ट अशाच पद्धतीने व यासाठीच आयोजित केलेले असत. त्याचे नमुने म्हणजे नाझींचे न्यूरेम्बर्ग मेळावे. ते दरवर्षी ऑगस्ट वा सप्टेंबरमध्ये होत. त्यांची परंपराच निर्माण केली होती हिटलरने. ‘ट्रायम्फ डे विलेन्स’ या माहितीपटातून आपणांस त्यातील १९३४चा भव्य मेळावा पाहावयास मिळतो. संपूर्ण जर्मनीतून पाच लाखांहून अधिक लोक तेथे हिटलरच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी आले होते. हाती ध्वज. मुखी हिटलरचा जयजयकार. मनात राष्ट्रभक्तीची आग, असा तो सगळा माहोल. तो केवळ पाहणे हेही परिणामकारक असे. हे झाले मोठमोठय़ा इव्हेन्टचे. ते कधी वार्षिक मेळावे म्हणून भरविले जात, तर कधी एखाद्या योजनेची, धोरणाची घोषणा करण्यासाठी. ऑलिम्पिकसारख्या क्रीडा स्पर्धेचे रूपांतरही हिटलरने त्याच्या प्रचारी इव्हेन्टमध्ये केले होते.

पण ही गर्दी मेळविली, तरी तिला झुलवणे सोपे नसते. हिटलरचे अनुभवाचे बोल सांगतात, की लोकांच्या मनातील भावनिक पूर्वग्रह, मानसिक कल, भावना आदी बाबी दूर करून तेथे दुसऱ्या गोष्टींची स्थापना करणे हे अवघडच. ज्याच्याकडे अत्यंत संवेदनशील अंतर्दृष्टी असते असा वक्ताच ते साध्य करू शकतो. हे वक्तृत्वगुणाचे हिटलरला मोठे कौतुक होते. तो सांगतो, रशियातील अडाणी जनता कम्युनिस्ट क्रांतीत उत्साहाने सहभागी झाली ती काही कार्ल मार्क्‍सचे सिद्धान्त वाचून नव्हे. ते क्रांतीत सहभागी झाले ते हजारो कम्युनिस्ट आंदोलकांनी दिलेली पृथ्वीवर स्वर्ग आणण्याची आश्वासने ऐकून. हिटलरप्रमाणेच चर्चिलनेही प्रोपगंडातील वक्तृत्वकलेचे महत्त्व जाणले होते. यावरचा त्यांचा एक अप्रकाशित लेख आता उपलब्ध आहे. ‘द स्कॅफोल्डिंग ऑफ -हेटरिक’ या नावाने १८९७ मध्ये त्यांनी हा निबंध लिहिला होता. त्यात एक लक्षणीय विधान आहे.

चर्चिल म्हणतात, ‘वक्ता हा अनेकांच्या मनोविकारांचे, उन्मादाचे मूर्तरूप असतो. तो लोकांना प्रेरित करण्यापूर्वी स्वत:स प्रेरित झालेला असतो. लोकांच्या मनातील घृणा जागृत करण्यापूर्वी त्याचे स्वत:चे काळीज संतापाने भरलेले असते. लोकांना रडायला लावण्यापूर्वी त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत असतात.. त्याची मते बदलू शकतात.. पण प्रत्येक वक्ता जेव्हा बोलत असतो तेव्हा त्याचा स्वत:चा त्या बोलण्यावर विश्वास असतो. तो अनेकदा विसंगत असू शकेल. पण तो कधीही जाणीवपूर्वक अप्रामाणिक नसतो.’ हिटलर तसा होता. उत्कृष्ट वक्ता होता तो. ले बॉन सांगतात, ‘गर्दीतील कोणत्याही व्यक्तीला अतिरेकी क्रौर्याकडे किंवा उदात्त नायकत्वाकडे नेण्याची ताकद असते कुशल वक्त्यामध्ये.’ हिटलरमध्ये ती होती. आपले वक्तृत्व आणि ‘पार्टेटॅग’सारखे इव्हेन्ट यांच्या बळावर त्याने सामान्य जर्मन नागरिकांना भुलवले. त्यांच्या मनातील दृढ सांस्कृतिक, धार्मिक पूर्वग्रहांना चेतवून त्यांच्यावर राज्य केले. जर्मनीत ‘फ्यूहरर प्रिन्झिप’ – हिटलरची दंतकथा – निर्माण करण्यात या इव्हेन्टचा आणि हिटलरच्या वक्तृत्वाचा मोठा वाटा होता. यात सर्वात भयंकर म्हणजे, आपली झुंड बनविली जात आहे, त्यातून नाझी प्रोपगंडा आपल्या मेंदूत पेरला जात आहे याचा पत्ताही कोणाला नव्हता.